Home » पुस्तक परिचय » प्रकाशमार्ग दाखवणा-या देवदूताच्या कथा

प्रकाशमार्ग दाखवणा-या देवदूताच्या कथा

Post on : 06-08-2014 # 12:30:03
Print

 आपल्याकडे सरकारी नोकरीतील कर्मचा-यांचं प्रमाण खूप मोठं आहे व त्यात दरवर्षी भर पडत असते. दरवर्षी हजारो लोक सरकारी नोकरीतून निवृत्त होत असतात. मात्र सरकारी नोकरीत असूनही नोकरीचे किंवा निवृत्तीनंतर पेन्शन मिळवण्याचे नियम माहीत नसलेली हजारो माणसे आजही आपल्या देशात आहेत. अशा गरजूंना मार्गदर्शन करण्याचं काम डोंबिवलीतील एक जनसेवक सुधाकर मेहरूणकर गेली २० वर्षे करत आहेत. त्यांच्याकडून संकलित केलेल्या काही किश्शांचं शब्दांकन करून ते प्रा. छायाजी मोहिते यांनी पुस्तकरूपात मांडलं आहे.

‘सुधाकर मेहरूणकर यांनी प्रकाशमार्ग दाखवलेल्या निवृत्तांच्या कथा व व्यथा.. तिमिरातून तेजाकडे..’ हे पुस्तक त्यातील मार्गदर्शनपर कथांमुळे निश्चितच वाचनीय झालं आहे. हे मेहरूणकरांचं एक छोटंसं चरित्रच आहे, असं म्हणायला हरकत नाही. ते १९५७ साली पश्चिम रेल्वेच्या बडोदे मंडळ रेल्वे विभागाच्या लेखा परिक्षा कार्यालयात नोकरीला लागले. तिथल्या विविध उपकार्यालयातील हिशेब तपासण्याचे काम त्यांना करावं लागायचं. या नोकरीच्या निमित्ताने त्यांना विविध शहरं, गावं पाहता आली. चार भाषांमधून मेहरूणकरांना कामाचे व्यवहार करावे लागत. तेव्हापासूनच त्यांनी रेल्वेत नोकरी करणा-या अनेकांना मार्गदर्शक म्हणून मदत केली. संपूर्ण नोकरीत रेल्वेचे विविध कायदे, नियम, पेन्शनसंबंधीच्या खाचाखोचा याची चांगल्या त-हेनं माहिती करून घेतली. याचा फायदा त्यांना निवृत्तीनंतर झाला.

रेल्वेतून निवृत्त झाल्यावर ते अखिल भारतीय रेल्वे संघटना, केंद्रीय निवृत्त कर्मचारी संघटना अशा अनेक संघटनांचे सदस्य झाले व त्या काळातच त्यांचा अनेक निवृत्त कर्मचा-यांशी व त्यांच्या अडचणींशी जवळून संबंध आला. अनेक मोठय़ा लेखा अधिका-यांनी मेहरूणकरांचा सुस्वभाव व लोकांना मदत करण्याची वृत्ती पाहून त्यांचं कौतुक केलेलं आहे. लोकांची बँक, पेन्शनविषयक कामं, समस्या त्यांनी विनामूल्य सोडवल्या आहेत. विशेष असं की, एखाद्याचा निरोप गेल्यास ते स्वत: त्या माणसाच्या घरी जाऊन समस्या स्वखर्चानं सोडवून देत. त्यामुळे अनेक कुटुंबं एक निर्मळ जनसेवक म्हणून त्यांचे उपकार आजही स्मरतात.

जग हे असेच चांगल्या माणसांमुळे शाबूत आहे हे खरंच असल्याचं या पुस्तकातल्या गोष्टी वाचून पटतं. या पुस्तकात मेहरूणकरांनी केलेल्या मदतीच्या अनुभवांशिवाय माणसांच्या विविध स्वभावांचं दर्शन घडतं. रेल्वेत कामाला असणारे पती वारल्यानंतर त्यांनी त्या माणसाच्या विधवा पत्नीला मदत केली. त्या महिलेला पतीच्या निधनानंतर पेन्शन मिळते, हेदेखील ठाऊक नव्हतं. असे कितीतरी प्रसंग या पुस्तकात सांगितलेले आहेत. मेहरूणकर आज ७९ वर्षाचे आहेत व तरीही ते दिवसाचे १०-१२ तास काम करत असतात. या पुस्तकासाठी थोडे अधिक कष्ट घेतले असते तर पुस्तक नीट विषयवार मांडता आले असते, असं पुस्तक वाचून झाल्यावर मनात येतं.

तिमिरातून तेजाकडे..
शब्दांकन : छायाजी मोहिते
पानं : १८४
किंमत : १५० रुपये

Source :

विषयसूची
पुस्तक परिचय
  • आनंददायी शिक्षणाच्या जगात
  • युवराजचा ठाव
  • बाबा आमटे यांचे अस्पर्शित कंगोरे...
  • शेतकर्‍यांच्या समस्यांचे वास्तववादी आकलन
  • समृद्ध सोयरीक
  • उपेक्षित बालकांच्या जीवनाचा आरसा
  • काश्मीरचे धगधगते वास्तव!
  • प्रवाशांचा मित्र
  • अमेरिकेच्या अंतरंगात नेणारं पुस्तक
  • कथा हरवली शब्दांच्या ढगांत