Home » पुस्तक परिचय » अथांग नात्यांचा शोध

अथांग नात्यांचा शोध

Post on : 07-08-2014 # 12:41:13
Print

 जीवन सुंदर आहे, फक्त ते सुंदर करण्यासाठी ती सुंदरता आपल्या मनात असायला हवी. नाही तर संशय, द्वेष, मत्सर, अशा विविध भावनांचा शिरकाव आपल्या मनात होऊन हेच जीवन कुरूप होण्यास वेळ लागणार नाही. आपल्या आजूबाजूला आपण असे किती तरी प्रसंग, व्यक्ती पाहत असतो. त्यांचा संघर्ष, त्यांचं प्रेम, समाज चौकट मोडून जगण्यासाठी बंड करणारी, तर कधी परिस्थितीसमोर हतबल झालेली अशी ही माणसं. अशाच सामान्य माणसांची कथा लेखिका साधना कामत यांनी आपल्या ‘लागेना थांग’ या संग्रहातून मांडली आहे.

पुस्तकांचं शीर्षकचं ‘लागेना थांग’आहे. मानवी मनाचा थांग लागणं खरंच अशक्यप्राय आहे. कधी, केव्हा एखादं नातं कोणतं वळण घेईल याचा थांग लागणं कठीणच नाही तर अशक्य आहे. शीर्षक ‘लागेना थांग’ या त्यांच्या कथेत एका अविवाहित विदूषीचं एका विद्वान पुरुषाशी जेव्हा नातं जुळून येतं तेव्हा भावभावनांचे कसे हिंदोळे तयार होतात, याची सुंदर कथा लेखिकेनं मांडली आहे. सुंदर, बुद्धिमान, श्रीमंत असणा-या आणि तरीही धाडसाने अविवाहित राहिलेल्या एका स्त्रीचं चित्रण यात त्यांनी केलं आहे. प्रेम हे आंधळं असतं असं म्हणतात, ते काही अंशी तरी खरं आहे. आपल्या पतीवर मनापासून प्रेम करणा-या आणि ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्या हातून विवाहबासंबंध राखले गेले आहेत हे माहीत असूनही त्याच्यावर निस्सीम प्रेम करणा-या नायिकेची कथा ‘वारसा’ या कथेतून मांडण्यात आली आहे. एकाच बापाचं नाव लावणा-या दोन मुलांमध्ये बापाचे गुण जसेच्या तसे येत नाहीत, हेही या कथेतून खूपच छान पद्धतीने लेखिकेनं मांडलं आहे.

या लेखसंग्रहातील कामत यांच्या ज्या कथा विविध मासिकं, अंक यातून प्रकाशित झाल्या. त्या सा-याच कथांचा मूळ गाभा आहे, तो म्हणजे नात्यांचे गुंफलेले गोफ. हे गोफ सोडवणं, समजणं वाटतं तितकं सोपं नसतं हे ‘लागेना थांग’ हा लेखसंग्रह वाचताना प्रत्ययास येतं.

बदलत्या सामाजिक परिस्थितीचं प्रतिबिंब, म्हणूनच यातल्या प्रत्येक कथेत उमटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे अलीकडे मुलगी एकुलती एक असेल तर तिलाही तिच्या आई-वडिलांची देखभाल करण्याचं कर्तव्य पार पाडावं लागतं. अशा वेळेस मुली सासू-सास-यांसोबत आपल्या आई-वडिलांनाही एकत्र घेऊन जगण्याचा प्रयत्न करतात. पण हे करत असताना दोन कुटुंबातील रीतीरिवाज, खाणंपिणं, संस्कृती यात असणा-या भिन्नतेमुळे काय गमतीजमती घडतात यांची मजेशीर कथा वाचायला मिळते ‘जोडी’ या कथेत, तर ‘एक अध्याय’ या त्यांच्या कथेतही एका स्त्रीच्या मनाची घालमेल, तिचं पारंपरिक लग्नाचे पाश तोडून मुक्त जगणं, ते जगताना समाजाकडून आणि तिच्या कुटुंबाकडून तिची होणारी निर्भर्त्सना याचं खूप बारकाईने वर्णन करण्यात आलं आहे. काही झालं तरी स्त्रीला दोषी ठरवण्याची समाजाची मानसिकता यांचं चित्रण यात पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे ‘संशय का मनी’ या त्यांच्या कथेत माणसाच्या मनात एकदा का शंकेची पाल निर्माण झाली की, तो प्रत्येक गोष्टीकडे कसा संशयानं पाहतो याची कथा मांडली आहे आणि या संशयामुळे तो स्वत:चाच आनंद, आयुष्य कसं विराण करतो, याचं वास्तव दर्शन आपल्याला होतं.

यातल्या ‘कसोटीचे क्षण‘, ‘वर्तुळ‘, ‘सायरनचे गाणे’, ‘ब्रुट्स तूसुद्धा’ या कथांमधूनही मनुष्य स्वभावाचं, त्यातल्या चढ-उतारांचं दर्शन होत राहतं. ‘कॅलिडोस्कोप’मधून एका पुरुषाचा दांभिकपणा आणि नायिकेचा कणखरपणा पाहायला मिळतो, तर ‘राजकन्या आणि वाटाणा’ यातून एका तरुण करिअरिस्ट जोडप्याच्या आयुष्यातले, त्यांच्या करिअरमधले ताण-तणाव, त्यांचा त्यांच्या संसारावर काय आणि कसा परिणाम होतो, हे वाचायला मिळतं. ही कथा वाचताना नव्याने संसार करणा-या एखाद्या जोडप्याने संसारात काय पथ्य सांभाळावी, याची शिकवणही देते. एकंदरीतच साधना कामत यांच्या साहित्य संग्रहातलं हे आणखी एक छानसं पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरेल, असं आहे. त्यांची कथा मांडण्याची सुसंगता, त्या कथेला फुलवण्याची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखीच आहे. कधी कथेत हळुवारपणा आणावा, नाटय़ आणावं, रहस्याची कडी कशी जोडावी याचं भान लेखिकेला आहे. म्हणूनच या कथा वाचकांना पकडून ठेवतील अशाच आहेत.

लागेना थांग : साधना कामत
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस
पानं : १८४
किंमत : २०० रुपये

Source :

विषयसूची
पुस्तक परिचय
  • आनंददायी शिक्षणाच्या जगात
  • युवराजचा ठाव
  • बाबा आमटे यांचे अस्पर्शित कंगोरे...
  • शेतकर्‍यांच्या समस्यांचे वास्तववादी आकलन
  • समृद्ध सोयरीक
  • उपेक्षित बालकांच्या जीवनाचा आरसा
  • काश्मीरचे धगधगते वास्तव!
  • प्रवाशांचा मित्र
  • अमेरिकेच्या अंतरंगात नेणारं पुस्तक
  • कथा हरवली शब्दांच्या ढगांत