Home » पुस्तक परिचय » संग्राह्य औषध-कोश

संग्राह्य औषध-कोश

Post on : 19-08-2014 # 12:37:13
Print

पूर्वी आजीबाईचा बटवा अशी संकल्पना प्रचलित होती. हा आजीबाईचा बटवा म्हणजे घरातला चालता-फिरता दवाखानाच असायचा. आजीजवळच्या पिशवीत अगदी साध्या साध्या आजारांवर म्हणजे सर्दी, पडसं, अतिसार, पित्त, दातदुखी, डोकेदुखी, पायाला भेगा पडणं यांसारख्या विविध आजारांवर झटपट उपाय होतील अशी औषधं असायची. पण आता आजीबाईच मॉडर्न झाल्या आहेत तर त्यांचा बटवा कुठे असणार? पण आपल्या आसपास नजर टाकलीत तर इतकंच कशाला आपल्या घरातील स्वयंपाकाच्या साहित्यात, घरातील दागिन्यांत, तसंच आपल्या परसदारी असलेल्या बागेत किंवा रानावनात फिरताना आपल्याला कित्येक वेळा भरपूर औषधी दृष्टीस पडतात, पण त्यांची औषधी किंवा वैद्यकीय ओळख आपल्याला माहीत नसल्याने आपण त्यांच्याकडे फारसं लक्ष देत नाही. केवळ वनस्पतीच नव्हे तर काही प्राणी, कीटक, सोने, चांदी अशा सगळ्या औषधींची तुम्हाला माहिती हवी असेल तर डॉ. मंदार जोशी यांचं ‘औषधी विश्वकोश’ हे पुस्तक जरूर वाचा.

लेखक मंदार जोशी हे स्वत: होमिओपॅथीचे डॉक्टर असून या पुस्तकात नमूद केलेल्या प्रत्येक औषधीचा त्यांनी विस्तृत अभ्यास केला आहे. केवळ अ‍ॅलोपॅथीच नव्हे तर सगळ्याच पॅथींचा प्रत्येक औषधांचा मर्यादित अभ्यास केला आहे. त्यांनी या पुस्तकात मांडलेली ही संकल्पना नावीन्यपूर्ण आहे. अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, आणि युनानी या भारतातील चार प्रचलित औषधपद्धतीव्यतिरिक्त पारंपरिक चिनी औषधपद्धती, अरेबिक मेडिसीन, प्राचीन युरोपिअन औषधपद्धती आणि जगातील इतर देशांमधील औषधपद्धतींनी या पुस्तकात उल्लेख असलेल्या प्रत्येक औषधीचा वापर केलेला आहे. मुख्य म्हणजे प्रत्येक औषधपद्धतीने आपल्याकडील पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या आजारांवरच ही औषधी वापरली आहे. त्यामुळे प्रत्येक औषधीची ओळख या सगळ्या उपचारपद्धतींनाही मर्यादित स्वरूपातच होती. त्या सगळ्यांसाठी ही माहिती निश्चितच उपयुक्त ठरेल.

या ग्रंथामध्ये सर्व औषधींचे तीन भागांत वर्गीकरण केले आहे. पहिला वर्ग ‘खनिज आणि रसायन औषधी’, दुसरा वर्ग ‘प्राणिजन्य औषधी’ आणि तिसरा वर्ग ‘वनौषधीं’चा आहे. ‘खनिज आणि रसायन’ या वर्गात भूगर्भात आढळणा-या खनिजांचा, त्यांच्यापासून तयार केलेल्या संयुगांचा आणि जमिनीवर आढळणा-या रसायनांचाही अभ्यास केलेला आहे. यांतील बहुतांश औषधींचा रसायनशास्त्राच्या ‘पिरिअ‍ॅडिक टेबल’मध्ये समावेश आहे. यातील काही घटक विषारी आहेत. तर काही नेहमीच्या उपयोगातले आहेत. पण प्रत्येकीचे औषधी मूल्य हे जगातील जवळ जवळ सर्व देशांनी मान्य केलेले आहे. आयुर्वेदामध्ये या सर्व खनिज रसायन औषधींचा ‘रसशास्त्र’ या नवीन संकल्पनेत भरपूर उपयोग केलेला आहे. अतिप्राचीन चरक संहितेमध्ये या औषधींचा उल्लेख फारसा झालेला नसला तरी त्यानंतर झालेल्या आयुर्वेदिक संशोधनामध्ये या सर्व औषधींचा एक वेगळा समूह करून त्यांचा वेगळा अभ्यास झाला आहे. यामध्ये साधारण रस, महारस, खनिज, रत्ने, पा-याची विविध संयुगे, विविध प्रकारचे अश्म यांचा समावेश आहे.

प्राणिजन्य औषधींमध्ये जमिनीवर चालणा-या चतुष्पाद प्राण्यांपासून समुद्रातील मासे, शिंपले, शंख, प्रवाळ, जमिनीवर सरपटणारे साप, गोगलगायी यांच्यापर्यंत आणि आसमंतात स्वैर उडणारी मधमाशी, तेलिनी माशी यांचा समावेश केलेला आहे. ‘औषधी विश्वकोश’ मध्ये असलेल्या प्राणिजन्य औषधांमुळे पूर्णपणे शाकाहारी असलेल्या वाचकांनी या औषधांना निषिद्ध मानण्याचं काहीही कारण नाही. कारण होमिओपॅथी औषधांमध्ये त्या प्राणिजन्य गोष्टींचा अतिसूक्ष्म अंश असतो. इतका की जो कुठल्याही सूक्ष्मदर्शकाखाली किंवा रासायनिक पृथक्करणात दिसत नाही. तसेच अ‍ॅलोपॅथीच्या लसीकरण या प्रकारातही रोगाचे जंतू आपल्या शरीरात सोडले जातात. उदा. लहान बाळांना दिले जाणारे बीसीजी आणि तोंडी दिला जाणारा पोलिओचा डोस. आपण जे गाय, म्हैस किंवा शेळीचे दूध पितो तेदेखील प्राणिजन्य पदार्थापैकीच आहे. दुधापासून दही होण्यासाठी जे काही जिवाणू लागतात त्यांचाही एक समूह आहे. जो दुधाला आंबवतो. अशा सगळ्या औषधी त्यांनी त्यात नमूद केल्या आहेत. शेवटचा आणि सर्वात मोठा वर्ग आहे, तो म्हणजे वनौषधींचा. यात आपल्या स्वयंपाकघरातील साहित्य, तसंच फळं आणि सुवासिक वनस्पती यांच्या अतिविषारी आणि अतिउन्मादक अशा औषधींचाही अभ्यास केला आहे. त्यांतली काही तुमच्या परिचयाची असतील तर कित्येक नव्याने परिचित होतील अशीच आहे. यात गुंजा, खोकली, सहस्त्रपषी, अळंबी, कोरफड, बिब्बा, सुपारी, अजमूद (सेलरी), पिवळा धोत्रा, कडुनिंब, लाल बीट, काळी मोहरी, लाल मिरची, झेंडू, गांजा, भांग, कांदा, लसूण, दालचिनी, कापूर, कॉफी, केशर, निलगिरी, हिंग, अक्रोड, पुदिना, भाजीचा मुळा, जांभूळ आदी औषधींचा समावेश आहे.

हे सगळं देताना त्या सगळ्या औषधांची इतर भाषांमधील नावं, त्यांची उपलब्धता, त्यातील उपयोगी भाग, आणि रासायनिक घटक यांची नावं इंग्रजीत दिलेली आहेत. जेणेकरून पुढील संशोधनासाठी उपयुक्त ठरेल. त्यानंतरचा भाग हा औषधीच्या भारतात फारशा प्रचलित आणि वापरात नसलेल्या जगातील इतर उपचारपद्धतींमधील वापराबद्दलची माहिती आहे. होमिओपॅथिक औषधीच्या नावानंतर त्या विशिष्ट औषधींमध्ये जी काही मानसिक आणि शारीरिक लक्षणं बरी करण्याची क्षमता आहे त्यातील काही प्रमुख लक्षणं दिली आहेत.

मुळातच ही नवीन संकल्पना असून त्याची वाचकाला माहिती व्हावी म्हणून त्यांनी ग्रंथाची रचना केली आहे. त्यासाठी त्यांनी हत्ती आणि सहा आंधळ्यांची गोष्ट सांगितली आहे. याशिवाय त्यांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच टिप्सच्या स्वरूपात पूर्वीच्या काही औषधांची माहिती दिली आहे.
यासाठी केवळ शब्दांचाच आधार घेतलेला नसून त्याबरोबर चित्रं, छायाचित्रंदेखील संदर्भासहित पुस्तकात दिलेली आहेत. त्यामुळे वाचताना अनेक गोष्टींची माहिती होते. विषयाला धरूनच पुस्तकाचं मुखपृष्ठदेखील अतिशय समर्पक केलं आहे.

एकंदरीतच या पुस्तकाची संकल्पनाच नावीन्यपूर्ण असून निसर्गावर प्रेम करणा-या आणि या नैसर्गिक गोष्टींची शास्त्रीय माहिती जाणून घेणा-या वाचकांसाठी आणि प्रत्येक वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा विश्वकोश नक्कीच संग्राह्य ठरेल.

औषधी विश्वकोश : डॉ. मंदार जोशी
इंकिंग इनोव्हेशन्स
पानं : २०० , किंमत : ८०० रुपये

Source :

विषयसूची
पुस्तक परिचय
  • आनंददायी शिक्षणाच्या जगात
  • युवराजचा ठाव
  • बाबा आमटे यांचे अस्पर्शित कंगोरे...
  • शेतकर्‍यांच्या समस्यांचे वास्तववादी आकलन
  • समृद्ध सोयरीक
  • उपेक्षित बालकांच्या जीवनाचा आरसा
  • काश्मीरचे धगधगते वास्तव!
  • प्रवाशांचा मित्र
  • अमेरिकेच्या अंतरंगात नेणारं पुस्तक
  • कथा हरवली शब्दांच्या ढगांत