Home » पुस्तक परिचय » परदेशी पदार्थाना भारतीय लज्जत

परदेशी पदार्थाना भारतीय लज्जत

Post on : 20-08-2014 # 12:59:35
Print

 परदेशी पदार्थापासून स्वदेशी पदार्थ बनवण्याचे प्रयोग करायला सहसा भारतीय गृहिणी घाबरतात. या परदेशी जिन्नसांनी मूळ भारतीय पदार्थाची चव बिघडवली तर साराच पदार्थ बिघडून जायचा, अशी एक भीती मनात असते. परंतु वसुंधरा पर्वते याचं ‘जिन्नस परदेशी लज्जत स्वदेशी’ हे पुस्तक वाचून ही भीती मनातून नाहिशी होते. त्यांच्या या पाककृतींच्या पुस्तकाची मध्यवर्ती कल्पनाच मुळी अमेरिकन व भारतीय पदार्थाचं फ्युजन ही आहे.

परदेशी जिन्नसांना स्वदेशी चवीत बसवण्या-या ४४० फ्युजन पाककृती या पुस्तकात वाचायला मिळतात. लेखिका वारंवार परदेश प्रवास करत असल्यामुळे त्यांनी अमेरिकेतील वास्तव्यात तेथील ग्रोसरी स्टोअर्समधून अनेक परदेशी धान्यं, फळं आणून त्यात भारतीय पदार्थ मिसळून फ्युजन पाककृती तयार केल्यात. त्यांच्या कुटुंबियांनाही त्या आवडल्या म्हणून त्यांनी त्यांचा हा अनुभव पुस्तकरूपात वाचकांपुढे ठेवला आहे. मात्र या पुस्तकाचा मार्गदर्शक म्हणून अमेरिकेत किंवा इतर परदेशात राहाणा-या गृहिणींनाच अधिक लाभ होईल. कारण या पुस्तकात दिलेले किनवा, चायोटे, ब्रुसेल्स स्प्राऊट, कुसकुस, चिया अशांसारखे पदार्थ आपल्याकडे क्वचितच मिळतील, मात्र इतर अनेक पदार्थ भारतीय गृहिणींनी करून पाहण्यासारखे आहेत.

लेखिका शाकाहारी असल्यामुळे त्यांनी शाकाहारी पदार्थच या पुस्तकात दिले आहेत. लेखिकेने हे फ्युजन पदार्थ निवडताना पौष्टिकपणावर जास्त भर दिला आहे. उदाहरणार्थ पनीरपेक्षा टोफूत (सोयाबीनच्या दुधाचे पनीर) भरपूर प्रोटिन्स असल्यामुळे टोफूच्या छान पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत. थाई टोफू करी, टॉम खा सूप, टोफूच्या पोळ्या, टोफू मेथी पराठे इत्यादी पदार्थ इथेही आपण बनवू शकतो. कारण भारतीय बाजारात टोफू सहजपणे उपलब्ध असतो. दुसरे धान्य आहे ओट्स. लेखिका म्हणते की, जवळपास सर्व अमेरिका सकाळी उठल्याबरोबर ओट्स म्हणजे जव खाते. त्याचे भारतीय फ्युजन पदार्थ म्हणजे ओट्स खिचडी, ओट्स चिक्की, ओट्स अनारसे असे काही पदार्थ बनवता येतात.

पुस्तकातील दूध-दह्याचे पदार्थ या प्रकरणात अमेरिकेत मिळणा-या इव्हॅपोरेटेड मिल्क (बिनसाखरेचे आटीव दूध), रिकोटा चीज (पेढयांसाठी) इत्यादीचे अनेक पदार्थ दिले आहेत. त्यातील योगर्ट श्रीखंड, ऑरेंज चीजकेक, बासुंदी, गुलकंद बर्फी, बदाम बर्फी, पेढे इत्यादी पाककृती तिथल्या भारतीय गृहिणींना निश्चितच उपयोगी वाटतील. परदेशी जिन्नसांपासून बनवण्यात येणारे वॉफल्स, सॉस, बटर, पॅनकेक, कुकीज, सूप, पिझ्झा, केक इत्यादी अनेक प्रकार लेखिकेने सोपे करून लिहिले आहेत. भाज्या या प्रकारात अमेरिकेत मिळणा-या, पण भारतीयांना अनोळखी असणा-या भाज्यांच्या कृती दिल्या आहेत. थोडक्यात अमेरिकेत राहून, तिथले पदार्थ वापरून भारतीय चवीचा स्वयंपाक कसा बनवावा याची गुरूकिल्लीच या पुस्तकात सांगितली आहे. पुस्तकाच्या शेवटी संकीर्णमध्ये गृहिणींसाठी अनेक सूचना लेखिकेने दिल्या आहेत. त्याने पुस्तकाची उपयुक्तता वाढली आहे. तसंच परदेशातील खाद्यपदार्थाची वजनं व मापं त्यांनी भारतीय प्रमाणात लिहून दिली आहेत. उदाहरणार्थ, एक पौंड म्हणजे ४५४ ग्रॅम.

एका अर्थी हे पुस्तक परदेशात राहणा-या गृहिणींची गरज भागवणारे व भारतीय गृहिणीला फ्युजन पदार्थाचे नाविन्य दाखवणारे आहे. पुस्तकाची मांडणी व छपाई चांगली असूनही या पुस्तकाला एक गालबोट लागले आहे. ते म्हणजे पुस्तकाची ४९ ते ६३ पाने चक्क उलटी लागली आहेत. एवढी अधिक पाने उलटी लागणे, हे प्रकाशन संस्थेला कमीपणा आणणारे आहे असे वाटते. तरी याकडे प्रकाशकांनी जरूर लक्ष द्यावे. एरव्ही पुस्तक वाचनीय आहे.
जिन्नस परदेशी, लज्जत स्वदेशी :
वसुंधरा पर्वते
मेनका प्रकाशन
पानं : १९०
किंमत : २५० रुपये

Source :

विषयसूची
पुस्तक परिचय
  • आनंददायी शिक्षणाच्या जगात
  • युवराजचा ठाव
  • बाबा आमटे यांचे अस्पर्शित कंगोरे...
  • शेतकर्‍यांच्या समस्यांचे वास्तववादी आकलन
  • समृद्ध सोयरीक
  • उपेक्षित बालकांच्या जीवनाचा आरसा
  • काश्मीरचे धगधगते वास्तव!
  • प्रवाशांचा मित्र
  • अमेरिकेच्या अंतरंगात नेणारं पुस्तक
  • कथा हरवली शब्दांच्या ढगांत