बालपणीच रचला राष्ट्रभक्तीचा, क्रांतिकार्याचा पाया
लेखमाला – विश्वगुरु भारत – संघाचे अंतिम ध्येय – भाग 3
संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार(HEDGEWAR) हे जन्मजात स्वातंत्र्यसैनिक होते. भारताला विश्वगुरुपदी (VISHWAGURU) पोहोचविण्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी हेडगेवार यांनी बालवयातच एका भव्य आणि शक्तिशाली संघटनेची कल्पना केली होती. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, खालसा पंथाचे संस्थापक गुरु गोविंद सिंह आणि आर्य समाज संस्थापक स्वामी दयानंद ही त्यांची प्रेरणास्थाने. भारताची ओळख असणाऱ्या प्राचीन सनातन राष्ट्राची कल्पना ही हिंदुत्वाच्या पायावरच आधारलेली आहे. अखंड भारताचे पूर्ण स्वातंत्र्य बालवयापासूनच त्यांच्या मनात आकार घेत होते. ‘वंदे मातरम’(VANDE MATARAM) हा त्यांच्या जीवनाचा मंत्र झाला होता. किशोरवयीन केशव हा एक उत्तम संघटक, नेता, शूर आणि धाडसी मुलगा होता. बालमित्रांसोबत अनेक प्रकारचे धाडसी उपक्रम करताच त्याचे बालपण गेले आणि त्यातच क्रांतीकार्याचा पायाही रचला गेला.
युवा स्वातंत्र्यसैनिक
देशाची झालेली पडझड आणि परकीय राज्यकर्त्यांशी सुरु असणारा झगडा याचे डॉ हेडगेवार यांनी शालेय जीवनातच विश्लेषण केले होते आणि देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळवून देणे हेच जीवन ध्येय त्यांनी स्वीकारले होते. हेडगेवार शालेय विद्यार्थी असताना २२ जून १८९७ रोजी राणी व्हिक्टोरियाच्या साठाव्या वाढदिवसाच्या निमिताने भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या शाळेतही त्यानिमित्त मिठाईचे वाटप करण्यात आले. बालवयीन केशवने ती मिठाई केराच्या टोपलीत टाकून दिली आणि म्हणाला, आपल्यालाच पारतंत्र्यात ठेवून जे इथे येऊन राज्य करीत आहेत त्यांच्या वाढदिवसाचे सोहळे आपण का साजरे करायचे? एक दिवस मी ब्रिटीश शासनच या मिठाईसारखे केराच्या टोपलीत फेकून देईन.
१९०९मध्ये सम्राट एडवर्ड(सातवा) याच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले गेले. ब्रिटीश आणि त्यांच्याशी प्रामाणिक असणारे भारतीय यांची नागपुरातील कार्यालये आणि कारखाने दिव्यांनी उजळून निघाले. नागपुरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. एम्प्रेस मिलच्या मालकांनी आपल्या कापडगिरणीत विविधरंगी सजावट केली. अनेक नागरिक आपापल्या मुलांसह हे सारे पाहण्यासाठी घराबाहेर पडले होते. बाल केशव आपल्या मित्रांना म्हणाला, आपण एका परदेशी शासकाच्या राज्याभिषेकाचा सोहळा साजरा करणे हे अत्यंत लज्जास्पद आहे. ब्रिटिशांना हाकलून देण्याऐवजी लोक आज आनंदोत्सव साजरा करीत आहेत. असे करणाऱ्यांची मला लाज वाटते. मी त्यांच्यासारखे करणार नाही आणि माझ्या मित्रांनाही करू देणार नाही.
ब्रिटीशांचा ध्वज उतरवण्याची इच्छा…..
काळ जसा पुढे सरकत गेला तसे स्वातंत्र्यप्राप्तीच्या या सूक्ष्म भावनेचे विविध धाडसी उपक्रमांच्या माध्यमातून मजबूत प्रकटीकरण होऊ लागले. नागपुरात सीताबर्डी नावाचा किल्ला आहे. येथे कधीकाळी हिंदू राज्यांचे राज्य होते हे तरुण केशवाला माहित होते. या किल्ल्यावर भगवा फडकण्याऐवजी युनियन जॅक का फडकतो आहे असा प्रश्न त्याला नेहमी पडत असे.
त्याने आणि त्याच्या मित्रांनी एकदा हा युनियन जॅक उतरवून त्याजागी भगवा फडकविण्याचे ठरवले. भुयार खणायचे आणि त्यातून जाऊन किल्ल्यावर भगवा फडकवायचा अशी योजना आखण्यात आली आहे. केशवचे मित्र आपले शिक्षक वझे गुरुजी यांच्याकडे अभ्यासासाठी जात असत. सात ते आठ विद्यार्थ्यांनी त्यांच्याच घराच्या एका खोलीतून भुयार खणण्यास सुरुवात केली. एका रात्री खणण्याच्या आवाजाने शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. ते खोलीत जाऊन बघतात तर ही युवा फौज किल्ल्यावर चढाई करण्याच्या आपल्या तयारीत मग्न होती. गुरुजींनी त्यांची समजूत घातली व तसे करण्यापासून परावृत्त केले.
केशव आपल्या मित्रांसोबत जंगलात जाऊन किल्ल्यावर छापा मारणे किंवा ध्वज जिंकणे असे साहसी खेळ खेळत असे. असेच खेळ छत्रपती शिवाजी महाराज बालपणी आपल्या सवंगड्यांसह खेळत असत. याच काळात त्यांनी वादविवाद क्लबही सुरु केला होता. या क्लबमध्ये प्रसिद्ध हिंदू व्यक्तिमत्त्वे आणि देशभक्त क्रांतिकारक हे विषय चर्चिले जात असत. याच दरम्यान ‘स्वदेश बांधव’ या मध्य प्रदेशातील संस्थेने स्वदेशी उत्पादनांचा पुरस्कार केला. डॉ. हेडगेवार आणि त्यांच्या मित्रांनी या संस्थेसाठी मनापासून काम केले. १९०५-०६ दरम्यान क्रांतीकारकांना प्रशिक्षित करण्यासाठी लोकमान्य टिळकांच्या सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. केशव या सगळ्या उपक्रमांमध्ये सक्रीय सहभागी झाला होता.
केशवचा पहिला कारावास
शाळेच्या (SCHOOL) उन्हाळी सुट्टीत केशव आपल्या मामाला भेटण्यासाठी नागपुरातील रामपायली येथे गेला. त्याने तिथेही युवांना संघटीत करण्यास सुरुवात केली. स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली. दरवर्षी रामपायली येथे रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जात असे. या कार्यक्रमात केशवने आपल्या तरुण मित्रांसह वंदे मातरम गायले. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात त्याने एक दणदणीत भाषणही केले. तो म्हणाला, ब्रिटीशांचे राज्य ही आजची सर्वात दु:खद आणि लज्जास्पद गोष्ट आहे. ब्रिटीशशासन आणि आपण त्यांची करत असलेली गुलामी हा मोठा अधर्म आहे. परकीयांचा अन्याय सहन करणे हे महापाप आहे. त्यांच्या विरोधात उभे राहणे आणि त्या परकीयांना देशाबाहेर घालवणे ही काळाची गरज आहे. भारतावरील ब्रिटीश साम्राज्याचा अस्त हेच आजच्या संदर्भातील रावण दहन आहे.
सरकारी हेरांनी पुरविलेल्या माहितीवरून पहिल्यांदा केशवला अटक करण्यात आली. कोवळे वय पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी केशवला माफी मागण्यास सांगितले. केशवने संपूर्ण आत्मविश्वासाने त्यावर उत्तर दिले, मी तुमच्या सूचनांचा भंग केला आहे. परंतु वंदे मातरम गाणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. या पुढेही माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी ते गात राहीन. थोड्या वेळाने त्यांना सोडून देण्यात आले.
आणि शाळा वंदे मातरमच्या घोषणांनी दणाणून गेली….
या घटनेनंतर केशवच्या हालचालींवर शासनाकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत होते. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या सार्वजनिक भाषणांवर बंदी आणली. याच काळात युवकांच्या आंदोलनांवर अंकुश ठेवण्यासाठी शासनाने परिपत्रक काढून वंदे मातरम गाण्यावर बंदी आणली. केशवच्या शाळेनेही ही सूचना पाळण्याचा निर्णय घेतला. केशव आणि त्याच्या मित्रांनी या परिपत्रकाला आव्हान देण्याचे ठरवले.
सगळ्या योजना गुप्त ठेवण्यात आल्या होत्या. दहावीच्या वर्गाचे निरीक्षण करण्यासाठी शिक्षण विभागाचे निरीक्षक हेडमास्तरांसह शाळेत आले. त्यांनी वर्गात प्रवेश केला आणि सगळे विद्यार्थी वंदे मातरमच्या घोषणा देऊ लागले. ते ज्या ज्या वर्गात गेले तिथे तिथे घोषणा दिल्या गेल्या. स्वाभाविकच ते यामुळे संतापले. नागपुरातील शाळा त्यांनी बंद केल्या व वरील कृत्य करणाऱ्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. परंतु त्यांनी एवढे अद्भूत संघटन केले होते की चार महिने झाले तरी एकाचेही नाव बाहेर आले नाही. अखेरीस पालक, सरकारी अधिकारी सर्वांनी मिळून असा तोडगा काढला की विद्यार्थी शाळेत प्रवेश करतील तेव्हा गेटवर मुख्याध्यापकांनी उभे राहावे. प्रत्येकाला चूक झाली की नाही असे विचारावे व मुलांनी हो अशी मान हलवून आत जावे. अशा नाममात्र माफिनाम्यावर मुलांना शाळेत प्रवेश मिळाला. परंतु नागपुरातील दोन विद्यार्थ्यांनी या नाममात्र माफिनाम्याला नकार दिला त्यातील एक होते केशव हेडगेवार. अखेर त्यांना काढून टाकण्यात आले. ज्यांचे शिक्षण अशा पद्धतीने सुटले असेल त्यांच्यासाठी आपल्या नेत्यांनी राष्ट्रीय विद्यालये सुरू केली होती. अशाच एका राष्ट्रीय विद्यालयात शिकून, खासगीरित्या परीक्षा देऊन ते प्रथम श्रेणीत मॅट्रिक पास झाले.
क्रमशः
(लेखक ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक आहेत)