Seva

सैनिकांसाठी दिवाळी फराळ – एक भावनिक उपक्रम

गतवर्षी म्हणजेच २०१९ मध्ये २५०० सैनिकांपर्यंत फराळाचे डबे जनसहभागातून पोहोचवणे शक्य झाले. यावर्षी कोविड महामारीच्या संकटातही पाच हजार फराळाचे डबे सैनिकांपर्यंत पोहोचवायचे, हे उद्दिष्ट ठेवून कामाला सुरुवात झाली.  टीम छोटी असली तरी उत्साह दांडगा होता. अगदी ऑगस्ट पासूनच ऑनलाईन मिटींगला सुरुवात करून उपक्रमाची ढोबळ योजना तयार केली गेली. त्यानुसार लोकांना आवाहनाचा मेसेज सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात वायरल केला गेला आणि १३ सप्टेंबरला १२०० रुपयांची पहिली देणगी हिंदू नव वर्ष स्वागत समिती, दहिसर च्या खात्यात जमा झाली.

गणपती बाप्पा मोरया म्हणून, गजाननाला वंदन करून सर्वजण पुढच्या कामाला लागलो. पत्रकावर संपर्कासाठी छापलेल्या कार्यकर्त्यांचे फोन खणाणायला लागले. सप्टेंबर ते ऑक्टोबर मध्ये हजारो लोकांशी संपर्क झाला. प्रत्येकाला हवी असलेली सर्व माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही कसोशीने केला. तीन ऑक्टोबर पर्यंत ४२०० डब्यांचा निधी गोळा झाला. पाच हजाराचा टप्पा गाठायला थोडेच कमी पडत होतो. आणि म्हणूनच निर्णय घेऊन तारीख १५ ऑक्टोबर पर्यंत वाढवली. दरम्यान बॉक्सेस बनवून घेणे, फराळाची ऑर्डर नामांकित फराळ वाल्यांना देणे, पॅकिंगचे मटेरियल तयार करून घेणे, फराळाच्या वाहतुकीसाठी निरनिराळ्या लोकांशी बोलणे, आर्मी च्या विविध अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करणे आणि मुख्य म्हणजे रोजच्या रोज देणगीदारांना बँक रिकन्सिलिएशन करून पावत्या देणे अशी कामे चालू होतीच.

या सर्व कार्यात, यावेळी एक मोठा निर्णय समितीतर्फे घेतला गेला तो म्हणजे आपल्या वनवासी बंधू-भगिनींना या उपक्रमात सामील करून त्यांना रोजगाराची एक नवीन संधी उपलब्ध करुन देण्याचा. जव्हारच्या दिव्य विद्यालय या गतिमंद, अंध विद्यार्थी तसेच वनवासी महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या संस्थेला १००० किलो फराळ बनवण्याची संधी देण्यात आली. सांगायला अतिशय अभिमान वाटतो की या संस्थेने सुरक्षिततेचे व स्वच्छतेचे सर्व नियम पाळून, साजूक तुपातल्या अतिशय चविष्ट अश्या फराळाचे १००० डबे वेळेत तयार करून आपल्याला दिले. आपल्या वनवासी बंधुभगिनींना आपल्या सैनिकांशी जोडून देण्याचे एक पुण्यकर्मच यानिमित्ताने झाले. एक अतिशय प्रेरणादायी असे उदाहरणच दिव्य विद्यालयाने या कामातून समाजापुढे ठेवले आहे.

मुंबई, ठाणे, डोंबिवली या भागातील अनेक छोट्या देशभक्तांनी आपल्या लाडक्या सैनिकांसाठी जवळजवळ एक हजार शुभेच्छापत्र बनवून पाठवली. यात ‘आव्हान पालक संघा’तर्फे दिव्यांग मुलांनी बनवून पाठवलेल्या शुभेच्छापत्रांचे कौतुक थेट लेह मधील आर्मी अधिकाऱ्यांनी स्वतः फोन करून केले.

आर.एन. एस. एक्सप्रेस या कंपनीचे श्री राकेश पांडे यांनी सामाजिक बांधिलकी जपून हा सगळा फराळ ९ ठिकाणी एअर कार्गो ने पाठवण्यासाठी चांगले दर उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी मदत केली. ‘हिंदू नव वर्ष स्वागत समिती, दहिसर’ ला यावर्षी सद्गुरू एज्युकेशन आणि वेलफेअर ट्रस्ट, विविसु डेहरा, भारत विकास परिषद (पनवेल शाखा), आनंदवन मित्र मंडळ -मालाड या संस्थांचीही मोलाची मदत मिळाली.  सरोज स्वीट्स – चेंबूर, चांदेरकर स्वीट्स- प्रभादेवी , बेडेकर अँड सन्स- गिरगाव यांनी उत्तम दर्जाचा फराळ बनवून दिला.

या सर्वाचे फलश्रुत म्हणजे यावर्षी आपण ८००८ सैनिकांपर्यंत फराळ पोहोचण्यात यशस्वी झालो आहोत. यात, लेह- लडाख, तेजपुर -आसाम, जोरहाट -आसाम, उधमपुर -जम्मु, तवांग -अरुणाचल प्रदेश, शिलॉंग- मेघालय ,मणिपूर, इंफाळ, गुवाहाटी या सीमावर्ती भागातील सैनिकां पर्यंत आपला फराळ पोहोचला आहे.  लेह येथील अतिथंड वातावरणात सैनिकांना उपयोगी पडतील अशा २५०० सन स्क्रीन बॉटल्स देखील आपण पाठवल्या आहेत.

आज ही सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवताना, एक वेगळंच समाधान अनुभवाला मिळत आहे. आपल्यातील कित्येकांशी बोलताना आपली सैन्याविषयीची कळकळ, प्रेम, विश्वास आणि काळजी ही जवळून अनुभवली, कित्येक प्रसंगी आपल्या सोबत आम्हीही भावूक झालो. आपण केलेल्या कौतुकाची प्रत्येक थाप ही आमच्यासाठी कोणत्याही पुरस्काराहून कमी नाही. या उपक्रमाचे 100% श्रेय हे या उपक्रमात सहभागी झालेल्या आपल्या सर्व देशभक्त नागरिकांना जाते.

जय हिंद। भारत माता की जय।

  • अश्विनी साखळकर
Back to top button