क्रांतिकारी संघटनेमधील सक्रीय सहभाग – अनुशीलन समिती
लेखमाला – विश्वगुरु भारत – संघाचे अंतिम ध्येय – भाग 4
ब्रिटीश साम्राज्यवादाच्या अन्यायाच्या तावडीत सापडलेल्या भारताला स्वतंत्र करण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा पाया तयार करण्याच्या हेतूने डॉ. हेडगेवार कलकत्त्याला गेले. तत्कालीन राष्ट्रीय नेत्यांच्या पुढाकाराने त्यांना पाठविण्यात आले होते. या नेत्यांमध्ये लोकमान्य टिळकांचाही सहभाग होता. डॉ हेडगेवार हे टिळकांच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या विचारांनी प्रभावित झाले होते. त्यांनी अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेशी स्वतःला जोडून घेतले. त्याचवेळी ते नागपुरातील राष्ट्रीय घटनांमध्येही सक्रीय होते.
१९१०मध्ये डॉ हेडगेवार हे कलकत्त्याला गेले. कलकत्त्यातील नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी डॉ. मुंजे यांच्याकडून घेतलेल्या परिचयपत्राची त्यांना विशेष मदत झाली. कलकत्त्यातील मेडिकल कॉलेजचे व्यवस्थापन आणि शिक्षक हे त्यांच्या राष्ट्रीय विचारांनी प्रभावित झाले होते. केशवरावांना कलकत्त्याला पाठविण्यामागे मुख्य उद्देश होता तो त्यांना सशस्त्र क्रांतीचे प्रशिक्षण देण्याचा. जेणेकरून भारतात १८५७च्या धर्तीवर ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करता येईल.
कुशल लोकसंघटक
डॉ. हेडगेवार हे एक उत्तम नेते आणि संघटक होते. जे कुणी केशवरावांना भेटत त्यांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळत असे व ते अनुशीलन समितीमध्ये(ANUSHILAN SAMITI) येण्यास तयार होत असत, ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट होती. देशभरातील जवळपास प्रत्येक राज्यातील विद्यार्थी नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये शिकण्यास येत असत. डॉक्टरांनी त्यांचे राष्ट्रीय चळवळीचे भव्य स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने याकडे संधी म्हणून पाहिले. मोतीलाल घोष, विपिनचंद्र पाल आणि रासबिहारी बोस यांच्यासारख्या राष्ट्रीय आणि हिंदू विचारांच्या नेत्यांशी त्यांच्याशी त्यांचे चांगले ऋणानुबंध होते.
त्यांचा स्वभाव, अथकपणे मेहनत करण्याची सवय आणि एकमेकांना जोडून ठेवण्याचे कौशल्य यामुळे ते राज्यांमध्ये विविध होणाऱ्या चळवळींमध्ये एक दुवा झाले. बंगालमध्ये अनेक कारखान्यांमध्ये गुप्तपणे शस्त्रास्त्रे बनविली जात असत. भारतभरातील, विशेषतः मध्य प्रांतातील सर्व क्रांतिकारकांना येथूनच शस्त्रास्त्रे पुरविली जात असत. डॉक्टरांनी अत्यंत काळजीपूर्वक रीतीने व मेहनतीने हे कार्य केले. त्यांनी भारतातल्या महत्त्वपूर्ण भागांतील देशभक्त क्रांतिकारकांची मोठी साखळी तयार केली.
सतर्क राष्ट्रवाद्याची तीव्र दृष्टी
डॉक्टर हेडगेवार आणि त्यांचे सहकारी यांचा मोठे क्रांतिकारक असा उल्लेख केलेला एक अहवाल सरकारी दक्षता विभागाने पाठविला होता. परंतु सतर्क राष्ट्रवादी विचारांचे डॉ हेडगेवार(HEDGEWAR) हे सरकारी यंत्रणांच्या एक पाऊल पुढे होते. त्यामुळे विभाग त्यांच्याविरूद्ध एकही पुरावा मिळवू शकला नाही. एखादी घटना घडून गेल्यानंतर त्यांना त्याची माहिती मिळत असे. त्यांची कार्ये, त्यांचे नेते, कार्यपद्धती आणि त्यांचे सहकारी याबद्दल अधिकाधिक प्रयत्न करूनही माहिती सरकारी अधिकाऱ्यांना मिळत नसे.
अनुशीलन समितीचे सदस्य या नात्याने डॉक्टरांवर सोपविलेले काम ते काळजीपूर्वक आणि संपूर्ण समर्पित वृत्तीने करीत असत. शस्त्रास्त्रे जमविणे, वितरीत करणे, कार्यवाहीची योजना तयार करणे आणि अमलात आणणे, भूमिगत क्रांतिकारकांना लपवण्याची व्यवस्था करणे आणि त्यांना सरकारी यंत्रणांपासून वाचविणे, अशी अनेक कामे त्यांनी केली. केशवरावांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी गुप्तचर संस्थांच्या एका तरूण ऑफिसरची नेमणूक करण्यात आली होती. त्या ऑफिसरने त्यांच्या वसतीगृहात राहण्याची सोय करून घेतली. त्याचा डाव सतर्कतेमुळे आणि उत्तम निरीक्षणामुळे केशवरावांच्या लक्षात आला. एकदा तो ऑफिसर बाहेर गेला असता केशवने त्याची बॅग उघडली व त्यातील सगळी माहिती मिळवली. त्यांनी आपल्या मित्रांना सावध केले आणि आवश्यक पावले उचलून तो हेर आपल्यावर लक्ष ठेवत असल्याची खातरजमा केली.
केशवराव – समाजसेवेत अग्रणी
अभ्यास आणि अनुशीलन समिती (ANUSHILAN SAMITI) कार्य करता करता केशवने समाजसेवेतही आणि अन्य सामाजिक घडामोडींमध्येही आपला सक्रिय सहभाग नोंदविला. १९१३ साली दामोदर नदीला आलेल्या पुराने हाहाकार उडाला. अनेक घरे आणि नागरिकांचे जीवनमान उद्ध्वस्त झाले. अनेक सामाजिक संघटनांनी तत्परतेने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले. रामकृष्ण मिशनचे तरुण साधू आणि भाविकांनी मदतकार्यात आघाडी घेतली. केशवराव आणि त्यांचे मित्र रामकृष्ण मिशनच्या खांद्याला खांदा लावून या कार्यात उतरले. कोणीही जाण्याचे धाडस करणार नाही अशा अनेक धोकादायक स्थळी जाऊन या तरुणांनी लोकांचे प्राण वाचविले. कित्येक मैल चिखल तुडवत केशव आणि त्याच्या मित्रांनी दुर्गम गावात मदत आणि भुकेल्यांना अन्न पोहोचविले, आजाऱ्यांची रात्रंदिवस काळजी घेतली. कॉलराच्या साथीत कलकत्त्यातील आजाऱ्यांना मदत करण्यासाठी केशव आणि त्याच्या मित्रांनी अपरिमित कष्ट घेतले.
भविष्यकालीन कार्यासाठी सिद्ध
अनुशीलन समितीत (ANUSHILAN SAMITI) काम करताना डॉक्टरांनी संस्थेचे काम आणि संघटनात्मक रचना याचे नीट अनुकरण केले. एखादे काम गुप्तपणे करताना योजना कशी करावी व कामाचे गटांमध्ये विभाजन कसे करावे हे शिकून घेतले. अनुशीलन समितीमधील अनुभवाने त्यांच्या भविष्यकालीन योजनांचा पाया घातला. विविध राज्यांतील अनेक युवकांच्याही ते संपर्कात आले.
केशवराव भारतामध्ये आकार घेणार्या एका संभाव्य सशस्त्र क्रांतीचा पाठपुरावा करीत होते. कलकत्त्यात पाच वर्षे शिक्षण घेत असताना आणि अनुशीलन समितीत काम करताना त्यांनी राष्ट्राच्या सत्त्वाचाही अभ्यास केला. देशाला पूर्ण स्वातंत्र्य मिळविण्याच्या दृष्टीने क्रांतिकार्य, समर्पितता आणि संपूर्ण जीवन बहाल करण्याचे संपूर्ण प्रशिक्षण त्यांना या काळात मिळाले. १९१५साली ते नागपुरात परतले. राष्ट्राला संपूर्णपणे समर्पित होणाऱ्या राष्ट्रीय विचारांच्या नागरिकांचे संघटन करण्याची आवश्यकता त्यांना भासू लागली.
नागपुरात(NAGPUR) परतल्यावर जराही विश्रांती न घेता डॉ. हेडगेवार लगेच कामाला लागले. ब्रिटीशांच्या अमलातून पूर्णपणे स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीने लढा देण्याचे बरेच पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध होते. परंतु केशवरावांनी अशा एका ठोस कृतीचे चिंतन सुरू केले होते जी कृती ब्रिटिश साम्राज्याला अंतिम आणि जोरदार दणका देणार होती.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक आहेत)