जळगाव, विसंकें – विद्यमान ठाकरे सरकारवर ठपका ठेवत जळगावातील एका एसटी वाहकाने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघड झाली. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने आपल्या आत्महत्येसाठी ठाकरे सरकारला जबाबदार धरले आहे. आत्महत्येमुळे एसटी कर्मचारी आणि महाराष्ट्रभरातील अन्य नागरिकांमध्ये सरकारविरोधात संतापाचे वातावरण पसरले आहे. गेले अनेक महिने पूर्ण वेळ काम करूनही एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. कर्मचाऱ्यांचा संतापचा कडेलोट झाला असल्याचेच या आत्महत्या प्रकरणावरून दिसून येत आहे.
जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील या कंडक्टरचे नाव मनोज चौधरी (३०) असे आहे. ‘माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती आणि ‘ठाकरे सरकार’(THAKRE SARKAR) जबाबदार आहे, अशी चिठ्ठी लिहून त्याने दिवाळीपूर्वीच आपले जीवन संपवले. माझ्या आत्महत्येला मराठी माणसाचे ठाकरे सरकार (शिवसेना)SHIV-SENA जबाबदार आहे, असा थेट आरोपच त्यांनी या चिठ्ठीत केला आहे. मागील चार महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने घरात खायचे काय, असा प्रश्न आज अनेक एसटी कर्मचाऱ्यांपुढे आहे. त्यातच आता हे चौधरी यांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या संतापात भर पडली असून सरकारविरोधातील राग अधिक तीव्र झाला आहे
रत्नागिरीतही कर्मचाऱ्याने संपविले जीवन
रत्नागिरी एसटी महामंडळ बस आगारात एका बस वाहकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पांडुरंग संभाजीराव गडदे, असे या बस वाहकाचे नाव असून ते रत्नागिरी एसटी बस आगारात सेवेत होते. ८ नोव्हेंबर रोजी नांदेड ते रत्नागिरी, अशी नियोजित फेरी करून आल्यानंतर ते आगाराच्या खोलीत जाऊन झोपी गेले दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांचे सहकारी पी. ए. तांदळे त्यांना उठवण्यासाठी गेले. खोलीचा दरवाजा ठोठावल्यानंतर कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. तांदळेंनी दार तोडून आत प्रवेश केला असता गडदे यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले.
एसटी कामगारांना दिवाळीपूर्वी दोन महिन्यांचे थकीत वेतन, ऑक्टोबरचे देय झालेले वेतन, महागाई भत्ता व शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सणासाठी उचल मिळावी, या मागण्यांसाठी सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आक्रोश आंदोलन सुरू आहे. करोनाच्या कालावधीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करत असूनही वेतन त्यांना मिळत नसल्याने कामगारांमध्ये असंतोष वाढलेला आहे. आर्थिक विवंचनेतून दोन कामगारांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचललल्याने या संतापात भर पडली आहे. किरिट सोमैया, नितेश राणे, गिरीश महाजन, अतुल भातखळकर आदी राजकारण्यांनी या प्रकरणी महाविकास आघाडी सरकार व शिवसेना यांना धारेवर धरले आहे.
अन्वय नाइक आत्महत्येच्या चिठ्ठीत अर्णव गोस्वामी यांचे नाव आल्याबद्दल त्यांना अटक करणारे राज्य सरकार आता परिवहनमंत्री अनिल परब यांना अटक करणार का, असा संतप्त सवाल अतुल भातखळकर यांनी विचारला आहे.
एसटी कर्मचा-यांना गेले तीन महिने पगार न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. पगार मिळत नसल्यामुळे गेल्या दोन दिवसात एसटीच्या (STATE TRANSPORT)दोन कर्मचा-यांनी आत्महत्या केली आहे. तरीही हे ठाकरे सरकार अजूनही झोपले आहे. त्यामुळे या एसटी कर्मचा-यांच्या आत्महत्येला जबाबदार असणा-या ठाकरे सरकारवर ३०२ कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी आग्रही मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
“काळ जरी कठीण असला तरी, आत्महत्येसारखे अघोरी पाऊल कर्मचाऱ्यानी उचलू नये” असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी केले आहे. तसेच, गेले ३ महिने एसटीच्या थकीत वेतनापैकी ऑगस्ट महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर आजपासून जमा होईल, ज्या कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त बिनव्याजी उचल हवा असेल त्यांना तातडीने देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती मंत्री परब यांनी दिली आहे.
दरम्यान, रिपब्लिक वाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांचा अंतरिम जामीनअर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपींनी नियमाप्रमाणे अलिबाग सत्र न्यायालयात जाऊन अर्ज करावा, अशा सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत. यामुळे अर्णव यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
**