नवी दिल्ली, दि. १२ नोव्हेंबर – स्वामी विवेकानंदांच्या(SWAMI VIVEKANAND) व्यक्तिमत्त्वातून प्रकट होणारे आत्मविश्वास आणि चारित्र्य हे गुण नव्या शैक्षणिक धोरणाचा मूलाधार असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात(जेएनयू) स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व्हर्चुअल पद्धतीने अनावरण केल्यानंतर ते बोलत होते.
आत्मनिर्भर भारत तसेच अन्य सरकारी योजनांचा आढावा घेत त्यांची प्रेरणा स्वामी विवेकानंदांच्या जीवनातून कशी आलेली आहे हे पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले आणि जेएनयूमधील बुद्धीमंतांनी याचा अभ्यास करायला हवा असे सांगितले.
आत्मनिर्भरता (AATMNIRBHAR) म्हणजे आत्ममग्नता नव्हे. भारताची आत्मनिर्भरता संपूर्ण विश्वाच्या भल्यासाठी असते. आत्मवत सर्वभूतेषु ही विश्वकल्याणाची भावना भारतीय चिंतनाच्या मूळाशी असल्याने सामर्थ्यसंपन्न भारत हा नेहमीच संपूर्ण जगाला लाभदायी ठरलेला आहे, असे सांगत त्याची नाळ आपल्या सरकारने वेगवेगळ्या क्षेत्रात राबविलेल्या सुधारणांशी कशी जोडलेली आहे याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले.
गुड रिफॉर्म्स इज बॅड पॉलिटिक्स ही उक्ती आमच्या सरकारने चुकीची ठरविली आहे. हे सरकार राबवित असलेल्या सुधारणांना लोकांचा मिळत असलेला पाठिंबा हा राजकीय यशातून प्रतिबिंबित होत आहे. याचे कारण या सुधारणा ‘नियत’ आणि ‘निष्ठा’ यांच्या मजबूत पायावर आधारित आहेत असे सांगताना अलिकडेच अमलात आणलेल्या कृषिसुधारणा विधेयकांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. पूर्वी सुधारणांच्या नावाखाली फक्त तोंडाची वाफ दवडली जात असे. तेव्हा शेतकऱ्यांच्या अपेक्षांचा विचार होत असे, आता त्यांच्या आकांक्षांवर काम होत आहे, असे सांगत शेतकऱ्यांना निर्यातदार बनविण्याचा मार्ग या विधेयकांनी खुला केल्याचे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.