मुंबई, दि. १९ नोव्हेंबर – रा.स्व.संघ(RSS) जनकल्याण समितीच्या(JANKALYAN SAMITI) माध्यमातून वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. ‘दीपावली भेट’ हा त्यातीलच एक उपक्रम आहे. यंदा या उपक्रमाच्या माध्यमातून ४८०० कुटुंबांनी आनंदमय दिवाळी साजरी केली. प्रत्येक कुटुंबास दिवाळीसाठी आवश्यक जिन्नसांचे कीट भेट देण्यात आले. जनकल्याण समितीच्या माध्यमातून मुंबईतील सोळा ठिकाणी एकूण ४३ वस्त्यांमध्ये हे वितरण करण्यात आले.
गेले अनेक महिने आपण सर्व कोरोनासंसर्गाशी झगडत आहोत. अनेकांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. दैनंदिन गरजा पूर्ण करणेही अनेकांना कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील सेवावस्त्यांमधील नागरिकांना दिवाळी आनंदाने साजरी करता यावी यासाठी जनकल्याण समितीच्या माध्यमातून या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या ‘दीपावली भेट’ किटमध्ये बेडेकर बेसन लाडू, चकली भाजणी, शंकरपाळे, चिवडा, वनस्पती तूप, साखर, रवा, चॉकलेट, दिवाळी शुभेच्छापत्र आणि रोषणाईसाठी मातीच्या पणत्यांचा समावेश होता. जनकल्याण समितीच्या कार्यसुविधेच्या दृष्टीने मुंबईत सोळा भाग तयार करण्यात आले आहेत. या सर्व सोळा भागांत सेवावस्त्यांमधील नागरिकांना ही दीपावली(DIWALI) भेट देण्यात आली.
जनकल्याण समितीच्या माध्यमातून मागील २०-२५ वर्षे वनवासी क्षेत्रांमध्ये नियमित दीपावली भेटींचे वितरण केले जात आहे. यंदा कोरोनाप्रादुर्भावामुळे मुंबईतील सेवावस्त्यांचा विचार करून हा उपक्रम आखण्यात आला. हम सबकी जिम्मेदारी, सब के घर हो दीपावली! असे बोधवाक्य या उपक्रमाला देण्यात आले होते. या भेटींसाठी नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. एका किटचे मदतमूल्य ५०० रुपये ठेवण्यात आले होते. या आवाहनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, जनकल्याण समितीच्या माध्यमातून कोरोनाकाळात(CORONA) विविध स्वरुपाचे मदतकार्य करण्यात आले. जनकल्याण समितीच्या माध्यमातून ६८ लाख लोकांना अन्नवितरण, ५० हजारपेक्षा अधिकांना शिधा, त्याचप्रमाणे सॅनिटायझर, मास्क, सॅनिटरी पॅड्स, रक्तदान, पीपीई किटचे वितरण केले.