HinduismRSS

कठोर तुरुंगवासातही जपले दृढ राष्ट्रवादी जीवन(लेखमाला – विश्वगुरु भारत – भाग ८)

डॉ. हेडगेवार(HEDGEWAR) यांचा हिंदू धर्मातील तत्त्वांवर दृढ विश्वास होता. तुरुंगात असतानाही अनेक परंपरा ते पाळत असत. हिंदू परंपरांना अनुसरून त्यांनी यज्ञोपवित(जानवे) धारण केले होते. तुरुंगांचे नियम ऐकवत जेलरने त्यांना जानवे काढण्यास सांगितले. या आदेशाला ठाम नकार देत ते म्हणाले, मी जानवे काढणार नाही. तो माझा धार्मिक अधिकार आहे. माझ्या धार्मिक बाबीत ढवळाढवळ करण्याचा तुम्हाला हक्क नाही.

तुरुंगाचा पर्यवेक्षक आयरिश होता. डॉ. हेडगेवार यांच्या या दृढ संकल्पाने आणि धाडसाने तो पर्यवेक्षक भारावून गेला व त्याने त्यांना जानवे घालण्याची परवानगी दिली. तुरुंगातील सत्याग्रहींना हेडगेवार यांच्या धाडसी वागण्याने प्रेरणा मिळाली. तुरुंगाच्या नियमावलीनुसार सर्व सुविधा प्राप्त करण्यासाठी त्यांनी एकत्रित आंदोलन करून मागणी केली. यामुळे सत्याग्रहींनाही राजकीय बंदिवानांचा दर्जा मिळाला.

कठोर कारावासातही कट्टर देशभक्ताचा उत्साह

असहकार आंदोलनात सहभागी झाल्याने डॉक्टरांचे अनेक तरुण सहकारीही अटक होऊन त्याच तुरुंगात आले. बापूजी पाठक, रघुनाथ रामचंद्र, पं. राधामोहन गोकुळे हे काँग्रेसनेते, या सगळ्यांचा त्यात सहभाग होता. तसेच २२ वर्षीय मुस्लीम राष्ट्रवादी नेता काझी इमानुल्ला हे देखील तुरुंगात आले होते. खिलाफत चळवळीत सहभागी झाल्याबद्दल त्यांना एका वर्षाच्या कठोर तुरुंगवासाची शिक्षा झाली होता. उत्साही धर्माभिमानी इमानुल्ला रोज सकाळी मोठ्या आवाजात कुराणचे पठण करीत असत. अन्य राजकीय बंदीवानांची त्यामुळे झोपमोड होत असे. मन वळविण्याचा अनेकदा प्रयत्न करूनही त्यांनी आपले धोरण काही बदलले नाही. दुसरे बंदीवान पंडीत राधामोहन यांनी मोठ्या आवाजात रामचरितमानसचे पठण करण्यास सुरुवात केली. पंडीतजींच्या मोठ्या आवाजाने योग्य जाणीव झालेल्या इमानुल्ला यांनी नम्र आवाजात पठण करण्यास सुरुवात केली. आपल्या धर्माप्रती या मुस्लीम तरुणाची भक्ती आणि समर्पितता लक्षात आल्याने डॉ. हेडगेवार त्यांना नेहमी हसऱ्या चेहऱ्याने नमस्कार करीत असत. लवकरच इमानुल्ला हे डॉक्टरांचे निस्सीम चाहते झाले.

तुरुंगात प्रत्येक बंदीवानाला वेगवेगळे काम देण्यात आले होते. दोर वळणे, धान्य दळणे, शेतीशी संबंधित कामे आणि पुस्तकबांधणी अशी वेगवेगळ्या स्वरुपाची कामे असत. डॉ. हेडगेवार यांना पुस्तकबांधणी अर्थात बाईंडिंगचे काम देण्यात आले होते. यात खळ तयार करणे, चिकटवणे आणि कागद कापणे याचा समावेश असे. या कामांमुळे त्यांच्या तळहातांना अनेक जखमा झाल्या होत्या. मातृभूमीच्या प्रेम आणि भक्तीसाठी सर्व दुःख, छळ त्यांनी हसत हसत सहन केले. या त्रासाला ते स्वातंत्र्यसैनिकाचा अभ्यासक्रम म्हणत असत. अभ्यास केल्याशिवाय परीक्षेत उत्तीर्ण होता येणार नाही यावर त्यांचा विश्वास होता. त्या काळात मध्य प्रांतातील काँग्रेस समितीचे डॉ. हेडगेवार हे महत्त्वाचे सदस्य होते. ते एक सन्माननीय सत्याग्रही होते. छोट्या छोट्या भांडणांचा त्यांना राग येत असे. त्यांनी त्यांचे नियोजित काम समर्पित वृत्तीने सुरू ठेवले. त्यांनी अन्य बंदिवानांना राजकीय प्रशिक्षण दिले. स्वातंत्र्य, स्वधर्म आणि सत्याग्रह यावर चर्चा केली असती. आपल्या सहकाऱ्यांना सशस्त्र लढ्याचे शिक्षण न घाबरता दिले. हिंदू आदर्श आणि प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या समृद्ध जीवनाची माहिती आपल्या सहकाऱ्यांना देऊन त्यांच्या मनात राष्ट्रवादाची आणि अभिमानाच्या भावनेची रुजवण केली.  

डॉ. हेडगेवार यांच्या सूचनेवरून आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन तुरुंगातील सत्याग्रहींनी जालियानवाला बाग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिवशी संपावर जाण्याचा निर्णय प्रत्येकाने घेतला तेव्हा इमानुल्ला यांनी संपात सहभागी होण्यास नकार दिला. ते खिलाफत खिलाफत अशा घोषणा देत असत व कोणत्याही उत्सवात तसेच सामुहिक उपक्रमात सहभागी होत नसत. परंतु डॉक्टरांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाने त्यांना अन्य सत्याग्रहींसोबत जोडण्याचे काम केले. तुरुंगाच्या नियमानुसार राजकीय आणि अ-राजकीय बंदिवानांना एकाच प्रकारचे अन्न आणि कपडे दिले जात असत. परंतु अमर हुतात्मा यतिंद्रनाथ सन्याल यांच्या साठ दिवसांच्या उपोषणानंतर राजकीय बंदीवानांसाठी वेगळा विभाग करण्यात आला.

असहकार आंदोलन रद्दबातल करण्यावर डॉ. हेडगेवारांचे प्रश्न

एका वर्षाच्या कठोर कारावासात असताना डॉ. हेडगेवार यांना समजले की, ब्रिटिशांविरोधात देशभर सुरू असलेले असहकार आंदोलन गांधीजींनी अचानक मागे घेतले आहे. आंदोलन हे अंतिम आणि महत्त्वाच्या टप्प्यात असताना अशा निर्णयाने डॉक्टरांना धक्का तर बसलाच, अतीव दुःखही झाले. रात्रंदिवस एक करून आंदोलनाच्या यशस्वितेसाठी झटणाऱ्या कोणाही नेत्याशी चर्चा न करता गांधीजींचे एकतर्फी निर्णय घेणे हे काही शहाणपण नव्हते. कार्यकर्त्यांमध्ये समर्पितता आणि शिस्तीचा अभाव होता का? नेत्यांच्या कार्यक्षमता वा विश्वासार्हता यामुळे आंदोलनाचे नुकसान झाले होते का? काही स्वतंत्रपणे घडलेल्या हिंसात्मक घटनांसाठी संपूर्ण आंदोलनच मागे घेऊन गांधीजींनी काय साधले? असे अनेक प्रश्न डॉ. हेडगेवार यांच्या मनात साठले होते.

गांधीजींच्या इच्छा आणि योजनेनुसार अहिंसेच्या मार्गाने असहकार आंदोलन व्यवस्थित सुरू होते. उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे ५ फेब्रुवारी १९२२ रोजी चिडलेल्या जनसमूहाने – यात पोलिसांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या समावेश असणाऱ्यांचा समावेश होता – स्थानिक पोलीस स्थानक जाळले. या हिंसात्मक कारवाईत १२ पोलीस मारले गेले. या घटनेला एक आठवडा पूर्ण होण्याच्या आत गांधीजींनी आंदोलन मागे घेतले. गांधीजींना त्यावेळी आपले मनोगत व्यक्त केले होते. ते म्हणाले, सामूहिक असहकार आंदोलन हे तर्कसंगत आणि न्याय्य वाटण्यामागे जो तर्क होता त्याबाबत देवाने मला तिसऱ्यांदा धोक्याची सूचना दिली. असहकार आंदोलनाचे वातावरण या घटकेला भारतात तयार होणे शक्य नाही.(भावनांना वाट करून देताना गांधीजींनी शिस्त, समर्पण, सातत्य आणि वचनबद्धता हा मजबूत संघटनेचा पाया असल्याचे मान्य केले होते)

तुरुंगातील सखोल विश्लेषण

डॉ. हेडगेवार १२ जुलै १९२२ रोजी तुरुंगातून बाहेर आले. डॉ. मुंजे, डॉ. परांजपे अशा काँग्रेस नेत्यांनी पुष्पमाला घालून व पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. त्यांच्या घराच्या मार्गावर अनेक स्वागतकमानी उभारण्यात आल्या होत्या. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर डॉक्टरांची स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याची इच्छा तीव्र झाली. नागपुरातून प्रकाशित होणाऱ्या महाराष्ट्र साप्ताहिकात म्हटले होते की, डॉ. हेडगेवार यांची राष्ट्रभक्ती, निस्वार्थीपणा आणि त्यांचा दृढ लक्ष्यवेधी दृष्टीकोन याबाबत कोणाच्याही मनात शंका नव्हती. ही सर्व वैशिष्ट्ये त्यागाच्या भट्टीतून तावून सुलाखून तयार झाली होती. देशकार्यासाठी अजून शंभरदा ही गुणवैशिष्ट्ये वापरली जातील अशी आशा आहे.

चिटणीस पार्कात त्यांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. डॉ. खरे यांनी मांडलेला स्वागत प्रस्ताव एकमताने संमत झाला. त्यानंतर काँग्रेस नेते हाकिम अजमल खान आणि  राजगोपाल चारी यांनी डॉक्टरांचे स्वागत केले. मोजक्या पण शहाण्या शब्दांत डॉक्टरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, आपण देशासाठी सर्वोत्तम आणि सर्वोच्च असेल असे ध्येय ठरविले पाहिजे. संपूर्ण स्वातंत्र्य हेच आपले ध्येय असले पाहिजे. चर्चा करणे योग्य नसेल कदाचित पण आपण लक्ष्य ठेवले पाहिजे. आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्यासाठी जीवनाचा त्याग करावा लागला तर त्याची काळजी असता कामा नये. हा संघर्ष उच्च आदर्श आणि शांत डोक्यानेच व्हायला हवा.

एक वर्ष तुरुंगात परिश्रम घेतल्यानंतर डॉ. हेडगेवार हे शारीरीकदृष्ट्या मुक्त झाले असले तरी त्यांचे मन मात्र विविध विचार आणि योजनांत गुंतलेले होते. ब्रिटिशांच्या(BRITISH) अमलातून भारतमातेला मुक्त करणे ही त्यांची मुख्य काळजी होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो आजवर सैनिक होऊन यशस्वीपण लढला त्याला आता सेनापती होऊन झुंज द्यायची होती आणि आव्हानांना तोंड द्यायचे होते. एका वर्षाच्या कठोर तुरुंगवासात त्यांनी केलेले सखोल विश्लेषण आणि वैचारिक घुसळण याने त्यांचा द्रष्टा विचार, भविष्यकालीन योजना आणि रणनीती याचा पाया घातला जात होता.

(लेखक ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक आहेत)

…. पुढे चालू…

(छायाचित्र सौजन्य – साप्ताहिक ऑर्गनायझर)
**

Back to top button