पेण, दि.२१ नोव्हेंबर – जनकल्याण समिती(महाराष्ट्र प्रांत)(JANKALYAN SAMITI MAHARASHTRA)च्या वतीने पेण तालुक्यातील चार वनवासी पाड्यांवर दिवाळीनिमित्त(DIWALI) भाऊबीज भेटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वनवासी बंधुभगिनींना साड्या,फराळ आणि भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
शहरातील बंधू आणि भगिनींनी पाठविलेली प्रेमाची भाऊबीज वनवासी भगिनींना देण्याचा कार्यक्रम जनकल्याण समितीच्या माध्यमातून पार पडला. तालुक्यातील भेंडीची वाडी, दर्गा वाडी, शबरीची वाडी व दवणसार वाडी या वाड्यांमध्ये भाऊबीजेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व वनवासी भगिनींना भाऊबीजेची भेट म्हणून नवीन साडी व दिवाळी फराळाचे एक पाकीट भेट म्हणून देण्यात आले. लहान मुलांना त्यांच्या वयोगटानुसार खेळणी व बिस्किटाचा पुडे देण्यात आले. कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला ५०० मिलिलिटरची सॅनिटायझर बाटली व प्रत्येकी ४ मास्कची पाकिटे वितरित करण्यात आली. या उपक्रमासाठी जवळ जवळ ७२ देणगीदारांनी आर्थिक मदत करून आपला सहभाग नोंदवला.
यावेळी एकूण १०० साड्या व फराळाची पाकिटे तसेच लहानमोठी ९० खेळणी वितरीत करण्यात आली. कोरोना(CORONA) पासून बचाव करण्यासाठी १०० सॅनिटायझर बॉटलस् व ४०० मास्कचही वितरण करण्यात आले.
जनकल्याण समितीच्या वतीने यंदा मुंबईतील(MUMBAI) सेवा वस्त्यांमध्येही पाच हजार कुटुंबांना दिवाळी भेट देण्यात आली. मुंबईतील सोळा ठिकाणी एकूण ४३ वस्त्यांमध्ये हे वितरण करण्यात आले. जनकल्याण समितीच्या माध्यमातून मागील २०-२५ वर्षे वनवासी क्षेत्रांमध्ये नियमित दीपावली भेटींचे वितरण केले जात आहे. यंदा कोरोनाप्रादुर्भावामुळे मुंबईतील सेवावस्त्यांचा विचार करून हा उपक्रम आखण्यात आला.