चेन्नई, दि. २३ नोव्हेंबर – अखिल भारतीय हिंदू महासभेचे(HINDU MAHASABHA) तामिळनाडू(TAMILNADU) राज्याचे कार्यवाह नागराज यांची २२ नोव्हेंबर रोजी कृष्णगिरी येथे भरदिवसा हत्या करण्यात आली. नागराज हे विल्लंगम मासिकाचे संपादक राहिले होते. मृत्यूसमयी ते ४५ वर्षांचे होते.
रविवारी नागराज मॉर्निंग वॉकसाठी गेले असता गाडीतून आलेल्या सहा जणांच्या टोळीने त्यांना हटकले व काही लक्षात येण्याच्या आतच त्यांच्यावर हल्ला केला. नागराज यांनी त्यांच्या तावडीतून सुटून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पाठलाग करून त्यांना ठार मारण्यात आले. ही घटना नागराज यांच्या घरासमोर भर वस्तीत घडली. होसूर येथील हनुमाननगर मधील आपल्या घरातून सकाळी साडेआठ वाजता नागराज हे चालण्याचा व्यायाम करण्याकरीता बाहेर पडले होते. काही दिवसांपूर्वी मोटारबाईकवरून जात असताना त्यांना अडवून दुखापत करण्याचा प्रयत्न काही हत्यारे घेतलेल्या हल्लेखोरांनी केला होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात नागराज यांच्या डोके, पाय, हात आणि पोटावर अनेक खोल जखमा झाल्या होत्या. त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जवळून जाणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. शासकीय रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कृष्णगिरी सरकारी रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. नागराज यांच्या पश्चात पत्नी मंजुळा, एक मुलगा व तीन मुली आहेत.
पोलीस अधीक्षक बंदी गंगाधर म्हणाले की, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष टीम तयार करण्यात आली आहे. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमागे एखादे राजकीय वा धार्मिक वा व्यावसायिक कारण नाही ना याचा पोलीस तपास करीत आहेत. होसूर(HOSSUR) पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या हत्येबाबत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. येथील भाजपा नेत्यांनी हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे.
विशेष म्हणजे, भाजपाचे युवा नेते रंगनाथन यांचीही कृष्णगिरी जिल्ह्यातील केलमंगलम येथे अशाच प्रकारे सप्टेंबर महिन्यात हत्या करण्यात आली होती.
सौजन्य – साप्ताहिक ऑर्गनायझर