१०० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली अन्नपूर्णेची मूर्ती भारतात परतणार

मुंबई, दि. २४ नोव्हेंबर – शंभर वर्षांपूर्वी चोरीला गेलेली भारतातील अन्नपूर्णेची(AANAPURNA) मूर्ती परत मिळणार असल्याचे समजते. कॅनडातील (CANADA)एका विद्यापीठाने वाराणसीतून चोरीला गेलेली ही मूर्ती भारताला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐतिहासिक घोडचुका आणि वसाहतवादाचा हिणकस वारसा दुरुस्त करण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे या विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
पत्रकार आणि इतिहासतज्ज्ञ नॉर्मन मॅकेन्झी यांचा संग्रह पाहात असताना भारतीय वंशाच्या कलाकार दिव्या मेहरा यांना रेजिना विद्यापीठातील मॅकेन्झी कला दालनात ही मूर्ती दृष्टीस पडली. ही मूर्ती कॅनडात अवैधरित्या उचलून आणल्याचा मुद्दा त्यांनी उचलून धरला होता. त्यानंतर या मूर्तीचे तपशील प्राप्त करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार १९१३ साली वाराणसी येथून ही मूर्ती चोरीला गेली होती. भारताच्या दौऱ्यावर असताना इतिहासतज्ज्ञ मॅकेन्झी यांचे लक्ष या मूर्तीने वेधून घेतले होते. ही मूर्ती मिळविण्यासाठी त्यांची इच्छा पाहून एका व्यक्तिने ही मूर्ती चोरली होती. विद्यापीठाने ही सांस्कृतिक चोरीची चूक दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला. संबंधित मूर्ती भारताला परत करीत असल्याचे पत्र कॅनडातील भारताचे उच्चायुक्त अजय बिसारिया यांना अंतरिम राष्ट्रपती व विद्यापीठाचे उपकुलपती थॉमस चेस यांना दिले आहे.
अजय बिसारिया याबाबत म्हणाले की, दुर्मिळ अशी अन्नपूर्णेची मूर्ती आपल्या घरी परत जात आहे याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. भारताचे सांस्कृतिक प्रतीक परत करण्याप्रती रेजिना विद्यापीठाने दाखविलेल्या कटिबद्धतेबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. यामुळे भारत-कॅनडा यांच्या संबंधांत असलेला समजूतदारपणा आणि खोली याचेच दर्शन घडते.
**