‘आत्मनिर्भरता’ शब्द ऑक्सफर्डमध्ये समाविष्ट
लंडन, दि. ३ फेब्रुवारी – कोविड संकटातून बाहेर पडण्यासाठीची प्रेरणा म्हणून पंतप्रधान मोदी यांनी भारताला आणि जगाला आत्मनिर्भरतेचा मंत्र दिला. स्वावलंबनाची शिकवण देणारा गेल्या वर्षातील सर्वाधिक उपयोगात आणला गेलेला ‘आत्मनिर्भरता’ हा शब्द ऑक्सफर्ड इंग्रजी शब्दकोशात ‘वर्ड ऑफ द इयर’ (२०२०मधील हिंदी शब्द) म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे. कोरोना महामारीच्या आव्हानात्मक काळात असंख्य भारतीयांनी रोगावर मात करण्यात मिळवलेले यश या शब्दाने प्रतीत होते.
कृतिका अगरवाल, पूनम निगम सहाय आणि इमोगन फॉक्सेल यांच्या हिंदी शब्द निवडीच्या सल्लागार समितीने हा शब्द निवडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२०च्या मे महिन्यात हा शब्द सर्वप्रथम देशाला संबोधित करताना वापरला. कोविड निवारणासाठी आर्थिक पॅकेज घोषित करतेवेळी मोदी यांनी भारताला आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावर आत्मनिर्भर करण्याकडे आपण भर देणार असल्याचे सांगितले. भारताला आत्मनिर्भर करणे म्हणजे स्वयंपूर्ण होणे नाही किंवा जगापासून स्वतःला तोडणे नाही, तर आत्मनिर्भर होणे म्हणजे स्वतःला कायम टिकवणे आणि विकास करणे होय. पंतप्रधान मोदींच्या वेळोवेळच्या संबोधनांत आत्मनिर्भरता हा शब्द वरचेवर आला आणि तो सर्वसामान्यांच्या शब्दकोशातही समाविष्ट झाला, असे कृतिका अगरवाल यांनी सांगितले.
गेल्या वर्षभरातील होम स्कुलिंग, वर्क फ्रॉम होम, स्वतःच्या मनोरंजनासाठी आणि शारिरीक तंदुरुस्तीसाठी आपण शोधून काढलेले पर्याय, स्वतःसाठी अन्न शिजवणे, काही कारणामुळे कुटुंबापासून वेगळे राहावे लागणे असे अनेक पदर स्वावलंबन वा आत्मनिर्भरता या शब्दाला आहेत. २०२१मध्ये प्रवेश करताना कोविड लसींचे व्यापक स्वरुपात सुरू झालेले उत्पादन हा आत्मनिर्भर भारत अभियानातील एक मानबिंदू आहे. असेही अगरवाल म्हणाल्या.
**