पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित दर्शनलाल जैन यांचे सोमवार, ८ फेब्रुवारी रोजी वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. हरयाणा येथील आपल्या यमुनानगर येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. युवक आणि आर्थिकदृष्ट्या अविकसित मुलांना शिक्षण देण्याचे त्यांचे प्रयत्न वाखाणले जातात. लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा प्रवाह शोधून काढल्याच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
दर्शनलाल जैन यांचा जन्म १२ डिसेंबर १९२७ रोजी जगाधरी येथे एका उद्योगपती कुटुंबात झाला. १९४४ साली ते संघाच्या संपर्कात आले व १९४६मध्ये प्रचारक निघाले. भारत छोडो आंदोलनात सहभागी होणाऱ्या संघाच्या स्वयंसेवकांपैकी एक असणाऱ्या दर्शनलाल यांना गंभीर वृत्तीमुळे तरूण वयातच बाबूजी हे नामाभिधान प्राप्त झाले. तब्येतीच्या कारणामुळे १९५२ साली त्यांना प्रचारक जीवनातून परतावे लागले. मात्र त्यांची संघसाधना मृत्यूपर्यंत सुरू होती. सुमारे चार दशके ते हरयाणा प्रांताचे संघचालक राहिले. १९४८ आणि १९७५ साली तुरुंगवासही भोगला.
समाजसेवेत अग्रणी असलेल्या जैन यांना सक्रिय राजकारणात मात्र केव्हाही सहभाग घेतला नाही. १९५४ साली जनसंघाच्या माध्यमातून विधान परिषद सदस्यत्वासाठी त्यांची जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही.
दर्शनलाल जैन यांनी सरस्वती विद्या मंदिर, जगाधरी (1954), डीएवी कॉलेज फॉर गर्ल्स, यमुनानगर, भारत विकास परिषद हरियाणा, विवेकानंद रॉक मेमोरियल सोसायटी, वनवासी कल्याण आश्रम हरियाणा, हिंदू शिक्षा समिति हरियाणा, गीता निकेतन निवासी विद्यालय, कुरुक्षेत्र आणि नंद लाल गीता विद्या मंदिर, अंबाला (1997) यासह हरयाणातील विविध शाळा-महाविद्यालयांची त्यांनी स्थापना केली. विद्यार्थ्यांना इतिहासाची रूदी वाढावी यासाठी त्यांनी पाठ्यपुस्तके तयार केली. सुमारे तीन दशके ते हिंदू शिक्षा समितीचे अध्यक्ष होते.
ज्याप्रमाणे भगीरथाने अविरत परिश्रम करून गंगेला पृथ्वीतलावर आणले त्याचप्रमाणे दर्शनलाल जैन यांच्या अथक प्रयत्नांमुळे लुप्त झालेल्या सरस्वतीचा प्रवाह पुन्हा सुरू झाला. त्यांच्या सूचनेनुसार सरकारने लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा यमुनानगर येथील मुगलवाली अर्थात आदिबद्री गावातील प्रवाह शोधून काढला. ७२व्या प्रजासत्ताक दिनी या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.