सर्वसामान्य काश्मिरी नागरिक भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडला जातोय – उपराज्यपाल मनोज सिन्हा
मुंबई, १५ फेब्रुवारी(वि.सं.कें.) – नुकत्याच जम्मू-काश्मिरात पार पडलेल्या जिल्हा विकास समितीच्या निवडणुकांत मतदारांच्या संख्येत तिप्पट वाढ आढळून आली. युवकांपासून १०५ वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वांनीच प्रत्येक गावात उत्साहात मतदान केले. जम्मू-काश्मिरातील सर्वसामान्य नागरिक भारताच्या मुख्य प्रवाहाशी जोडला जात असून लोकशाहीवरील त्यांचा विश्वासही वाढत आहे, हेच यावरून दिसून येते. अनेक वर्षे दहशतीत व्यतित केल्यानंतर या भावनांचे सार्वजनिक प्रकटीकरण दिसण्यास अजून वेळ लागेल, परंतु जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचा विचार आता तेथील घरा घरात रुजू लागला आहे. कलम ३७० हटविल्यानंतर या प्रक्रियेस अजून गती मिळाली. या बदलाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते, असे प्रतिपादन जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत अरूण करमरकर लिखित ‘टिपणे काश्मिरची – अप्रकाशित घटनांवर प्रकाशझोत’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मनोज सिन्हा उपस्थित होते. रविवार, १४ फेब्रुवारी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीए मुकुंद चितळे होते. म्हणून तर भाजपाचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे आणि आमदार पराग अळवणी हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
सिन्हा म्हणाले की, बिहारसारख्या ११ कोटी लोकसंख्या असणाऱ्या राज्याचे बजेट २ लाख कोटींचा आहे. जम्मू-काश्मीरसारख्या दीड कोटी लोकसंख्या असणाऱ्या राज्याचे या वर्षीचे बजेट एक लाख कोटींचे आहे. पुढील अडीच वर्षांत जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक गावात वीज, रस्ते आणि पाणी अशा मूलभूत सेवा उपलब्ध करण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. एम्स, आयआयटी, आयआयएम केंद्रीय विद्यापीठ अशा अनेक राष्ट्रीय प्रकल्पांचा पाया राज्यात घातला गेला आहे. प्रत्येक गावाच्या पंचायतीस जागतिक दर्जाचे क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रत्येक गावातील निवडक १६ हजारांहून अधिक उद्यमींना पहिल्यांदाच जम्मू-काश्मीर बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
राज्याच्या विकासात अडसर ठरणाऱ्या अनेक कायद्यांमध्ये बदल करण्यात येत आहेत. राज्याच्या औद्योगिक धोरणांचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. काश्मिरी पंडितांच्या गृह योजना कार्यासही गती मिळाली आहे. ज्यांची जमीन ताब्यात घेण्यात आली असे नागरिक, संस्था आणि मंदिरांच्या जमिनींचा शोध घेण्याचे कार्य सुरू असून लवकरात लवकर त्यांची जमीन त्यांना परत देण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अरुण करमरकर यांनी यावेळी आपल्या पुस्तकाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरचा काश्मीरसंबंधी मोठा घटनाक्रम आज लोकांसाठी उपलब्ध आहे. त्याचे एकत्रिकरण मी केले असले परंतु, या माहितीचा स्रोत काश्मीर खोऱ्यातील अनेक दशके भीतीदायक वातावरणात जगणारा सामान्य माणूसच आहे. त्यांनी सांगितलेल्या घटना, दिलेली माहिती आणि घटनाक्रम अधिकृत संदर्भाच्या आधारे जोडत देशाच्या सामान्य वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.
पुस्तके केवळ घटनांचा अभ्यास करण्यासाठी नाही. आमच्या मनात ते वाचल्यानंतर काय विचार येतात आणि त्याच्या आधारे आपण काय कृती करतात हे पाहणे ही महत्त्वपूर्ण आहे. करमरकरांनी लिहिलेले हे पुस्तक लोकांच्या मनात काश्मिराप्रती नवा आशावाद जागवेल, असे कौतुकोद्गार सीए चितळे यांनी काढले.