NewsRSS

संघ म्हणजे आपलेपणाचे अमृत – डॉ. मोहन भागवत

रमेश पतंगे यांचा अमृत महोत्सव सोहळा संपन्न

डॉ. हेडगेवार यांनी आपल्या देशाला आपलेपणाचे अमृत द्यायचं काम केलं आणि त्याचं नाव संघ. संघ हा प्रत्येक स्वयंसेवकांचा प्राण आहे, त्याचा आत्मा आहे. स्वयंसेवक संघाचे हातपाय म्हणून काम करतात. संघ म्हणजे संकल्पनेच्या पातळीवर संपूर्ण हिंदू समाज.  स्वयंसेवक या समाजासाठी आपलेपणातून जे जे कार्य शक्य होईल ते करतो. रमेश पतंगे यांच्या विविधांगी कार्यातही याच आपलेपणाचे प्रकटीकरण झालेले दिसते, असे प्रतिपादन  रा. स्व. संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहनजी भागवत यांनी येथे केले.

सा. विवेकचे माजी संपादक व हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विवेक समूहातर्फे प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.  या सोहळ्याच्या व्यासपीठावरून ते बोलत होते. यावेळी पद्मभूषण डॉ. अशोकराव कुकडे आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच उत्सवमूर्ती रमेश पतंगे, त्यांच्या पत्नी सौ. मधुरा पतंगे, रमेश पतंगे अमृत महोत्सवी समारोह समितीचे अध्यक्ष विमल केडिया, विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, राजाभाऊ नेने स्मृती समितीचे अध्यक्ष हरसुखभाई ध्रुव, बडवे इंजिनिअरिंगचे श्रीकांत बडवे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मोहनजी म्हणाले, रमेश पतंगे संविधानासारख्या विषयाची अतिशय साध्या, सोप्या भाषेत मांडणी करतात ते या आपलेपणामुळेच. आपल्या लोकांसाठी लिहायचे, त्यांना समजेल असे लिहायचे या आपलेपणाच्या भावनेमुळे. त्या आपलेपणाचे हे अमृत आहे. त्यामुळे आजचा अमृत महोत्सव सोहळा विशेष आहे. गेली अनेक वर्षे स्वयंसेवक स्वत्व विसरून संघाच्या संकल्पनेच्या पातळीवरील हिंदुत्वाला साकार रूप देण्यासाठी झटत आहेत. या कार्यातील रमेश पतंगे हा महत्त्वपूर्ण दुवा आहे. प्रेमाची अडीच अक्षरे ही संघाचे बीजरूप आहेत. डॉ. हेडगेवार यांच्याकडून प्रेरणा घेऊन जगणारे सगळेच हे शुद्ध सात्त्विक प्रेम आपापल्या कृतीतून, कर्तृत्वातून स्वयंसेवक प्रकट करत आले. हे कार्य करण्यासाठी पुरुषार्थ करावा लागतो, अत्यंत कष्ट घ्यावे लागतात. शून्यातून स्वतःला उभे करावे लागते. तसेच कष्ट रमेश पतंगे यांनी आयुष्यभर केले.

देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की संविधानातील तत्त्वे सर्वांसमोर आणण्याचे महत्त्वाचे कार्य रमेश पतंगे यांनी केले. सध्या लोकशाहीला कमजोर करण्याचे, देशात अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवर लोकशाही मूल्यांचा जागर करणाऱ्यांमध्ये रमेश पतंगे एक आहेत.

ते पुढे म्हणाले की संविधानात समता आहे समरसतेचा उल्लेख त्यात नाही असे विचारणारे असतात. परंतु समरसता हा समतेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. हिंदुत्व व समरसता अद्वैत आहे हा विचार रमेशजींनी मांडला‌. समरसता, भटकेविमुक्त क्षेत्रे यांतील त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. समरसतेच्या मार्गाने समतेचे तत्त्व अवलंबिण्याचे संघाचे कार्य ते गेली अनेक वर्षे करत आले आहेत. भारतीय संविधानाची तत्त्वे सामान्य माणसाला कळावीत यासाठी त्यांनी संविधानावर अनेक पुस्तके लिहिली. साहित्याच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान मोलाचे असेच आहे.

सत्काराला उत्तर देताना रमेश पतंगे म्हणाले की, डॉ. हेडगेवार हे माझ्या जीवनातील प्रेरणा आहेत. मला पडलेले प्रश्न मी अंत:करणपूर्वक त्यांना विचारतो आणि त्यांच्याकडून मला उत्तरे मिळतात, अशा शब्दांत त्यांनी आपल्या कार्यउर्जेचे रहस्य सांगितले. यावेळी त्यांनी दामुअण्णा दाते, मुकुंदराव पणशीकर या वरिष्ठांचे तसेच विमल केडिया, दिलीप करंबेळकर या सहकार्याचे आपल्या प्रवासातील महत्त्व विशद केले

यावेळी रमेश पतंगे यांच्या पत्नी मधुरा पतंगे यांचा सत्कार करण्यात आला. विमल केडिया व दिलीप करंबेळकर यांनी आपल्या भाषणात पतंगेंसोबत काम करतानाचे अनेक अनुभव सांगितले.

या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती कार्यालय,या. स्व संघाचे उ.प्रदेश क्षेत्र प्रचारक श्रीकृष्ण सिंगल यांनी रमेश पतंगे यांच्यासाठी पाठवलेल्या शुभेच्छा संदेशाचे वाचन करण्यात आले. तसेच यमगरवाडी प्रकल्पातील मुलांनी पाठवलेला व्हिडिओ संदेश दाखवण्यात आला. तसेच रमेश पतंगे यांच्या जीवनप्रवासावर चित्रित विशेष ध्वनिचित्रफीत दाखवण्यात आली.

सा. विवेकच्या कार्यकारी संपादक यांनी सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. कवयित्री संजीवनी तोफखाने यांनी या खास सोहळ्यासाठी लिहिलेले गीत निलेश ताटकर यांनी सादर केले. केतकी भावे-जोशी यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली

**

Back to top button