CultureRSS

‘समरसता हा भाषणाचा नाही तर आचरणाचा विषय’ – सुहास हिरेमठ

पुणे, ८ मार्च – कोणताही समाज संघटित असेल तरच विजय निश्चित असतो. पण समाजात समरसता असेल तरच समाज संघटित होऊ शकतो. भेदाभेद असलेला समाज संघटित होऊ शकणार नाही आणि समरसता हा भाषणाचा नाही तर आचरणाचा विषय आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांनी केले.

रा. स्व. संघ जनकल्याण समितीतर्फे आयोजित पूजनीय श्रीगुरुजी पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात यंदाचा कला क्षेत्राचा पुरस्कार वास्तुशिल्पकार चंद्रकांत सोमपुरा यांना तर सामाजिक प्रबोधन क्षेत्रातील पुरस्कार तामिळनाडूतील हिंदू मुन्नाणी या संघटनेला प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, मानचिन्ह आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. संघाचे प. महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव हेही यावेळी उपस्थित होते.

भारत एक खोज या मालिकेचे काम करताना मनातील हिंदुत्व जागे झाले. त्यानंतर परदेशात न जाता आपल्या कलेचे आणि संस्कृतीचे जतन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच स्टुडिओ उभारून तेथे अशा अनेक कलाकृती निर्माण केल्या, असे देसाई यांनी सांगितले. हिंदू मुन्नाणी संघटनेचे अध्यक्ष के. सुब्रह्मण्यम यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर यांनी प्रास्ताविक, स्नेहल दामले यांनी सूत्रसंचालन तर सहकार्यवाह अरुण डंके यांनी आभारप्रदर्शन केले.

Back to top button