मुंबई, दि. १३ मार्च : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी अध्यक्षपदी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष पदी विनय सहस्त्रबुद्धे यांची, सचिवपदी भाई गिरकर व कोषाध्यक्षपदी अरविंद रेगे यांची निवड करण्यात आली. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली.
यापूर्वी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा. संपर्क प्रमुख प्रा. अनिरूद्ध देशपांडे यांच्याकडे होती. त्यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांच्या जागी ही निवड करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इकॉनॉमिक कौन्सिलशी संलग्न असलेली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी १९८२ पासून कार्यकर्ता निर्माणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे.
‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ ही एक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, कार्यकर्ते तसेच स्टार्टप यांच्यातील व्यक्तींच्या कौशल्य विकासासाठी काम करणारी संस्था आहे. तसेच म्हाळगी प्रबोधिनी ही विविध विषयांवर जनजागृती करण्याचे काम करते. संपूर्ण दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियामधील ‘आरएमपी’ ही एक खास संस्था आहे; जी संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेद्वारे प्रदान केलेली ‘विशेष सल्लागार दर्जा प्राप्त’ संस्था आहे.