देशातील ६० टक्के कोरोना रुग्ण एकट्या महाराष्ट्रातले
नवी दिल्ली, दि. १८ मार्च : मागील काही दिवसांपासून देशात आढळणाऱ्या एकूण कोरोना रुग्णांपैकी ६० टक्क्यांहून अधिक रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. देशातील सक्रिय रुग्णांपैकीदेखील ६० टक्के रुग्ण महाराष्ट्रातील असून, बळींमधील ४५ टक्के मृत्यू राज्यातील असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले.
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत देशातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. १६ राज्यांमधील ७० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांमध्ये या जिल्ह्यांत १५० टक्के रुग्णवाढ झाली आहे. महाराष्ट्रात १ मार्चपर्यंत दररोज सरासरी ७७०० रुग्ण आढळत होते. गेल्या १५ दिवसांत ही सरासरी १३७०० झाली. देशातील पॉझिटिव्हिटी दर ५ टक्के आहे. म्हणजे १०० चाचण्यांमध्ये ५ रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात हा दर १६ टक्के आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तर हे प्रमाण ३० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. नव्या रुग्णांमधील ६१.८ टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत. एकूण ८४ टक्के रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, पंजाब, गुजरात, तामिळनाडू आणि केरळ या सहा राज्यांमध्येच आढळत आहेत. देशातील सक्रिय रुग्णसंख्या २ लाख ३५ हजारांपर्यंत पोहोचली असून, त्यापैकी ६० टक्के सक्रिय रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील आहेत, असे भूषण यांनी सांगितले.