CultureEntertainment

कंगना राणावतला राष्ट्रीय पुरस्कार, आनंदी गोपाळनेही उमटवली मोहोर

अभिनेत्री कंगना राणावत हिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी तिला हा सन्मान प्राप्त झाला आहे. समीर विद्वांस दिग्दर्शित आनंदी गोपाळ या मराठी चित्रपटानेही राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहर उमटविली आहे. पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. २०१९ या वर्षातील पुरस्कारांची घोषणा आज केली गेली.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाईची कथा सांगणाऱ्या ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’मध्ये कंगनाने राणी लक्ष्मीबाईची मध्यवर्ती भूमिका साकारली होती. त्याचप्रमाणे ‘पंगा’ चित्रपटात कंगनाने जया निगम या महिला कबड्डी खेळाडूची भमिका साकारली होती. या दोनही चित्रपटांसाठी कंगनाला सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. कंगनाला चौथ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दिवंगत सुशांतसिंह राजपूत अभिनित ‘छिछोरे’ सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर अर्थात डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या संघर्षाची कहाणी असणाऱ्या, समीर संजय विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन असे दोन महत्त्वपूर्ण पुरस्कार घोषित झाले आहेत. ताश्कंद फाईल्स या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनेत्री पल्लवी जोशी यांनाही सर्वोत्तम साहायक अभिनेत्रीचा पुरस्कार घोषित झाला आहे.

Back to top button