EnvironmentRSS

‘एकेक थेंब मोलाचा’ – संघाची देशभरात जलसंरक्षण मोहीम

रांची, दि. २ एप्रिल – देशात सर्वत्र उन्हाची तीव्रता जाणवू लागली आहे. येत्या काळात उद्भवू शकणाऱ्या जलसंकटाचा विचार करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने देशभरातील जलाशयांचा जीर्णोद्धार व जल संरक्षण करण्याचा संकल्प केला आहे. संघाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून १५ एप्रिल ते १५ जुलै या काळात नदी, तलाव तसेच अन्य जलस्रोतांचे पुनरुज्जीवित करण्यात येणार आहेत. एकेक थेंब मोलाचा असे नाव  मोहिमेस देण्यास आले आहे. स्थानिकांनाही या मोहिमेत सहभागी करून घेतले जाणार आहे. संघाच्या पर्यावरण गतिविधीच्या अधिकाऱ्यांची बैठक ३ व ४ एप्रिल रोजी हरिद्वार येथे होणार आहे. ४ तारखेला सरसंघचालक डॉ. मोहन भागवत पर्यावरण आणि भारतीय संस्कृती या विषयावर विचार मांडणार आहेत.

या मोहिमेचे नेतृत्व संघाची पर्यावरण गतिविधी करणार असून स्वयंसेवक प्रखंडशः एक तलाव वा नदी दत्तक घेतील. स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने हे जलस्रोत रुंद करणे, गाळ काढणे तसेच तेथील अतिक्रमण हटवणे अशी कार्ये केली जाणार आहेत. झारखंड प्रांत पर्यावरण संयोजक प्रवीण कुमार म्हणाले की, या मोहिमेअंतर्गत पावसाचे पाणी साठवण्याबाबत नागरिकांना जागृत करण्यात येईल. त्याचप्रमाणे अशा स्वरुपाचे कार्य करणाऱ्या अन्य संघटनांना या मोहिमेत सामावून घेतले जाईल. येत्या काळात संघाच्या माध्यमातून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन मोहीमदेखील राबविली जाणार आहे.

सौजन्य – दै. जागरण

**

Back to top button