शिक्षण म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे जाणारा प्रवास. पुस्तकातील ज्ञान, त्याची भाषा, त्यातील माहिती या स्थानिक वनवासी मुलांसाठी अज्ञात आहे. हे अज्ञात अनोळखी जग समजून घेणं येथील मुलांना अवघड जातं. त्यामुळे ती शाळेत गप्प गप्प असतात. समजेल ते, घोकून घोकून लिहून काढतात. पण जव्हार मोखाडा भागातल्या वनवासी मुलांकडे अशा ज्ञात माहितीचा अक्षरशः खजिनाच आहे. अज्ञाताकडे नेण्यासाठी या ज्ञात माहितीचाच उपयोग का करून घेऊ नये याच कल्पनेतून साकारली आहे वयमची दिनदर्शिका, वयम संस्थेचे मिलिंद थत्ते सांगत होते.
गेलं एक तप वनवासी भागांत सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी वयम संस्था ही गेली तीन वर्षे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे उपक्रम राबवते आहे. मुलांना प्रमाण भाषेत शिकताना अडचणी येत असल्याचं आणि त्यामुळे त्यांच्या प्रगतीवर परिणाम होत असल्याचं संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं. मुलांना त्यांचे अनुभव, त्यांच्याच भाषेत लिहायला सांगितले तर ही मुलं खुलतील, व्यक्त व्हायला शिकतील, असा विचार काही दिवसांपूर्वी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केला. या कल्पनेतून वेगवेगळ्या 25 गावांतील वनवासी समाजातील मुलांसाठी त्यांनी हा शैक्षणिक प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला. वयमच्या जयश्री कुलकर्णी यांची ही संकल्पना तर दिपाली गोगटे या प्रकल्पाच्या संयोजक. त्यांनी व अन्य कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष लेखनापूर्वी मुलांशी मनसोक्त गप्पा मारल्या. त्यांची दिनचर्या, घरातली माणसं, बोहाड्यासारखे त्यांचे उत्सव, परंपरा, त्यांचे खेळ, गावातली जत्रा, ऋतूचक्र आणि त्यावेळी मुलांच्या नजरेला दिसणारा वेगवेगळा निसर्ग, त्यांना रानोमाळी येणारे अनुभव, दिसणारे प्राणीपक्षी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर गप्पा मारल्या आणि त्यांना त्यांचे हेच अनुभव त्यांच्या बोलीत लिहायला सांगितले.
थत्ते सांगत होते, शब्दसंख्या, भाषा, बोली, विषय या कशाचच बंधन आम्ही त्यासाठी ठेवलं नव्हतं. गप्पा मारता मारता विषय निघत गेले आणि मुलं त्या विषयावर लिहीत गेली. पंचवीस गावांतल्या सहावी ते आठवीत शिकणाऱ्या तब्बल चारशे मुलांनी आपापले अनुभव, आपलं म्हणणं, आपल्या गोष्टी हे सगळं शब्दांकित केलं आणि माहितीचा एक खजिनाच आमच्या हाती लागला. जसं आधुनिक शिक्षण वनवासी व ग्रामीण क्षेत्रांत पोहोचायला हवं तसाच हा खजिना शहरी मुलांपर्यंत, मोठ्यांपर्यंत पोहोचायला हवं आणि ते वाचलंही जायला हवं असं आम्हाला वाटलं. यातूनच आम्हाला दिनदर्शिकेची कल्पना सुचली. सगळे लेख वाचून त्याचे पाच विषयात विभाजन केलं आणि पाच वेगवेगळ्या दिनदर्शिका तयार झाल्या.
शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात या विद्यार्थ्यांकडे जे अमूल्य धन आहे त्याकडे कोणाचं लक्ष गेलं नव्हतं. गावातील मुलांची बलस्थानं ओळखून वापरून मुलांचा विकास करणं हाच वयमचा उद्देश आहे. मुलांच्या नजरेतून-अनुभवातून उमटलेलं जग, त्यांच्या कल्पनांचं अवकाश आणि त्याला मिळालेली आकर्षक पृष्ठरचनेची जोड यामुळे या दिनदर्शिका आपलं लक्ष वेधून घेतात. वयमच्या एका कार्यकर्त्यानेच यात चित्र काढली असून पुण्याचे श्री. मुळगुंद यांनी लेआऊट केला आहे. चैत्र महिन्यात दिनदर्शिका प्रकाशित होत आहे, अशी माहिती थत्ते यांनी दिली.