भूमी सुपोषण आणि संवर्धनाकरिता राष्ट्रव्यापी जनअभियानास १३ एप्रिलपासून प्रारंभ
नवी दिल्ली, दि. ८ एप्रिल : भूमी सुपोषण आणि संवर्धनाकरिता चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या मुहूर्तावर अर्थात १३ एप्रिलपासून राष्ट्रीय जन अभियानास प्रारंभ होणार आहे. कृषी आणि पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संस्थांनी सदर जन अभियान आयोजित केले आहे. भारतीय कृषी चिंतन, भूमी सुपोषण आणि संवर्धन या संकल्पना कृषी क्षेत्रात पुन्हा प्रस्थापित करणे, हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. जन अभियानात प्रामुख्याने भूमी सुपोषण, जन जागरण, भारतीय कृषी चिंतन आणि भूमी सुपोषणास प्रोत्साहित करण्यासंदर्भातील कार्यक्रमांचाही समावेश असणार आहे.
अभियानाच्या पहिल्या टप्प्याचा कालावधी हा तीन महिन्याचा अर्थात शुक्ल पौर्णिमा, २४ जुलै २०२१ पर्यंत असणार आहे. आधुनिक कृषीमध्ये भूमीकडे केवळ आर्थिक स्रोत म्हणून पाहिले जाते. परिणामी या आधुनिक काळात भूमीचे सातत्याने शोषण झाले आहे. भूमीतून प्राप्त होणाऱ्या पोषण तत्त्वांचे पुन:भरण आपण अत्यल्प प्रमाणात केले आहे. सध्या आपल्या देशात ९६.४० दशलक्ष हेक्टर भूमी वंचित आहे. ही संख्या आपल्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३० टक्के आहे. भारतातील अनेक शेतकऱ्यांच्या असा अनुभव आहे की, शेतीमालाची किंमत सातत्याने वाढत आहे, जमिनीची उपजाऊ क्षमता कमी होत आहे, सेंद्रिय कार्बनचे प्रमाणही सतत कमी होत आहे, ज्यामुळे उत्पादनही कमी होत आहे. भूमीची जलधारण क्षमता आणि जलस्तर अधिकांश स्थानांवर कमी होत आहे. कुपोषित भूमीमुळे मनुष्यही विविध आजारांना बळी पडत आहे. आधुनिक शेतीच्या काळात आपण भूमी सुपोषण संकल्पनेकडे दुर्लक्ष केले आहे.
मात्र आता भारतीय कृषी चिंतन आणि भूमी सुपोषण संकल्पना पुन्हा प्रस्थापित करण्याची वेळ आली आहे. भूमी सुपोषण आणि संवर्धनाकरिता राष्ट्रीय स्तरावर जन अभियान हे या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे. भारतीय कृषी चिंतनात भूमीला धरतीमाता असे संबोधिले गेले आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये याची अनेक उदाहरणे सहजपणे पाहायला मिळतात. अथर्वेदाच्या भूमी सूक्तमध्ये म्हटले गेले आहे, ‘‘माता भूमिः पुत्रो अहं पृथिव्याः’ भावार्थ : भूमी आपली माता आहे आणि आपण तिची लेकरे आहोत. तात्पर्य, भूमीची पोषण व्यवस्था करणे, हे आपले कर्तव्य आहे.
मागील चार वर्षांपासून करण्यात आलेल्या व्यापक सल्लामसलतचा परिणाम म्हणजे हे जन अभियान आहे. शेतकऱ्यांसमवेत कृषी शास्त्रज्ञांशी सल्लामसलत, शेतकऱ्यांची अनुभव लेखन कार्यशाळा, शेतकरी आणि शेतीच्या हिताकरिता तसेच कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांसोबत सल्लामसलत, २०१८ साली भूमी सुपोषण राष्ट्रीय परिसंवाद इ. चा समावेश करुन जन अभियान संकल्पित केले आहे. सध्या जन अभियानाच्या संचालनाची जबाबदारी ३३ संस्थांनी घेतली आहे.
भूमी सुपोषण आणि संवर्धनासाठी सुरु करण्यात आलेल्या राष्ट्रीय जन अभियानास भूमी पूजा विधिने प्रारंभ करण्यात येईल. ही विधिवत भूमी पूजा संपूर्ण राष्ट्रात, राज्यांत, जिल्ह्यांत, गावांत तसेच नगरांमध्ये करण्यात येणार आहे. सर्व ठिकाणचे भूमी पूजन हे चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या शुभप्रसंगी अर्थात १३ एप्रिल २०२१ रोजी केले जाईल. आपल्या भूमीचे सुपोषण करणे ही केवळ शेतकऱ्यांची जबाबदारी नाही. भूमी सुपोषण आणि संवर्धन ही आपल्या सर्व भारतीयांची सामूहिक जबाबदारी आहे, ही या जनअभियानाची मुख्य संकल्पना आहे. हे जन अभियान गाव आणि नगरांमध्येही कार्यान्वित करण्यात येईल.
अभियानाच्या पहिल्या टप्प्यात भूमी सुपोषण प्रत्यक्ष साकार करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करणे, भूमी सुपोषणाच्या विविध पद्धतींच्या प्रयोगांचे आयोजन करणे, इच्छुक शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे, नगर क्षेत्रांत विविध नागरी वसाहतीमधील जैविक-अजैविक कचऱ्याचे विलगीकरण करणे तसेच वसाहतीतील जैविक कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनविणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. याचबरोबर सेमीनार, कार्यशाळा, शेती प्रशिक्षण, प्रदर्शन आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे.
भूमी सुपोषण आणि संवर्धन अभियानाकरिता राष्ट्रीय मार्गदर्शन मंडळ आणि संचालन समितीत भारतीय कृषी विचार आणि भूमी सुपोषण संकल्पना प्रत्यक्ष राबविणाऱ्या मंडळींचाही सहभाग आहे.