
सोमवार दिनांक 5 एप्रिल सकाळी 8:45 च्या सुमारास सदानंद शिरसागर काकांचा मला फोन आला किरण अनिल बाबत कळाले का? माझ्यासमोर प्रश्नचिन्ह मी काहीच कळालं नाही असं म्हणालो, अरे किरण अनिल गेला कोरोनाने आजारी असलेला अनिल 14 दिवस उपचार सुरू असतानाच गेला. मी आवाक झालो, मला धक्का बसला. तीन आठवड्यांपूर्वी प्रत्यक्ष नवरा-बायको मला भेटण्यासाठी माझी अपघातानंतर चौकशी करण्यासाठी घरी आले होते, कायम हसतमुख संघ समर्पित कृतिशील व्यक्तिमत्व आता भेटणार नाही, हा मीच काय पण जिल्ह्यातल्या सर्व स्वयंसेवक संघ कुटुंब कार्यकर्ते यांना धक्काच होता.
डोळ्यासमोर अनिलजीचा जीवनपट उलगडत गेला. गेल्या पंचवीस वर्षात 1994 ला मी प्रचारक थांबल्यानंतर बदलापुरात पाऊल ठेवले त्या दिवसापासून 3 मार्च 2019 पर्यंत सतत आमचा संपर्क होता. पालये यांचे घराणे मूळचे कल्याण तालुक्यातील श्री मलंग चे पायथ्याशी करवले गाव. शेतीवाडी सह ज्योतिष विद्या पारंगत व भिक्षुकी करणारे एक उत्तम संस्कारित कुटुंब श्री हरिश्चंद्र सिताराम पालये उर्फ पालये शास्त्री यांची चार अपत्ये, त्यातील ज्येष्ठ श्री अनिल पालये, भाऊ प्रदीप, दोन बहिणी सौ वर्षा क्षीरसागर आणि तबला विशारद सौ वसुधा देशपांडे. अनिलजी चे वडील हे जिल्हा परिषद मध्ये नोकरी करत होते. संघाच्या विचारांचे कट्टर घराणे पण शासकीय नोकरीमुळे वडिलांना सहज सक्रिय होता येत नसे. तरी पण संघाचे बाळकडू मिळालेला अनिल संघाचा पाच वर्ष प्रचारक म्हणून गेला.
मुंबईतील जोगेश्वरी व परळ भागात अनिल जी 1983 ते 19 88 संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून सक्रिय राहिले. अथक परिश्रम करण्याची तयारी, मितभाषी स्वभाव, सहज संवादाची शैली या जोरावर त्यांनी पूर्वीच्या संघदृष्ट्या ठाणे जिल्हा नंतर चा कल्याण जिल्हा व विद्यमान अंबरनाथ जिल्हा रचनेत शाखा गटनायक ते जिल्हा बौध्दिक प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. बदलापुरात मी 1994 सली आलो तेव्हा अनिल जी बदलापुर तालुका कार्यवाह पदावर होते शहर व ग्रामीण भागात आम्ही मिळेल त्या बसने प्रवास करत होतो तेव्हा टू व्हीलर ची फारशी शक्यता, आवश्यकताही वाटत नसे पण नेहमीच शाखा, प्रवास, बैठका उत्सव, यात नियमितता असे. बदलापूरचे संघ काम रुजवण्यात जे अनेक ज्येष्ठ स्वयंसेवक होऊन गेले त्यात नाथाजी राऊत, त्रिंबक उर्फ बालम कुलकर्णी, माधवराव ओक, अप्पा घागुर्डे बस्तीमलजी जैन, श्रीपाद बिवलकर,पारखी कुटुंबीय, चंदू कुलकर्णी (आबा)यांजप्रमाने अनिल जी पालये यांनी बदलापूर मध्ये संघकामाचा पाया मजबूत केला. एक वर्षे पश्चिम नगरात काम करताना आम्ही दोघांनी ठरवले मी नगर स्तरावर काम करण्याची योजना त्यांना सांगितली तर अनिल जिंनी तालुक्याची जबाबदारी असूनही पश्चिम नगरात व्यवसायिकांच्या प्रभात शाखा, संपर्क ,उभे करण्यात खूप मदत केली. नगरात व तालुक्यात बाहेरून कोणी स्वयंसेवक बदलापुरात नवीन राहिला आल्याची माहिती त्यांना कळाली ती त्याची माहिती घेऊन ते संघ कार्याला त्या व्यक्तीस जोडत असे,अशी असंख्य उदाहरणे अनिलजीं बाबत आढळतात. बदलापूर पासून जवळ सोनाळा नावाचं गाव बारा किलोमीटर आहे तेथे विश्व हिंदू चे सावली केंद्र आहे तिथे एका वर्षी हेमंत शिबिराची योजना झाली अनिल जींचा विषय कार्यालय नोंदणी व्यवस्था. खरंतर शिबिरात एकीकडे व्यवस्था उभारणी होत होती पण स्वयंसेवक वेळेवर पोचतील म्हणून नीट नोंदणी व्हावी, येणारांची आभाळ होऊ नये यासाठी, कार्यालयात अनेक अडचणी असताना सुद्धा कार्यालयात बसून सर्व व्यवस्था वस्तू व कार्यकर्ते यांची नीट नियोजन तयारी त्यांनी केलेली आढळली. अनिलजीं वर एखादी जबाबदारी सोपवावी व त्यांनी पार पाडावी यामुळे अन्य जिल्हा कार्यकर्ते निश्चिंत असत.
वैचारिक स्पष्टता व संघ कार्याबद्दल निस्सीम भक्ती यामुळे अनिलजींनी मराठी पत्रकारितेचा कोर्सही केला. वैचारिक वादळाच्या काळात सातत्याने वृत्तपत्रात लेखन व प्रतिक्रिया देऊन देशभक्त स्वयंसेवक तत्वाचे योग्य दर्शन त्यांनी घडवले. हरहुन्नरी व सज्जन स्वभावाच्या अनिलजींना सिनेमा, संगीत लेखन वाचनाची खूपच आवड होती. संगीत हा घराण्यात वारसा होता बंधू प्रदीप हे संगीत विशारद व संगीत शिक्षक तसेच बहिण वसुधाताई या तबला विशारद आहेत. अध्यात्मिक व हिंदू संस्कृतीच परंपरा यांचा अभिमान असणार्या घरात त्यांची आई कलावती आईच्या भक्त होत्या, त्यामुळे घरी अनेक वेळा भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होत त्याचे नियोजन अनिलजी करत असत व घरच्यांनाही प्रोत्साहित करत. विविध विषयांवर स्फुटलेखन, क्रिकेटर सचिन तेंडुलकर, सिनेकलावंत प्राण, यासह संघ विचारांवर आधारित जवळपास 21 व अधिक छोटी मोठी पुस्तके लिहिली. समर्थ भारत व्यासपीठ ठाणे या संघपरिवार संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या प्रबोधनात्मक चळवळीत ते सक्रिय पदाधिकारी होते. समर्थ व्यासपीठातर्फे प्रकाशित होणाऱ्या सांस्कृतिक त्रैमासिकाचे सहसंपादक म्हणून अनेक वर्ष काम पाहत होते. शाखेचा शिशूगण कसा घ्यावा ते संघातील पद्य व त्याची आवश्यकता या विषयावरील त्यांचे विचार यातून मुशीतला कार्यकर्ता स्पष्टपणे जाणवत असे. 29 वर्ष डोंबिवली नागरी सहकारी बँकेत लिपिक ते अधिकारी पदांवर काम करत असताना स्वयंसेवकत्त्व व सामाजिक दायित्व चे भान कधी न विसरलेला कर्मचारी अशी त्यांची ख्याती होती. ज्येष्ठ नागरिकांना आवर्जून मदत करत संस्थेची आस्था ही कर्तव्यतत्परतेने अनिलजींनी जपली. बँकेतील कोणत्याही शाखेत बदली झाली तरी संघाचा प्रवासी कार्यकर्ता म्हणूनच ते सक्रिय राहात. प्रवासातील परिचितांना ही त्याच्या गावात व भागातील संघ कार्यकर्त्यांना ला जोडून देत. सेवानिवृत्तीनंतर भारतीय मजदूर संघ संघटनेत सक्रिय झाले. ज्येष्ठ नागरिक परी संघाचे काम करू लागले श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी वर्षात भारतीय मजदूर संघाने विस्तारक योजनेचे आवाहन केले होते. वयाच्या 61 व्या वर्षी देशभरात सर्वप्रथम जन्मशताब्दी वर्षाचे पहिले पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून ते बाहेर पडले. डोंबिवली येथे पंधरा दिवस पूर्णवेळ राहून जन्मशताब्दी प्रारंभाचा डॉक्टर अशोक मोडक यांच्या उपस्थितीत डोंबिवलीच्या 20 नोव्हेंबर चा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला तो अनिल पालये यांच्या सक्रिय पूर्णवेळ देण्यामुळे. कार्यक्रम नियोजन, निमंत्रण व्यवस्था या तीनही पातळीवर सातत्य व समन्वय त्यांनी उत्कृष्टरित्या साधला होता. नवीन संघ साहित्य, तरुण भारत, साप्ताहिक विवेक यांचे वितरण वाढवणे संघ विचारांचे प्रबोधनात्मक साहित्य, घरे आणि ग्रंथालयं पर्यंत पोहोचणे यासाठी आम्ही बऱ्याच वेळा एकत्रित नियोजन केले. बदलापूरच्या सांस्कृतिक चळवळीत व्याख्यानमाला, वक्ते शोध, नववर्ष स्वागत यात्रा, विविध संगीत कार्यक्रमांना मदत, पुस्तक प्रकाशन, प्रचार यामध्ये अनिलजींचा सक्रिय सहभाग असे. बदलापूर पूर्व मधील शिवजयंती शताब्दी महोत्सवानिमित्त एका स्मरणिकेचे संपादकत्व त्यांनी सहजतेने पार पाडले. अनिल जिवंत संपर्काचा उत्तम झरा होत.
गेल्या तीस-पस्तीस वर्षात त्यांचे घर संघ कार्यकर्ते प्रचारक समाजातील सर्व प्रतिष्ठितांसह, सामान्य घटकांचेही त्यांच्या घरात त्यांचे वडील आई भगिनी तसेच पत्नी सौ आसावरी वहिनी कडून नेहमीच हसत स्वागत होत असे. कधीही सौ.असावरी वहिनींना आणि अनिल जी नाही आयत्या वेळी आलेले जेवायला कार्यकर्ते व पदाधिकारी याबाबत नाराजी पाहिलेली नाही. संपूर्ण घराने संघ विचाराला आपल्या कृतिशीलतेने जोडल्याचा अनुभव सर्वांचाच आहे. असे अनिल जी सेवानिवृत्तीनंतरही सक्रिय होते आता शेवटी शेवटी आयोध्या राम मंदिर तीर्थक्षेत्र निधी समर्पण अभियानात चार चार मजले जिने चढून तब्बल एक महिना नगरातील सर्व कार्यकर्त्यांना घेऊन निधी गोळा करत होते. अनेक कुटुंबांची व समाज घटकांशी सर्वच स्तरावर जुना संपर्क असल्याने संघाला अनिल जी यांची उणीव नक्कीच भासत आहे. अनिलजींचे जाणे आणि त्यांचे अंत्य दर्शन सुद्धा न होणे सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेले. झारखंड ला एका नातेवाईकांच्या लग्नकार्यासाठी गेलेल्या अनिल जी यांनी खोकला आला म्हणून टेस्ट केली व कोरोना बाधित म्हणून 22 मार्चला बदलापूर येथेच इस्पितळात दाखल झाले. 14 दिवस उपचार घेऊनही अनिलजींचा रोग बळावत गेला व त्यातच त्यांचे देहावसान झाले. अनिलजींचे संघ समर्पित सक्रीय जीवन इहलोक सोडून गेले. संघ स्वयंसेवक त्व प्रतिज्ञेप्रमाणे आजन्म जपणारे अनिल जी यांच्या कार्याचा आदर्श ठेवून संघ कार्य सातत्याने करणे हीच त्यांना श्रद्धांजली होय. पालये कुटुंबियांवर कोसळलेले दुःख म्हणजे आई वडिलांच्या पश्चात संपूर्ण घराला एकत्र बांधून ठेवणारा त्यांचा आदर्श भाई आज नाही त्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना. ,,”अविरत श्रमने संघ जिणे ” हे कृतीने दर्शविणाऱ्या कै.अनिलजींना भावपूर्ण आदरांजली….
- श्री.किरण मिल गिर….९८६०४७५८४७..जिल्हा संपर्क प्रमुख