बरोबर एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी अर्थात १६ एप्रिल २०२० रोजी असंख्य हिंदूंच्या मनाला वेदना देणारी घटना घडली. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात त्या दिवशी दोन हिंदू साधूंना अत्यंत अमानुषपणे मारण्यात आले. दगडांनी ठेचून, हाल हाल करून त्यांचा जीव घेण्यात आला. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल झाले आणि एका हिंस्र पशुलाही लाजवेल अशा पद्धतीच्या त्या कृत्याने अनेकांचे हृद्य हेलावले. साऱ्या समाजाला दिशादर्शन करणाऱ्या साधुंपैकी दोन महंत आणि त्यांचा चालक यांचा इतका करुण अंत व्हावा ही अखंड भारतीय समाजासाठी अत्यंत क्लेशदायी घटना होती.
पंच दशनाम जुना अखाडाचे महंत कल्पवृक्ष गिरी जी, महंत सुशील गिरी आणि त्यांचा वाहनचालक नीलेश तेलगडे यांची गाडी मोठ्या जनसमुहाने अडवली आणि त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जबर जखमी झाले. दरम्यानच्या काळात रात्री दहाच्या सुमारास पोलिसांना कळवले असता ते जवळपास साडेबारा एकच्या सुमारास आले, ते ही पोलीस चौकी जवळ असताना. पोलीस आले व त्यांनी दोन्ही महंतांना आपल्या चौकीत नेले. नीलेश तेलगडे याचा तोपर्यंत मारहाणीत मृत्यू झाला होता. जनसमुहाने पोलीस चौकीत घुसून या दोघांना खेचून बाहेर काढले व अमानुष मारहाण केली. यावेळी पोलीस तिथे उपस्थित होते. यावेळी पोलिसांनी ना त्या समुहाला अडवण्याचा प्रयत्न केला ना साधूंच्या संरक्षणार्थ हवेत गोळीबार केला.
सुरुवातीच्या टप्प्यात डाव्या विचारांच्या प्रसारमाध्यमांनी या घटनेची मांडणी आपल्याला हवीतशी करण्याचा प्रयत्नही केला. ही घटना या परिसरात पसरलेल्या अफवांमुळे झाली असेही सांगितले गेले. बातम्यांमध्ये या तिघांना क्वचित चोर तर क्वचित मुले पळवणारी टोळी असेही म्हटले गेले. पण रविवार, २० एप्रिल रोजी या घटनेचे व्हिडीओज व्हायरल झाले आणि सत्य जगासमोर आले. पोलिसांच्या आणि जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांच्या उपस्थितीने व ‘दादा आला, दादा आला’ या शब्दांनी या घटनेभोवती संशयाचे जाळे विणण्याचे काम केले. ही घटना घडली ती गावे म्हणजे विरळ वस्तीचे पाडे आहेत. यावेळी गोळा झालेला जनसमूह हा गडचिंचलेप्रमाणेच दाभाडे, दिवशी या गावातील तसेच दादरा नगरहवेली येथील गावांमधील असल्याचेही समोर आले. यांपैकी काही गावे एक दोन किलोमीटर अंतरावरील तर काही सात ते आठ किलोमीटर अंतरावरील आहेत. मग केवळ अफवेतून जवळपास तासाभरात एवढा जनसमूह कसा गोळा झाला, हा देखील प्रश्न होताच. २१ एप्रिल रोजी गडचिंचले प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आले. ८०८ संशयित आणि ११८ साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. १५४ आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली. त्याच ११ अल्पवयीन आरोपी होते. यापैकी ८१ जण तुरुंगात आहेत. यापैकी अनेक जण मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीशी संबंधित असल्याचे तपासातून पुढे आले. साधू हत्याकांडाला तब्बल वीस दिवस झाल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघरचा दौरा केला. यावेळी काशीनाथ चौधरी देशमुख यांच्यासोबत फिरताना आढळले. अनेकदा मागणी होऊनही हे प्रकरण अद्याप सीबीआयकडे वर्ग करण्यात आलेले नाही.
ही घटना अफवेतून झाल्याचे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हे पूर्णसत्य नाही. वास्तविक हिंदुंवर या भागात हल्ले होण्याची ही काही पहिलीच घटना नाही. या भागात ख्रिस्ती मिशनऱ्यांचे हिंदूंच्या धर्म परिवर्तनाचे आणि डाव्यांचे त्यांना मूळ धर्मापासून दूर नेण्याचे उद्योग अनेक वर्षे सुरु होते. डाव्यांनी स्थानिक वनवासींना षडयंत्रपूर्वक हिंदू धर्मापासून दूर न्यायचे आणि मिशनऱ्यांनी त्यांचे धर्मपरिवर्तन करायचे हा प्रकार सुरूच आहे. पुढे वनवासी समाजाला या संकटापासून वाचवायचे असेल तर त्यासाठी हालचाल केली पाहिजे या भूमिकेतून तलासरी येथे विश्व हिंदू परिषद संचालित वनवासी विकास प्रकल्प सुरु झाला. या केंद्राचे व्यवस्थापक म्हणून हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे विद्यमान कार्यवाह अप्पा जोशी आणि त्यांच्या पत्नी काम पाहत होते. या दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यानंतरही नव्वदच्या दशकात येथील अनेक हिंदुत्ववादी विचारांच्या स्थानिक व्यक्तींवर, त्यांच्या घरांवर हल्ले झाले. गाय, बैल, बकऱ्या यांना मारून टाकण्यात आले. संपत्तीची जाळपोळ करण्यात आली.
हिंदू धर्माबाबत स्थानिक वनवासी समाजाच्या मनात अनेक गैरसमज पसरविण्यात आले आहेत, त्यांच्या मनात कमालीचा हिंदू द्वेष पसरला आहे. आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना अशा डाव्या विचारांच्या संघटनांचे कार्यकर्ते षडयंत्रपूर्वक मागील अनेक वर्षे हे काम करीत आले आहेत. या परिसरात विनोद निकोलेसारखे स्थानिक नेते डाव्या विचारांचा प्रसार, प्रचार करीत आहेत. वनवासींना आपल्या संस्कृतीपासून दूर नेण्याचे कार्य करीत आहेत. खरे तर वनवासी समाज हा हिंदूच आहे याचे अनेक पुरावे त्यांच्या संस्कृतीत आढळून येतात.
भगव्याच्या विरोधातील डाव्यांचा विद्वेष आज पराकोटीला गेला आहे. आज येथील भोळ्या भाबड्या वनवासी जनतेच्या मनात हिंदू धर्माबद्दल, हिंदू देवदेवतांबद्दल अत्यंत चुकीचे समाज करून दिले जात आहेत. त्यातच धर्म परिवर्तनाच्या माध्यमातून आपल्या धर्माचा प्रसार आणि वाढ करण्याची मनीषा असलेले मिशनरी पालघरसमान अल्पविकसित भागांना पद्धतशीरपणे ग्रासत आहेत. यातूनच हिंदू देवतांना नावे ठेवणे, महिषासुर दिन साजरा करणे, रावणाची पूजा करणे असले प्रकार सुरु झाले. अन्यथा ज्या समाजात दसऱ्याच्या दिवशी जिथे रावणदहन केले जात होते तिथेच ही नवी प्रथा कशी रुजेल. येथील वनवासी हिंदू समाजाला आपल्या मूळ हिंदू धर्मापासून तोडण्याचा आणि त्यांना अज्ञानीच ठेवण्याचा प्रयत्न आजही अनेक शक्ती करत आहेत हे गडचिंचले प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले. जो जो राष्ट्रहितासाठी कार्यरत असेल, ज्याच्या शरिरावर भगवी वस्त्रे असतील त्यांच्यावर हल्ले करणे, त्यांना विरोध करणे हे सीपीएमचे आवडीचे कार्य राहिले आहे. त्याच विद्रोही विचारांची पेरणी ते स्थानिक वनवासींमध्ये, विशेषतः वनवासी तरुणांत करीत आहेत. अन्यथा भगवे कपडे परिधान केलेल्या त्या साधूंवर हल्ला होण्याचे काही कारण नव्हते.
या प्रकरणानंतर अर्थातच सेक्युलर हिंदूंनी मिठाची गुळणी धरणे पसंत केले. पोलिसांच्या उपस्थितीत समुहाने साधूंचा निर्घृणपणे जीव घेतला. हे सहन केले तर या पुढेही हिंदू साधूंचा असाच हकनाक बळी जाईल, असा विचार त्यांच्या मनाला शिवला नसेल का? सच्चा, संवेदनशील हिंदू आजही तो दिवस विसरू शकलेला नाही. ती दृश्य आठवली तरी अंगावर सर्रकन काटा उभा राहतो. या प्रकरणाचा सीबीआयच्या माध्यमातून तपास होऊन दोषींना लवकरात लवकर शासन होणे आवश्यक आहे. जोपर्यंत या प्रकरणी न्याय होत नाही तोवर निरपराध साधूंच्या आत्म्याला मुक्ती मिळणार नाही आणि हिंदूंच्या मनातली भळभळती जखम तशीच वाहती राहील….