‘शिवभावे जीवसेवा’ हाच भारतीयांचा स्थायीभाव राहिला आहे. फक्त काळाप्रमाणे त्याचे स्वरूप आणि माध्यम बदलत गेले एवढेच. समाजमाध्यम हे नवे दालन आपल्यासाठी गेल्या काही वर्षांत खुले झाले आहे. कोणी त्याचा वापर संपर्कासाठी करतात तर कोणी मनोरंजनासाठी. कोणी जुन्या आप्तांना शोधण्याचा मार्ग म्हणून याकडे पाहतात तर काही जण चक्क आपल्या व्यवसायवृद्धीसाठी याचा उपयोग करून घेतात. पण समाजमाध्यमातील एक मोठा समूह आज सामाजिक कार्यांसाठी या क्षेत्राचा वापर करून घेत आहे. विदर्भातील सावनेरचे सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनीही फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सामाजिक कार्यकर्त्यांचे एक मोठे जाळे उभे केले असून आपल्या हितज्योती आधार फाऊंडेशन या संस्थेच्या माध्यमातून आप्तांपासून दुरावलेल्या अनेकांना ते आपल्या घरापर्यंत नेऊन सोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य गेली अनेक वर्षे करीत आहेत.
साधारण सात ते आठ वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मला रस्त्यावर एक भणंग अवस्थेतील मनोरूग्ण फिरताना दिसला. मी त्याला घरी घेऊन आलो. त्याला आंघोळ घातली, केस कापून घेतले, दाढी करून घेतली. स्वच्छ झाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर दिसलेला आनंद मी आजही विसरलेलो नाही. त्याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला त्याच्या घरी पोहोचवले, हितेश बनसोड सांगत होते. ही घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद करून त्यांनी सोशल मिडियावर शेअर केली. त्या पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि प्रतिक्रिया मिळाल्या. त्याच पोस्टच्या प्रतिक्रियेच्या बॉक्समध्ये एका मुलाने आपल्या परिसरातील एका माणसाचा फोटो टाकला होता. व्यक्तीची माहिती काढून त्यालाही हितज्योती संस्थेने त्यांच्या घरी पोहोचवले. ती व्यक्ती सतरा वर्षांपूर्वी आपल्या घरापासून, गावापासून दुरावली होती. मेरिटमध्ये न आल्याचा धसका घेऊन मनावर परिणाम झाल्याने भरकटलेला तो युवक फिरत फिरत नागपुरातल्या कामठी गावात आला होता.
हितेश सांगत होते, त्या घटनेने मला माझ्या आयुष्याची दिशा मिळाली. समाजातील एका मोठ्या घटकाला आपली गरज आहे आणि समाजमाध्यमाचा वापर करून त्यांनी हितज्योतीचा प्रवास सुरु केला. आपल्या संस्थेच्या माध्यमातून १००हून अधिक जणांना आपल्या घरी पोहोचवले आहे. पण अनेकजण असेही होते ज्यांना स्वतःचे घर नव्हते किंवा त्यांना ते सांगता येत नव्हते. अनेक वृद्धांना घरच्यांनी सोडून दिलेले होते वा ते स्वतः बाहेर पडले होते. अशा सत्तरहून अधिक जणांची व्यवस्था मनोरुग्णालयात वा वृद्धाश्रमात केली आहे.
सुरुवातीला मी आणि माझे काही मित्र मनोरुग्णांना दुचाकीवरून घेऊन जात असू. पण एकदा एक मनोरूग्ण सुटका करण्याच्या झटापटीत माझ्या मित्राला कडकडून चावला. तेव्हा लक्षात आले की आता आपल्याला मोठ्या गाडीची वा रुग्णवाहिकेची गरज आहे. म्हणून मग पुन्हा एकदा समाजमाध्यमावरून आवाहन केले आणि तिथेच अकाऊंट नंबरही दिला. तीन दिवसात त्या अकाऊंटला दीड लाख रुपये जमा झाले. या पैशाच्या माध्यमातून आम्ही रुग्णवाहिका घेतली. पण असे रुग्ण काही रोजच दिसून येतात असे नाही. म्हणून त्या रुग्णवाहिकेची सोय आम्ही तालुक्यातील रुग्णांना मोफत उपलब्ध करून दिली, हितेश सांगत होते.
समाजमाध्यमांचा वापर कसा करता हे विचारले असता ते म्हणाले, मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणी मदतीचा हात द्या असे ब्रीद असणाऱ्या हितज्योती फाऊंडेशनशी समाजमाध्यमातून महाराष्ट्र भरात साडेतीन हजार सामाजिक कार्यकर्ते जोडले गेले आहेत. समजा मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे गोंदिया जिल्ह्यातील एखादी वृद्ध महिला विपन्नावस्थेत वा मनोरुग्णावस्थेत सापडली तरी तर तिचा फोटो वा व्हिडिओ मी व्यक्तिगत रुपात गोंदियातील कार्यकर्त्यांना पाठवतो. मग तो व्हिडिओ वा फोटो ते कार्यकर्ते जिल्ह्यात वायरल करतात, व्यक्तिगत चौकशी करतात आणि मग मुंबईतील कार्यकर्ते आणि गोंदियातील कार्यकर्ते यांच्या समन्वयातून ती महिला आपल्या घरी पोहोचते. तसे नसेल तर संबंधित व्यक्तींची सोय आम्ही वृद्धाश्रमात करतो.
हितज्योतीच्या माध्यमातून रोटी बँकचा उपक्रमही राबवला जातो. एखाद्या कार्यक्रमात वा लग्नसोहळ्यात अन्न उरत असेल व ते खाण्यायोग्य असेल तर ते संस्थेला देण्याचे आवाहन केले जाते. हे अन्न गरजवंतांना वितरीत केले जाते.
समाजमाध्यमांच्या वापरातून एक मोठे सामाजिक कार्य उभे राहू शकते याचा वस्तुपाठच हितज्योती फाऊंडेशनने घालून दिला आहे. तसेच यातून प्रेरणा घेऊन अशा आणखी काही संस्था उभ्या राहाव्यात आणि माणसांच्या सामाजिक जाणिवाही बळकट व्हाव्यात. खरे तर भविष्यात समाजाला अशा संस्थांची गरजच पडू नये. ज्या दिवशी हे घडेल तो दिवस माझ्यासाठी आनंदाचा असेल अशी आशा हितेश बनसोड व्यक्त करतात.