अयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदिर बांधण्याचा मार्ग सुकर झाल्यापासून संपूर्ण देश राममय झाला आहे. कोरोनाच्या काळातही रामनवमीच्या दिवशी प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने श्रीरामांची पूजा करत होता. प्रत्येकाची भक्ती वेगळी, ती व्यक्त करण्याची तऱ्हा वेगळी. आज २२ एप्रिल रोजी एक रामभक्त युवक सोमनाथपासून धावत अयोध्येत पोहोचला व प्रभू श्रीरामांपुढे नतमस्तक झाला. या घटनेचे महत्त्व आणि माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाचे महासचिव व विश्व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष चंपत राय यांनी व्यक्त केली आहे.
चंपत राय म्हणाले की, आज दुपारी(२२ एप्रिल) एकच्या सुमारास एक युवक सोमनाथपासून धावत धावत अयोध्येत पोहोचला. या युवकाचे नाव घनश्याम. ३० मार्च रोजी घनश्याम यांनी सोमनाथाचे दर्शन घेतले आणि अयोध्येकडे धावत निघाले. २३ दिवसांचा प्रवास पूर्ण करून आज २४व्या दिवशी ते कारसेवकपूरम येथे सुखरूप पोहोचले. दररोज ७०-८० किलोमीटरचे अंतर १५ तास धावत त्यांनी कापले होते. हे कार्य त्यांनी स्वयंप्रेरणेने केले.
५ ऑगस्ट रोजी अयोध्येत श्रीराम जन्मभूमी येथे पंतप्रधानांनी केलेले पूजेचे आयोजन त्यांनी अवश्य पाहिले असणार. गुजरातमधील स्वामीनारायण परंपरेचे संत पूज्य स्वामी माधवप्रिय दास महाराज हे विशाल शैक्षणिक केंद्र चालवतात. त्यांचाही आशीर्वाद घनश्याम यांना लाभला आहे. त्यांच्यासोबत सूरत येथील फिजिओथेरपिस्ट डॉ. दीप खैनी हे देखील येथे आले आहेत. या प्रवासात मार्गदर्शन व साथ देण्यासाठी गौरव नामक कार्यकर्तेही गाडी घेऊन आले आहेत.