जळगाव शहरातील सुमारे ४७ वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये २ हजारांवर कोविड संसर्गाचे रूग्ण उपचार घेत आहेत. फुफ्फुसाला सर्वाधिक संसर्ग झालेल्या रूग्णांना पलंग, व्हेन्टिलेटर, आॕक्सिजन, रेमडेसिवीर, टॉसिलीझूमाब आणि इतर औषधे वेळेवर उपलब्ध होणे हे एक आव्हान ठरत आहे. या अडचणीत आॕक्सिजन सिलींडरची दरवाढ हे नवे आव्हान हॉस्पिटल चालकांसमोर उभे आहे. जैसे तैसे अनुभवी, तज्ञ डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, तंत्रज्ञ, लॕब अन्टेडन्ट वगैरे मनुष्यबळ गोळा केले असले तरी तंत्रातील समस्या वेगळे प्रश्न निर्माण करीत आहेत. सरकारी दरापेक्षा वाढीव बिलाची आकारणी हा रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचा सतत होणारा आरोप आहे. कोविड हॉस्पिटलमध्ये रूग्ण दाखल केल्यानंतर नातेवाईकांची बाहेर ससेहोलपट होते आहे. रूग्णाच्या तपासण्या, भोजन, औषधी वगैरेसाठी एखाद्या नातेवाईकाला थांबावेच लागते. त्याच्या सुरक्षेची काळजी आहेच. वातावरण चिंतेचे, धावपळीचे, विवादाचे आणि संशयाचे आहे. विश्वासाचे, सहकार्याचे आणि सामंजस्याचे वातावरण तयार करायला भरपूर संधी आहे.
जळगाव शहरातील कोविडशी लढाईचे एक चित्र समोर असताना लातूर शहरात नोबेल हॉस्पिटल ॲण्ड क्रिटीकल केअर सेंटर आणि दिवाणजी लॉन्स ॲण्ड हॉल यांनी कोविड रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी वेगळा पॕटर्न तयार केला आहे. लातूर मधील नोबेल हॉस्पिटल अगदी अलिकडचे आहे. दोन वर्षे झाली असतील. माझा भाचा डॉ. वेदांत अवस्थी आणि त्याचे मित्र डॉ. दीपक पाटील, डॉ. गिरीश पत्रीके, डॉ. ऋषिकेश हरिदास हे चौघे मिळून नोबेलचे व्यवस्थापन पाहतात. मागील वर्षी कोविडचा प्रारंभिक संसर्ग असताना चौघांनी थोड्या उशिराने कोविड उपचारासाठी सुरूवात केली. चौघा युवा डॉक्टरांचे एका विषयावर एकमत आहे. ते म्हणजे, ‘आपली वैद्यकीय सेवा नैतिकतेच्या आधारावरच असेल आणि अनावश्यक पैसा कसाही कमावला जाणार नाही.’ हे नुसते ठरवलेले नाही तर चौघांनी कृतीत आणले आहे. नोबेल हॉस्पिटलबाहेर नातेवाईकांची वर्दळ असते ती रूग्ण दाखल करायला. तेथे गेल्या वर्षभरात वाढीव बिलाच्या विवादाचे एकही प्रकरण उद्भवलेले नाही. जिल्हा प्रशासनाकडे एकही तक्रार नाही.
बिलासंदर्भात डॉ. वेदांत अवस्थी यांच्याशी बोललो. ते म्हणाले, ‘गेल्या वर्षभरात आमच्याकडील रूग्णांचे १० दिवसांचे सरासरी बील ४०/४५ हजार होते आहे. औषधाचा खर्च २५/३० हजार असतो. ७०/७५ हजार रूपयात रूग्ण घरी जातो आहे. वर्षभरात १ लाखावरील बीलाचे ५/६ रूग्ण असतील. ते सुद्धा गंभीर व चिंताजनक स्थितीतले असतील. कोविड महामारीत पैसा कमावणे हा आम्हा चौघांचा हेतूच नाही.’ डॉ. वेदांत पुढे म्हणाले, ‘मागील वर्षी आम्ही अर्धे हॉस्पिटल (४० पलंग) कोविडसाठी व अर्धे हॉस्पिटल (४० पलंग) नियमित सेवेसाठी ठेवले होते. पण कोविडची दुसरी लाट लक्षात घेऊन आता पूर्ण हॉस्पिटल कोविड उपचाराचे केले आहे. आम्हाला ८० पलंगांची परवानगी आहे. पुरेसे व्हेन्टिलेटर व आॕक्सिजन पलंग आहेत. जिल्हा प्रशासन किंवा आजी, माजी मंत्री यांच्या आदेशानुसार काही वाढीव रूग्ण घ्यावे लागतात. पण मनुष्यबळावरील ताण लक्षात घेऊन आम्ही जास्त रिस्क घेत नाही.’
डॉ. वेदांत अनुभव कथन करताना म्हणाले, ‘रोजच काही व्हिआयपी मंडळ रूग्ण दाखाल करायचा आग्रह करतात. अशावेळी आम्ही चौघांनी आपापसात ठरवून टाकले आहे. जो रूग्ण गंभीर आहे आणि उपचार घेतोय त्याकडेच लक्ष देऊ. काही वेळा आम्ही व्हिआयपींना समजावतो. तुमचा रूग्ण घरी बरा होऊ शकतो. आम्ही देतो ती औषधे घ्या आणि काळजी घ्या. घरीच बरे व्हाल. रोज जवळपास १०/१५ रूग्ण असेच घरी पाठवतो. रेमडेसिवीरची टंचाई आम्हालाही जाणवते आहे. ८० रूग्णात रोज किमान ४० रूग्णांना त्याची गरज आहे. कधीकधी काही मंडळी आम्हाला कोट्यातील इंजेक्शन दुसरीकडे देण्याचा आग्रह करतात. अशावेळी आमचे प्राधान्य अत्यवस्थ रूग्णच असतो.’ नोबेल हॉस्पिटलमधील चौघे डॉक्टर दिवसभरात किमान २ वेळा राऊंड घेतात. म्हणजे चौघांचे ८ राऊंड. त्यामुळे प्रत्येक रुग्ण नजरेसमोर असतो. चौघांचा समन्वय उत्तम असल्याने उपचारातील सातत्य व बदल यावर पटकन एकमत होते.
नोबेल हॉस्पिटलच्या नैतिक सेवेचे कौतुक करीत असताना अजून एका लक्षवेधी पॕटर्नचा उल्लेख करायलाच हवा. नोबेल हॉस्पिटलमध्ये कोविडवरील उपचारासाठी पडिले कुटुंबातील सदस्य आले होते. काही जण अजूनही उपचार घेत आहेत. या मंडळींचे उपचारावर समाधान झाले. ओम पडिले हे लातूरमधील प्रस्थ आहे. त्यांनी डॉ. अवस्थी यांना विचारले, ‘मी काय मदत करू शकतो ?’ तेव्हा डॉ. अवस्थी यांनी रूग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय सांगितली. त्यावर पडिले यांनी सर्वोत्तम पर्याय दिला. नोबेल हॉस्पिटलजवळ पडिले यांचे दिवाणजी लॉन्स व हॉल आहे. सध्या लॉक डाऊनमध्ये सर्व बंद आहे. पडिले यांनी हॉस्पिटलजवळ एक लहान मंडप लावून सावलीची व्यवस्था केली. खालचा हॉल खुला केला. तेथे मॕट आणि गाद्या टाकल्या. कुलर लावले. रूग्णांच्या नातेवाईकांना थांबायची, चहा, नास्ता, भोजन याची मोफत सोय केली. बसायची व आरामाची व्यवस्था केली. याचा परिणाम असा आहे की, रूग्णांचे नातेवाईक आपापसात बोलतात. रूग्णांची अवस्था एकमेकाला सांगून धीर देतात. आपली चिंता इतरांपेक्षा कमी असल्याची जाणीव त्यांना होते. थोडा आराम करून ते सारासार विचार करतात. यामुळे हॉस्पिटलजवळ विवाद होत नाहीत. आरडाओरड नसतो.
लातूरमध्ये रूग्णांना दिलासा देणारी वैद्यकीय सेवा नोबेल हॉस्पिटलने व रूग्णांच्या नातेवाईकांना धीर देणारी सेवा दिवाणजी लॉन्सने केली आहे. कोविडशी लढण्याचा हा वेगळाच लातूर पॕटर्न आहे.
- दिलीप तिवारी, जळगाव