माणसाने… माणसाशी..
तो दिवस होता ९ नोव्हेंबर, २०१६ चा. आदल्या रात्रीच पंतप्रधान मोदींनी नोटबंदी घोषित केली होती. अकोला-बाळापुर रस्त्यावरच्या मराठा हॉटेल च्या काउंटर वर हॉटेल चे मालक मुरलीधर राउत संचित मुद्रेने बसले होते. दुपारी बारा च्या सुमारास एका कार मधून एक कुटुंब हॉटेलसमोर येऊन थांबले. त्यांनी मालकांकडे चौकशी केली, “आमच्याकडे फक्त ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा च आहेत, खूप दुरून आलोय, भूक लागली आहे, तुमच्या हॉटेल मध्ये जेवणाची व्यवस्था होऊ शकेल का?” मुरलीधर राउत चांगलेच धर्मसंकटात सापडले होते. जुन्या नोटा तर आता घेता येणार नव्हत्या, आणि समोर गाडीत ऐन दुपारी लहान मुलं आणि वृद्ध महिलाही दिसत होत्या. त्यांनी त्या प्रवाश्याला सांगितले, “हरकत नाही, तुम्ही पुन्हा या मार्गाने परत याल तेव्हा पैसे द्या.” तो प्रवासी अगतीकतेने म्हणाला, “पण आम्ही या मार्गाने परत येणारच नाही आहोत.” पैसे न देता जेवण करणे त्यांना ही पटत नव्हते, आणि राउत त्या नोटा घेऊ शकत नव्हते. शेवटी राउतांनी मनाशी विचार केला आणि त्यांना सांगितले, “तुम्ही आधी जेवण तर करा, नंतर बघू काय करायचे ते.” कुटुंबाने आनंदाने तृप्त होत जेवण केलं. राउतांनी त्यांची ती पाचशेची नोट घेऊन त्या बदल्यात त्यांना शंभर च्या पाच नोटा दिल्या, पुढच्या प्रवासात त्यांना अडचण येऊ नये म्हणून.
त्या प्रसंगानंतर बाहेरगावहून येणाऱ्या कुठल्याही प्रवाश्याला त्यांनी त्या काळात नोटांच्या अडचणीमुळे उपाशी परत पाठवलं नाही. त्यांनी आपल्या हॉटेलवर एक फलक लावला, “नोटांची अडचण असेल तर घाबरू नका, आत्ता जेवण करा, पुढच्या फेरीच्या वेळी पैसे द्या, नाही द्यायला जमले तरी हरकत नाही” एकाही गिऱ्हाईकाचा पत्ता, फोन नंबर देखील न घेता, त्यांनी हजारो प्रवाशांना ही सेवा दिली. मोदींनी त्यांची खास दखल त्यांच्या “मन कि बात” मधून घेतली. मागच्या वर्षी पहिल्या लॉकडाउन च्या काळात अनेक स्थलांतरीत मजुरांना त्यांनी मोफत जेवणाची व्यवस्था केली. मध्यंतरीच्या काळात हायवे च्या चौपदरीकरणाच्या कामात त्यांचे हॉटेल त्यांना पाडावे लागले. जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही, म्हणून हे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले, अनेक महिने त्यांनी सोबतच्या अश्याच जमिनी गेलेल्या ११४ शेतकरी कुटुंबासोबत त्यासाठी संघर्ष केला. शेवटी विषयाची तीव्रता शासनाच्या लक्षात यावी म्हणून पाच शेतकऱ्यांसोबत जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये विषप्राशन करायचा ही प्रयत्न केला. देवकृपेने ते सर्व यातून वाचले, परंतू या घटनेमुळे साऱ्या पिडीत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा योग्य तो मोबदला देण्याचे मान्य केले गेले.
आलेल्या पैशातून बँकेचे कर्ज फिटले, नवीन हॉटेल बांधायला हि पैसा मिळाला, तरीही बरेच पैसे शिल्लक उरले होते. मुरलीधर राउतांनी विचार केला, या उरलेल्या पैश्यांवर माझा अधिकार नाही. कोरोनाच्या काळात नवीन हॉटेल आणि लॉनची गिर्हाईकी ही कमी झाली होती, ते त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नासाठी मोफत देण्याचे ठरवले. एकही पैसा न घेता मोठ्या थाटामाटात आतापर्यंत स्वखर्चाने २२ मुला-मुलींची लग्न जेवण, फोटोग्राफी सहित त्यांनी लाऊन दिली आहेत. दर आठवड्याला आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची RTPCR टेस्ट करून, कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता ते स्वतः आणि त्यांचे कर्मचारी या कार्यात गुंतून गेले आहेत. राउत कुठल्याही संघटनेचे, पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते नाहीत. समाजसंकटाच्या काळात समोर दिसत असलेल्या प्रसंगात ते फक्त आपल्या आतल्या माणुसकीला स्मरून वागले आहेत.
गेल्या वर्षीच्या कोरोनाच्या जागतिक संकटाच्या काळात अनेक संस्था-संघटनांनी, मंदिरांनी, उद्योगपतींनी, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मोठी मदतकार्ये उभी केली. संघाच्याही स्वयंसेवकांनी अनेक ठिकाणी पोहचून निस्वार्थ सेवाकार्य केले. परंतू अशी देखील अनेक उदाहरणे आपल्याला या काळात समाजात बघायला मिळाली, कि कुठल्याही संस्थेचे, संघटनेचे, राजकीय पक्षाचे पाठबळ नसतांना आदल्या क्षणापर्यंत अत्यंत सामान्य जीवन जगणाऱ्या व्यक्तीने निकडीच्या प्रसंगी विलक्षण असे मदतकार्य करून दाखवले.
नंदुरबार जिल्ह्यातील ब्राम्हणपुरी नावाच्या छोट्या गावात डॉ. परेश पाटील यांच्या दवाखान्यात एक रुग्ण दाखल झाला होता. कोरोना मुळे त्याची प्रकृती गंभीर होत होती. त्याला तातडीने प्लाझ्मा देणे गरजेचे होते. परंतू कोरोना होऊन गेलेला असा प्लाझ्मा देऊ शकणारी व्यक्ती त्या छोट्या गावात शोधणेही अवघड होते. डॉ. परेश यांना दोन महिन्यापूर्वीच कोरोना होऊन गेला होता, त्यांनी थोडाही वेळ वाया न घालवता, विचार न करता तातडीने रात्रीच धुळ्याच्या लॅब मध्ये जाऊन प्लाझ्मादान केले आणि त्या रुगासाठी प्लाझ्मा ची व्यवस्था केली, त्याचे प्राण वाचविले.
सुप्रिया धनंजय सुरवसे या पिंपरी चिंचवड च्या कोरोना सेंटर वर स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहेत. गेल्याच वर्षी त्यांचा विवाह झाला, आणि तेव्हढ्यात कोरोनाचा कहर सुरु झाला. त्यांची नेमणूक कोरोना वॉर्ड मध्ये झाली. गेल्या वर्षभरात एक दर आठवड्याची साप्ताहिक सुटी सोडली तर, एकही दिवस त्या कामावर अनुपस्थित नाहीत. लग्न झाल्यावर कुठे फिरायला जाऊ शकल्या नाही कि स्वतःच्या गावीही जाऊ शकल्या नाही. त्यांचे नातेवाईक त्यांना काही दिवस तरी गावी येण्यास विनवता आहेत, पण सुप्रियाताई म्हणतात, “अशा कठीण प्रसंगी जर मी काम सोडून आले, तर माझे नर्सिंग चे शिक्षण घेण्याचा समाजाला काय उपयोग? मी माझे कर्तव्य सोडून कुठेही जाणार नाही.”
श्रीयुत गंगाधर टिपरे मालिकेतून प्रसिद्ध झालेला आपला शिऱ्या म्हणजे विकास कदम एक गुणी अभिनेता. गोलमाल, सिंघम, बोलबच्चन अश्या अनेक चित्रपटातून त्याने भूमिका केल्या, परंतू गेल्या वर्षभरापासून या सगळ्या लाईमलाईट पासून दूर राहून अतिशय सामान्य अश्या कोरोना योध्याच काम तो मुंबई च्या बीकेसी मध्ये कोरोना टेस्टिंग लॅब च्या माध्यमातून करतो आहे. दिवसाचे अक्षरशः चोवीस तास या लॅबचे काम सुरु आहे. मास्क, सॅनिटायझर वाटपाचे ही काम तो करतो आहे. कुठल्याही प्रसिद्धी माध्यमाच्या समोर न येता विकास गेले वर्षभर हे काम करतो आहे.
घाटकोपर मध्ये राहणारे दत्तात्रेय सावंत सर, पेशाने इंग्रजी चे शिक्षक, पण विनाअनुदानित शाळेत नोकरी असल्याने तुटपुंजा पगार. त्यात पुन्हा करोना मुळे लागलेल्या लॉकडाऊन मुळे हातातोंडाशी हि गाठ पडणे अवघड झाल्यामुळे सकाळची शाळा संपल्यावर त्यांनी रिक्षा चालविण्याचा व्यवसाय सुरु केला. गेल्या वर्षी शेजारी राहणाऱ्या एका म्हाताऱ्या महिला रुग्णाला कोरोना झाल्यावर रात्रीच्या वेळी कुणी रुग्णालयात घेऊन जायला तयार नव्हते. तिच्याकडे अँबुलन्स साठी पैसे नव्हते. शेवटी सावंत सरांनी मानाचा हिय्या करून तिला आपल्या रिक्षामध्ये बसवले आणि रुग्णालयात नेऊन सोडले. त्या दिवसापासून त्यांनी कोरोनाच्या रुग्णांना दवाखान्यात घेऊन जायची व तेथून परत घरी आणण्याची मोफत सेवा आपल्या रिक्षाने द्यायला सुरुवात केली. स्वतः सुरक्षेचे सगळे नियम पाळत गेले वर्षभर ते हे अनोखं मदतकार्य पार पाडत आहेत.
नंदुरबार च्या अमरधाम स्मशानभूमीत रोज अंगात पीपीइ किट घालून घामाच्या धारा निथळत असतांना माणुसकीच्या नात्याने अंत्यविधीची सेवा देणारे प्रमुख विशाल कामडी शववाहीन चालक मनोज चौधरी,मगन पाटील, अमरधाम व्यवस्था कांतीलाल ढंढोरे प्रत्यक्ष अंत्यसंस्कार करणारे राकेश ठाकरे,संजय वळवी तसेच दफनविधी साठी अर्शद भाई,व जेसीबी चालक पांडुरंग धनगर आपले कार्य मनावर दगड ठेऊन करतायेत.
भावना पोफळे नावाची मालेगावला राहणारी एक तरुण गायिका. कोरोनामुळे सतत येणाऱ्या मृत्यूच्या, ऑक्सिजन, रेमडेसविर चा तुटवड्याच्या नकारात्मक बातम्यांच्यामुळे पसरणाऱ्या उदासीनतेचे वातावरण तिला अस्वस्थ करीत होते. तिने तिच्या संपर्कातल्या व्यक्तींची मोबाईलवर एक ब्रॉडकोस्ट लिस्ट बनवली, त्यावर ती रोज सकाळी स्वतःच्या आवाजात गायलेले एक सकारात्मक गाणे आणि काही सकारात्मक विचार प्रस्तुत करते. अनेक जणांनी तिचा हा उपक्रम स्वतःच्या ब्रॉडकास्ट लिस्ट बनवून पसरवायलाही सुरुवात केलीये.
अशी असंख्य उदाहरणे आपल्याला आपल्या आसपास घडतांना दिसत असतील. बिहारच्या ऑक्सिजन प्लांट मध्ये जेवणाची वेळ उलटून गेली तरी जेवणाचा डबा दूर सारून आधी आजचा ऑक्सिजन निर्मितीचा कोटा पूर्ण केल्याशिवाय आम्ही जेवणार नाही म्हणणारे प्लांट वर काम करणारे सामान्य मजूर असतील. दिवसभर अंगात पीपीइ किट घालून कोरोना मुळे मृत्यू झालेल्या मृतांचा अंत्यसंस्कार करणारे कार्यकर्ते असतील. रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना वेळेवर पोटभर आणि गरम अन्न पोहचवणारे अनेक सर्वसामान्य व्यक्ती असतील, ही सारी मंडळी एकाच भावनेने काम करतांना दिसतात, ते म्हणजे, “माणसाने माणसाशी माणसासम वागणे.”
कोरोनाच्या या निराशावादी काळात अनेक नकारात्मक बातम्यांच्या प्रवाहात ही सारी छोटी अतिशय सामान्य वाटणारी माणसं, त्याहून छोट्या आणि सामान्य वाटणाऱ्या कृती करतांना दिसतायेत. मात्र याच सामान्य व्यक्ती आणि त्यांची सामान्य कृती हीच खरी प्रकाशाची बेटे आहेत, त्यांचा माणुसकीचा प्रकाशच जगाला या तमाच्या सागरातून पार करू शकणार आहे.
– अभिजीत खेडकर, नंदुरबार
विश्व संवाद केंद्र, देवगिरी