Opinion

पारंपरिक व पर्यावरणपूरक फिरती मोबाईल शवदाहिनी

आपल्या हिंदू धर्मात प्राचीन काळापासून मृत देहाला अग्नी देण्याची प्रथा आहे.  दहन झाल्यानंतर जे अस्थी-अवशेष राहतात ते विधिपूर्वक पवित्र स्थळी वा तीर्थात विसर्जित करण्यात येतात.  अंत्यसंस्कार हा भावनिक विधी करताना लाकडाच्या चितेशी आपल्या श्रद्धा आणि परंपरा जोडलेल्या आहेत. त्या तुटू नयेत तसेच पर्यावरणाचाही ऱ्हास कमी व्हावा, य दृष्टिकोनातून भारतीय तंत्रविज्ञान संस्था म्हणजेच आयआयटी, रोपर ने  फिरती विद्युत शवदाहिनी तयार केली आहे.

हिंदू समाजात अंत्यविधीसाठी प्रामुख्याने लाकडाचा वापर केला जातो. याचा विचार करून तसेच पर्यावरणाच्या होणाऱ्या हानीला आळा बसावा, याकरिता  या शवदाहिनीच्या नमुन्यासाठी वापरलेले तंत्रज्ञान हे अगदी नवीन असून त्यात लाकडाचा वापर केला असूनही ती धूर विरहीत आहे. एरवी शवदहनासाठी वापरल्या जाणाऱ्या लाकडाच्या तुलनेत यात लाकडाचा वापर निम्मा होतो आणि हवेच्या आधारे ज्वलनाचा वापर केल्याने ती पर्यावरणपूरकही आहे. वातीच्या स्टोव्हचे तंत्रज्ञान यात वापरले आहे. वातीचा स्टोव्ह पेटवल्यावर सुरुवातीला वातींची ज्योत पिवळ्या रंगांची असते. वातींवरील हवेचा वापर करणाऱ्या ज्वलनप्रणालीच्या मदतीने ही ज्वाला धूरविरहीत निळ्या ज्योतींमध्ये रुपांतरीत होते.

भारतीय तंत्रविज्ञान संस्थेचे प्रोफेसर आणि इंडस्ट्रियल कन्सल्टन्सी अँड स्पॉन्सर्ड रिसर्च अँड इंडस्ट्री इंटरॅक्शन (ICSR&II) चे डीन  डॉ. हरपाल सिंग यांनी ही प्रणाली विकसित केली आहे. ही शवदाहिनी 1044 डिग्री सेल्सियस पर्यंत तापत असल्यामुळे संपूर्ण निर्जंतुकीकरणही साधते, असेही ते सांगतात.

गाडीसारखी चाके असल्याने ही  शवदाहिनी कोठेही सहजगत्या नेता येते. हवेच्या सहाय्याने होणाऱ्या ज्वलनासाठी प्रारंभिक व नंतरच्या टप्प्यात लागणाऱ्या गरम हवेची व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली आहे. यात  शव नष्ट होण्यासाठी 12 तास लागतात. शवदाहिनी थंड होण्यासाठी लागणारा वेळही यात समाविष्ट आहे. सामान्य लाकडी शवदाहिनी थंड होण्यासाठी 48 तासांचा वेळ घेते. लाकडाच्या मर्यादित वापरामुळे कार्बन पदचिन्हे निम्म्याने वाचतात. उष्णतेच्या संचयनावरील दहन नसल्यामुळे याला थंड होण्यासही कमी वेळ लागतो. गाडीच्या दोन्ही बाजूला स्टेनलेस स्टीलचे रोधक आवरण असल्यामुळे उष्णता वाया जात नाही व लाकडांचा वापर कमी होतो. या उपकरणाखाली राख जमा करण्यासाठी पात्र सुद्धा आहे.

सध्या कोरोनाच्या महामारीमुळे मृतांचा आकडा वाढत चालला आहे.  महामारीसंबंधित सध्याची परिस्थिती बघता या शवदाहिनी व्यवस्थेचा स्वीकार केल्यास लाकडाचा वापर परवडत नसणाऱ्यांही आपल्या आप्तेष्टांच्या अंत्यविधीसाठी योग्य पर्याय असल्याचे,   चिमा बॉयलर्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक  हरजिंदर चिमा यांचे म्हणणे आहे. ही विद्युतदाहिनी सहज हलवण्याजोगी असल्यामुळे संबधित अधिकाऱ्यांच्या परवानगीने ती कुठेही नेता येईल. त्यामुळे आता अंत्येष्टीच्या जागी होणारी जागेची अडचण टाळण्यासाठी मदत होईल. 

एकंदरीतच लोकांच्या भावनांसोबतच पर्यावरण ऱ्हास कमी होण्याच्या दृष्टीने निर्माण करण्यात आलेली ही  पर्यावरणपूरक मोबाईल शवदाहिनी समाजाच्या प्रत्येक स्तरासाठी उपयुक्त ठरेल, यात तीळमात्र शंका नाही. 

**

Back to top button