कोरोना योद्धयांना पीपीई कीटमध्ये मध्ये घेता येणार मोकळा श्वास
मागच्या वर्षीपासून संपूर्ण देश कोरोना महामारीशी लढत आहे. या महामारीशी सर्वात जास्त लढा हा आरोग्य कर्मचाऱ्यांना द्यावा लागत आहे. अनेक डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ व अन्य आरोग्य कर्मचार्यांना स्वत:चा जीव धोक्यात घालून सेवा द्यावी लागते तसेच संसर्ग टाळण्यासाठी तासनतास सुरक्षा कीट मध्ये अर्थात पीपीई कीट मध्ये राहावे लागत आहे. कोरोना व्हायरसच्या या लढाईत पीपीई कीट सुरक्षा कवचाची भूमिका बजावत असले तरीही असे पीपीई कीट तासनतास घालून सेवा देणे कोरोना योद्ध्यांसाठी मोठे त्रासाचे ठरते. कारण पूर्णपणे पॅकबंद असलेल्या पीपीई कीटमध्ये हवेचे योग्य संतुलन होत नसल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यांचा हा त्रास कमी व्हावा यासाठी पीपीई कीटमध्ये हवा खेळती ठेवणार्या उपकरणाचे संशोधन करण्यात आले आहे.
मुंबईच्या के.जे.सोमैया अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या निहाल सिंग आदर्श याने एक व्हेंटिलेशन सिस्टिम विकसित केली आहे. यामुळे पीपीई कीटमधूनही कोरोना योद्धयांना घामाघूम न होता मोकळा श्वास घेता येणे शक्य होणार आहे. या अनोख्या उपकरणामुळे पीपीई कीटमध्ये हवा खेळती राहणार असून, त्यामुळे पीपीई कीटचा वापर त्यांच्यासाठी सुसह्य ठरणार आहे. तसेच अनेक तास पीपीई कीटमध्ये राहून फंगल संसर्गापासून बचाव होऊन आरोग्य सुरक्षित राहण्यासही यामुळे मदत होणार आहे.
पुण्यात राहणाऱ्या निहालची आई डॉक्टर असल्याने डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी यांना पीपीई कीटमध्ये काय त्रास होतो, घामामुळे बुरशीजन्य आजारांचा धोका कसा संभवतो, याची कल्पना निहालला होती. यावर उपाय म्हणून त्याने उपायात्मक संशोधन करण्याचा निर्णय घेतला आणि त्यातून ‘कोव्ह – टेक व्हेंटिलेशन सिस्टम’ची निर्मिती केली. त्याच्या या संशोधनात त्याला त्याच्या मित्रांची ऋत्विक मराठे आणि सायली भावसार यांची खूप मदत झाली. या दोघांनी या संशोधनात मोठी मदत केल्याची प्रतिक्रिया त्याने दिली.
हे उपकरण योग्य इलेक्ट्रॉनिक घटकांनी सुसज्ज असून यामुळे आसपासच्या बाहेरील हवा पीपीई कीटमध्ये शोषून घेण्यास मदत होते. परिणामी पीपीई कीटच्या आतमधील गरम आणि दमट हवा बाहेर फेकली जाते. यामुळे, पीपीई कीटमध्ये स्वच्छ हवेचा सतत प्रवाह राखला जातो. हे यंत्र २ ए चार्जर आणि बॅलन्स चार्जिंग टेक्नॉलॉजीसह सुसज्ज असून सुमारे चार तासात वेगवान चार्जिंग सक्षम करते.
.
केंद्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या, राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान उद्योजकता विकास मंडळाच्या साहाय्याने (एनएसटीईडीबी ) आरआयआयडीएल (रिसर्च इन्होवेशन इनक्युबेशन डिझाईन लॅबोरेटरी) येथे त्याने आपले संशोधन उपकरणात विकसित केले. लवकरच ही प्रणाली आणि यंत्रणा www.wattechnovations.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. निहालला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाकडून प्रोटोटाइप विकास आणि उत्पादनांच्या नावीन्यपूर्णतेसाठी १० लाख रुपयांचे निधी प्रयास अनुदान प्राप्त झाले आहे. आतापर्यंत प्रोटोटाईपमध्ये असणाऱ्या निहालचे हे संशोधन व्हॅट टेक्नोव्हिएशन या त्याच्या स्टार्टअप कंपनीद्वारे मे, जूनपर्यंत बाजारात वापरासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे.
हे उपकरण वजनाला हलके असून, हाताळण्यास सोपे असल्यामुळे कोरोना योद्धयांना आरामदायी पद्धतीने वापरता येणार आहे. कोरोना संकटात रुग्णांवर उपचार करताना हे उपकरण त्यांच्यासाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे.