प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर मृत्यूशी यशस्वी झुंज !
साधी सर्दी, खोकला वगैरे असे काही नसते, असतो तो थेट कोरोनाच. असे आपण कितीही थट्टामस्करीत बोलत असलो तरीही, खरॊखरच जेव्हा रिपोर्ट्सच पॉझीटिव्ह येतात आणि आपण कोरोनाग्रस्त झालो आहोत अशी जेव्हा खात्री पटते, तेव्हा डोळ्यासमोर काजवे चमकल्याशिवाय राहत नाहीत. त्यातच घरातील कर्ता पुरुषच जेव्हा कोरोना पॉझीटिव्ह होतो, तेव्हा मात्र संपूर्ण कुटुंबावरच आभाळ कोसळल्याची परिस्थिती निर्माण होते. आजारी असलेल्या त्या व्यक्तीला धीर कसा द्यायचा ते त्यावर उपचार कसे करायचे असे नानाविध प्रश्न पडू लागतात. परंतु याही परिस्थितीत जव्हार येथील सौ. वनिता नरेश मराड यांनी आत्मविश्वास न गमावता, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार, सकस व पौष्टिक आहार, योगा- प्राणायाम, सकारात्मक विचारसरणीसह प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर स्वतः कोरोना रुग्ण असूनही स्वतःची काळजी घेत आपल्या पतीचे प्राण वाचविलेच. मात्र सोबतच रुग्णालयात आपल्या वॉर्ड मध्ये असलेल्या इतर कोरोना रुग्णांचीही त्या मनोभावे सेवा करीत होत्या.
एप्रिल 2020 मध्ये वनिता मराड यांना ताप येत होता. त्यांचा ताप काही केल्या उतरत नव्हता. त्यातच मार्च महिन्यात कोरोनाने जगभरासह देशातही कसा धिंगाणा घातला आहे, अशा संदर्भातील दाखविल्या जाणाऱ्या बातम्यांमुळे त्या खूपच घाबरल्या होत्या. कोरोना झाला नसतानाही आपल्याला कोरोनाच झाला आहे, या केवळ एका शंकेमुळे आणि भीतीमुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्या पूर्णपणे नैराश्यावस्थेत गेल्या होत्या. या नैराश्यावस्थेत आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात घोळत होता. आत्महत्येचा प्रयत्नही त्यांनी केला होता. पण त्यांच्या पतीने त्यांना योग्य वेळी सावरले, मानसोपचार तज्ञाद्वारे त्यांचे समुपदेशन, औषधोपचार सुरु केला आणि त्या ठणठणीत बऱ्या झाल्या. कोरोना झाला नसतानाही त्या इतक्या नैराश्यावस्थेत गेल्या होत्या. कुठलेतरी वाईट विचार आपल्याला सर्वागाने पटकन अधू बनवतात त्यामुळे होत्याचे नव्हते व्हायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे कुठल्यातरी आजाराने मानसिक खच्चीकरण करून मृत्यूला आमंत्रण देणे, हे कधीच योग्य नाही. आपला जीव हा अनमोल आहे, हे पक्के लक्षात घ्यायला हवे.
केवळ कोरोनाच्या धास्तीने पूर्णपणे खचलेल्या वनिता मराड यांना एक वर्षानंतर खरोखरच कोरोनाशी सामना करावा लागला. एप्रिल 2021 मध्ये त्यांचे पती नरेश मराड यांना ताप येऊ लागला. त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पाठोपाठ वनिता मराड यांचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला. सुरुवातीला ते दोघेही घरीच कॉरंटाईन होते. त्यानंतर मात्र नरेश मराड यांची तब्ब्येत खालावत चालली असल्यामुळे 21 एप्रिल ला ते दोघेही विक्रमगड येथील कोविड सेंटर मध्ये दाखल झाले. त्यांच्या यजमानांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. वनिता मराड ज्या बेडवर उपचारार्थ दाखल होत्या. त्या बेडच्या शेजारील रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्या मयत व्यक्तीला पाहून तसेच त्याच्या नातलगांच्या आक्रोशाने वनिता मराड यांचा धीर चेपत चालला होता. मराड यांचे नातेवाईक त्यांना वेळोवेळी धीर देत होते. मनाने खचलेल्या मराड यांची या परिस्थितीतून यशस्वीपणे बाहेर पडायची मानसिक तयारी झाली होती, पण त्यांचे पती मात्र पुरते खचले होते.
गेल्या वर्षी आपल्या पतीने आपल्याला मरणाच्या दारातून खेचून आणले, आता मी त्यांना कोणत्याही परिस्थितीत मृत्यूपासून खेचून आणणार, असे मनात स्वतःशीच पक्के करून त्या दिशेने त्यांची घोडदौड सुरु झाली. स्वतःची काळजी घेता घेता त्या आपल्या पतीची अहोरात्र सेवा करीत होत्या. आपल्या सोबतच्या कोरोना रुग्णांचे हालही त्यांना बघवत नव्हते. त्यामुळे त्या त्यांचीही आवश्यक ती काळजी घेत होत्या. आपले मन त्यांनी रुग्णालयात सेवाकार्य करीत गुंतवून ठेवले. अतिदक्षता विभागात असलेल्या आपल्या पतीची अवस्था पाहून त्या आतून कोलमडत होत्या. पण केवळ आपल्या पतीला याबद्दल काही कळू द्यायचे नाही म्हणून त्या यशस्वीपणे या सगळ्यावर मात करीत होत्या. त्यांच्या पतीला भूक लागत नव्हती, त्यामुळे त्या पूर्ण हवालदिल झालेल्या. पण त्याही परिस्थितीवर मात करत त्या मायेच्या ममत्वाने त्यांच्यावर मेहनत घेत होत्या. कमी झालेली त्यांची ऑक्सिजन मात्रा देखील आता वाढू लागली होती. १५ ते २० दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर पुर्णपणे कोरोना मुक्त होऊन ते घरी परतले.
कोरोनाने निर्माण झालेले वातावरण कितीही नकारात्मक असले तरीही कोरोनाला न घाबरता, कोरोनाशी झुंज देण्याची वेळ आलीच तर त्यापुढे हार न मानता धैर्य, जिद्द, चिकाटी आणि सकारात्मक विचाराच्या बळावर कोरोनासारख्या गंभीर संकटावर मात करणे शक्य आहे. आजार लपवून काही होत नाही. उलट तो आणखी बळावतो. मग आपल्यालाच शारिरीक आणि मानसिक दोन्ही प्रकारचा त्रास सोसावा लागतो. त्यामुळे हे त्रास न करून घेता योग्य वेळी उपचार करा, योगा-प्राणायम करा, काळजी घ्या, सुरक्षित अंतर ठेवा. कोरोनावर यशस्वीपणे मात करणे आपल्याच हातात आहे, हेच यावरून सिद्ध होते.