
दिव्यांगांच्या सर्वागीण विकासाकरिता काम करणाऱ्या ‘सक्षम’ या सेवाभावी संस्थेच्यावतीने सक्षम कोविड ॲक्शन नेटवर्क ‘स्कॅन’ सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्तरावर सुरु करण्यात आलेल्या या ‘स्कॅन’ द्वारे दिव्यांगांना लसीकरणासंबंधी माहिती, वैद्यकीय मार्गदर्शन, वैद्यकीय मदत, औषधोपचार, शिधावाटप, जीवनावश्यक वस्तू आदी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहेत. संपूर्ण देशभरातील दिव्यांगांना ‘स्कॅन’ ने सुरु केलेल्या 0120-690-4999 या टोल फ्री क्रमांकामुळे या सर्व सुविधांचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
कोविड- 19 महामारीचा फैलाव होण्याचा धोका संपूर्ण जनतेला असला तरी दिव्यांगांना त्यांच्या शारीरिक, ज्ञानेंद्रियांच्या तसेच संवेदनात्मक मर्यादांमुळे या आजाराचा धोका जास्त प्रमाणात संभवतो. त्यांना या धोक्यापासून वाचविण्यासाठी अर्थात त्यांना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी ‘स्कॅन’ ने पुढाकार घेतला आहे.
‘स्कॅन’ ने सुरु केलेल्या टोल फ्री क्रमांकामुळे दिव्यांगांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्यांचे निराकरण केले जात आहे.

‘स्कॅन’ च्या माध्यमातून प्राथमिक स्तरावर हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली येथे कॉल सेंटर सुरु करण्यात आले असून या कॉल सेंटर मध्ये देशभरातील गरजूंकडून आलेल्या शंकांची सविस्तर माहिती घेतली जाते. कुठल्या प्रकारची मदत त्यांना अपेक्षित आहे, त्या मदतीचे वर्गीकरण केले जाते. हे वर्गीकरण लसीकरणसंबंधी, वैद्यकीय सल्ला आणि गरजूंपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचविणे अशा तीन टप्प्यांत केले जाते. त्यानुसार ती सेवा पुरविली जात आहे. ६० ते ७० डॉक्टरांच्या माध्यमातून वैद्यकीय सल्ले देऊन गरजूंच्या शंकांचे निरसन केले जात आहे. व्हाट्सएप द्वारे त्यांचे रिपोर्ट्स पाहून त्यानुसारही त्यांना मार्गदर्शन केले जात आहे. रक्तदान, प्लाझ्मादान सारखी सेवाकार्ये करणाऱ्या इतर १०० सेवाभावी संस्थांचीही मदत घेतली जात आहे. ‘स्कॅन’ च्या या कार्यात इन्कलुझिव्ह दिव्यांगजन एंटरप्रेनेयुअर्स असोसिएशन (आयडिया) चे सहकार्य लाभत आहे.

मागील वर्षी ३२१ जिल्ह्यांमध्ये कोरोना महामारीच्या काळात काम केले होते. यावेळी २ लाख ८९ हजार ६२० गरजूंना मदत करण्यात आली होती. सक्षमचे ३ हजार ४४९ कार्यकर्ते या सेवाकार्यात आपली कर्तव्यभूमिका बजावत होते. ३५ हजार ६६१ जणांना शिधावाटप करण्यात आले. ३६ हजार ७४९ जणांना दररोज भोजन वाटप करण्यात आले. ४ लाख ७३ हजार ४७० जणांना फूड पॅकेट्स वितरित करण्यात आले. १ लाख ८ हजार ९४२ जणांना मास्कचे वाटप करण्यात आले. तर ४५ हजार ५१३ जणांना सॅनिटायझर आणि साबण वितरित करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर १ हजार ३३२ युनिट्स रक्तसंचय करण्यात आला होता.

सक्षमने १९९८-९९ सालापासून दृष्टीहिनांसाठी काम करण्यास प्रारंभ केला. २००८ सालापासून समदृष्टि, क्षमताविकास आणि अनुसंधान मंडल या नावाने सक्षमने आपले हे सेवाभावी कार्य दिव्यांगांसाठी सुरु केले. सक्षमचे हे कार्य संपूर्ण देशभरातील ४३ प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. दृष्टीबाधित, श्रवणबाधित, अस्थिबाधित, कुष्ठबाधित, बुद्धिबाधित, रक्तबाधित, मनोरुग्ण अशा ७ भागात दिव्यांगांचे वर्गीकरण करून त्यानुसार शिक्षण, आरोग्य, सामाजिक विकास आणि स्वावलंबन असे उपक्रम राबविले जातात.