दापोलीत पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे बंगाली आणि झारखंडमधील लाभार्थी?
मुंबई, दि. ९ जून – पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीच्या लाभार्थ्यांच्या यादीत प्रचंड घोटाळा झाल्याचे दिसून येत आहे. दापोलीतील अडखळ, आंजर्ले आणि आडे या गावातील लाभार्थ्यांच्या यादीत बंगालमधील काही मुस्लिमांची नावे व झारखंडमधील काही वनवासींची नावे आढळून आली आहेत. ही अनियमितता उघड झाल्याने स्थानिक तालुका प्रशासनही हादरले आहे.
लीगल राईट्स ऑब्जर्वेटरीने(एलआरओ) ही गोष्ट पंतप्रधान कार्यालयाच्या लक्षात आणून दिली आहे. गावाच्या लोकसंख्येच्या तुलनेत गावात लाभार्थ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आल्याचे एलआरओने पंतप्रधान कार्यालयाकडे केलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे.
या घोटाळ्यात एकतर राज्याच्या महसूल विभागाचा समावेश आहे की अन्य काही तांत्रिक कारणामुळे दुसऱ्या राज्यातील नावे स्थानिक यादीत जोडली गेली आहेत याची पडताळणी होणे आवश्यक आहे. या घोटाळ्यास महाराष्ट्र राज्य कृषी विभाग वा महसूल खाते वा अन्य कोणी जबाबदार असल्यास त्याची केंद्रीय तपासणी यंत्रणांद्वारे सखोल पडताळणी व्हावी व दोषींना योग्य शिक्षा केली जावी, असेही त्या तक्रारीत म्हटले आहे. लाभार्थ्यांच्या यादीत काही संशयास्पद नावे दिसून आल्याने त्यांचा सातबाराचा उतारा आहे का हे पाहताना तो उपलब्ध नसल्याचे धक्कादायक सत्य समोर आले. त्यानंतर एलआरओने पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार दाखल केली.