जागतिक योगदिनी देशात कोरोना लसीकरणाचा विक्रमी योग; दिवसभरात 80 लाख लोकांनी घेतली लस
नवी दिल्ली, दि. २२ जून : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लसीकरणावर भर दिला जात आहे. जागतिक योगदिनी लसीकरणाने वेग घेतला असून सोमवारी दिवसभरात 80 लाख लस देण्यात आल्या आहेत. लसीकरणाचा हा आतापर्यंतचा विक्रम आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात लस देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारकडून नागरिकांनी मोफत लस देण्यात येत आहे.
सोमवारी झालेल्या विक्रमी लसीकरणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी ‘वेल डन इंडिया’ असे म्हटले आहे. कोरोनाच्या लढाईत लसीकरण हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. ज्यांनी लस घेतली त्या सर्वांचे अभिनंदन, तसेच सर्वच फ्रंटलाईन वर्कर्संचेही कौतुक, असे मोदींनी ट्विट करुन म्हटले आहे.
केंद्र सरकारकडून सर्व नागरिकांना लस मोफत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली होती. तसेच आजपासून लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारने 75 टक्के लसींची खरेदी स्वतः करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 25 टक्के लस खाजगी रुग्णालये खरेदी करणार आहेत. आता केंद्र सरकार लस विकत घेऊन राज्यांना देणार आहेत. याआधी राज्य त्यांच्या लस विकत घेत होते.
आज एका दिवसात झालेलं लसीकरण
मध्यप्रदेश – 14 लाख 71 हजार 936
कर्नाटक -10 लाख 36 हजार 523
उत्तर प्रदेश – 6 लाख 57 हजार 689
राजस्थान – 4 लाख 22 हजार 347
गुजरात – 4 लाख 97 हजार 078
महाराष्ट्र – 3 लाख 75 हजार 144
मुंबई – 81 हजार 985