HinduismNews

हिंदू सण, उत्सव.. भारतीय अर्थव्यवस्थेचे बळकट आधारस्तंभ..

Hindu festivals and economics..

सर्वप्रथम आपणांस हिंदू नववर्षाच्या, गुडीपाडवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! नुकतेच आपले हिंदू नववर्ष सुरु झाले.. नवीन हिंदू वर्षाची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. याबरोबरच चैत्र नवरात्री आणि गुढीपाडवा हा सण आपण हर्ष उल्हासात साजरा करतो. गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने नवीन वस्तू, वास्तू,घरे,गाड्या, उद्योगाचा, व्यवसायाचा आरंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो. नूतन संवत्सराची सुरुवात, म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो.

भारत ही उत्सव, महोत्सव, सणांची भूमी आहे. चैत्र महिन्यातील गुढीपाडव्यापासून फाल्गुन महिन्यात साजऱ्या होणाऱ्या होलिकोत्सवापर्यंत सण साजरे होत असतात. राखी पौर्णिमेपासून सुरू होणारे उत्सव ओणम, पोंगल, दुर्गापूजा, धनत्रयोदशी, दिवाळी पाडवा, भाऊबीज असे सुरूच असतात. प्रत्येक सणाच्या निमित्ताने देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळत असते. हिंदू सण हे केवळ धार्मिकच नव्हे, तर आर्थिकदृष्ट्याही खूप महत्त्वाचे आहेत. सणांमुळे किरकोळ व्यापार वाढतो, रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

गुढीपाडवाच्या निमित्ताने, महाराष्ट्रात वाहन नोंदणीत लक्षणीय वाढ झाली आहे, राज्यभरात ८६,८१४ वाहनांची नोंदणी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गेल्या वर्षीच्या तुलनेत नोंदणींमध्ये ३० टक्के वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.वाहन नोंदणीमध्ये वाढ झालेल्यांमध्ये दुचाकी, चारचाकी आणि विशेष म्हणजे पर्यावरणपूरक इलेकट्रीक वाहनांचा देखील मोठ्याप्रमाणात समावेश आहे.

यावर्षीच्या गुढी पाडव्याला संपलेल्या आठवड्यात या वर्षी वाहन नोंदणीमध्ये वाढ झालेल्या महाराष्ट्रातील पाच प्रमुख परिवहन कार्यालयांपैकीमोठी वाढ दिसून आली आहे. गुढी पाडव्यानिमित्त गेल्या सात दिवसांत राज्यात नवीन खरेदी केलेल्या दुचाकी, चारचाकी आणि इतर वाहनांची नोंदणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. २०२४ च्या तुलनेत, या वर्षी वाहन नोंदणीमध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे,” असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

खालील पाच प्रमुख प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये झालेल्या वाहन नोंदणी पुढीलप्रमाणे:

  • पुणे आरटीओ – ११,०५६ वाहन नोंदणी
  • पिंपरी-चिंचवड आरटीओ – ६,६४८ वाहन नोंदणी
  • नाशिक आरटीओ – ३,६२६ वाहन नोंदणी
  • मुंबई (मध्य) आरटीओ – ३,१५४ वाहन नोंदणी
  • ठाणे आरटीओ – ३,१०७ वाहन नोंदणी

हिंदू सणांचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम:-

किरकोळ वस्तूच्या मागणीत वाढः दिवाळी, दसरा, पाडवा रक्षाबंधन भाऊबीज आदी सणांमध्ये मिठाई, भेटवस्तू यांची देवाणघेवाण होते. कपडे खरेदी केले जातात, घरांना रंग लावून आकर्षक सजावट केली जाते. त्यामुळे या वस्तूंची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढते.

कृषी उत्पादनांच्या मागणीत वाढः बहुतेक सण हे शेतीशी संबंधित असल्याने सणासुदीला तेव्हा सहज उपलब्ध ऋतूनुसार असलेल्या कृषीमालाचा वापर केला जात असल्याने संबंधित कृषी उत्पादनांच्या मागणीत वाढ होते. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात खेळता पैसा येतो. यातील काही भागाची ते स्वतःसाठी खरेदी करीत असल्यानेही सर्वसाधारण मागणीत वाढ होते.

रोजगार निर्मितीः सणासुदीच्या निमित्ताने मागणीत होणाऱ्या वाढीचा पुरवठा करण्यास अनेक कारागीर गरज लागते. त्यामुळे असे काम करण्यास उत्सुक व्यक्तींना तात्पुरता रोजगार मिळतो. विषेशत ग्रामीण भागातील लोकांना त्याचा विशेष लाभ होतो.सणांच्या काळात विविध क्षेत्रांत, जसे की वाहतूक, पर्यटन, मनोरंजन, आणि किरकोळ व्यापार, रोजगाराच्या संधी वाढतात.

पर्यटन व्यवसायात वाढः काही विशेष सण उत्सव यामध्ये काही देशी विदेशी व्यक्तींना विशेष रुची असते, त्यामुळे लोक एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. यामुळे वाहतूक, आतिथ्य याबरोबर स्थानिक व्यवसायांची वाढ होते. कुंभमेळा, दुर्गापूजा, मकर संक्रांतीस साजरा केला जाणारा पतंगोत्सव यासारख्या सणामध्ये पर्यटन संबंधित व्यवसायात मोठी वाढ दिसते.

सांस्कृतिक अर्थव्यवस्थेस चालनाः उत्सवात हस्तकला, नृत्य, क्रीडाप्रकार, खाद्यपदार्थ यातून सांस्कृतिक प्रदर्शन होत असल्याने सांस्कृतिक अर्थव्यवस्थेस चालना मिळते.

उत्पादनात आणि उलाढालीत वाढः या काळात उत्सवाशी संबंधित सजावट सामान, फटाके यांची मागणी वाढल्याने उत्पादन वाढवावे लागते. त्यामुळे उत्पादक स्थानिक वितरक यांना विशेष फायदा होतो.

पायाभूत सुविधांत वाढः सण उत्सवाच्या निमित्ताने वाहतूक, निवास यांची मागणी वाढल्याने पायाभूत सुविधांना चालना मिळते.

डिजिटल अर्थव्यवस्थेत वाढः या काळात अनेक वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ होते. कोरोना कालखंडानंतर डिजिटल पेमेंट करणे लोकांना सोयीचे वाटते, त्यामुळे अनेकांना विशेषत तरुणांना हा पर्याय सोयीचा वाटत असल्याने ई-कॉमर्सची वाढ होत असून त्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेत आपोआपच वाढ होत आहे. एका अंदाजानुसार आता ६०% अधिक व्यवहार हे डिजिटल माध्यमातून होत असून अजून दहा वर्षांत त्यांचे प्रमाण ९५ % अधिक असण्याची शक्यता आहे.

स्थानिक व्यवसायात वाढः अनेक वस्तू सेवा स्थानिक पातळीवर भागवल्या जातात. यातील बऱ्याचशा गरजा लघु आणि मध्यम व्यावसायिकांकडून पूर्ण केल्या जात असल्याने स्थानिक व्यवसायात वाढ होते.

एकात्मतेत वाढः सणांच्या निमित्ताने प्रत्यक्षात गाठीभेटी होत असल्याने यासाठी स्थानिक व्यावसायिकांची मदत घेतली जात असल्याने व्यक्ती व्यक्तींमधील आदानप्रदान वाढीस लागते. त्यामुळे एकात्मतेत वाढ होते.

भारतात सणासुदीचा हंगाम वर्षभर सुरूच असतो. आमचा धर्म युगानुयुगे अर्थव्यवस्थेला चालना, प्रोत्साहन देणारा आहे. उदाहरण द्यायचे झालेतर भारतात ५००० टन कापूर दरवर्षी लागतो. यावरूनच तुम्हाला भारतीय बाजाराची ताकद लक्षात येईल.

भारतातील विविध प्रदेशांतील वैविध्यपूर्ण सणांमुळे समाज आणि सरकार यांत सांस्कृतिक समन्वय साधला जाऊन, स्थानिक उद्योग-व्यवसायांना गती मिळते. देशाचा सांस्कृतिक वारसाही जपला जातो. सण फक्त मजा आणि आनंद घेण्याचे प्रसंग नसतात. ते समाज आणि देशाची आर्थिक सुबत्ता, स्थायी विकासासाठी उपयुक्त ठरणारे बलशाली व महत्त्वपूर्ण घटक आहेत.

हिंदू अस्मिता आणि संस्कृती
जन मनात रूजवू या,
गुडीपाडवा आणि नववर्षाची सुरवात
याच संकल्पाने करू या..

Back to top button