सा. विवेकच्या ‘संघमंत्राचे उद्गाते – डॉ. हेडगेवार’ विशेषांकाची ७२ हजारांची प्रकाशनपूर्व विक्रमी नोंदणी
मुंबई, दि. २८ जून : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या विचारसूक्तांवर भाष्य करणाऱ्या ‘संघमंत्राचे उद्गाते – डॉ.हेडगेवार’ या विशेषांकासाठी ७२ हजारांहून अधिक जणांनी प्रकाशनपूर्व नोंदणी केली आहे. सा. विवेकतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या या विशेषांकाचे प्रकाशन दि. २१ जून रोजी डॉ.हेडगेवारांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून ऑनलाईन स्वरूपात रा.स्व.संघाचे माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते पार पडले.
डॉ. हेडगेवारांनी सांगितलेल्या संघमंत्राना जगणाऱ्या व्यक्तींनी आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या आधारावर डॉक्टरजींच्या संघमंत्रावर या विशेषांकात भाष्य केले आहे. यामध्ये भय्याजी जोशी, रंगा हरी, रमेश पतंगे, अनिरुद्ध देशपांडे, डॉ.मनमोहन वैद्य, डॉ. सतीश मोढ, डॉ. श्रीरंग गोडबोले, प्रमोद बापट, डॉ. अशोक कुकडे, निवेदिता भिडे आदी एकूण ३३ प्रतिष्ठित मान्यवरांचा समावेश आहे. विशेषांकाचे मुखपृष्ठ किशोर नागवडेकर यांनी केले असून विशेषांकाची विक्री किंमत ६० रुपये तर अंकाची पृष्ठसंख्या १८० आहे. विशेषांकाच्या नोंदणीकरिता ९५९४९६१८३९ या क्रमांकावर संपर्क साधावा.
**