ऑलिम्पिकमधील प्राचीन भारतीय खेळ
भारतीय संस्कृतीत क्रीडा अर्थात खेळ याला खूप महत्त्व आहे. प्राचीन काळापासूनच क्रीडा हे मनोरंजनाचे, शक्तिप्रदर्शनाचे, बलवर्धनाचे, प्रतिस्पर्ध्यावर मात करण्याचे साधन राहिले आहे. त्याचे पुरावेही आपल्या लेण्यांमध्ये प्राचीन मंदिरातील कोरीव कामांतून दिसून येतात. प्राचीन काळी भारतात अस्तित्वात असणाऱ्या अनेक महत्त्वाच्या खेळांचा समावेश ऑलिम्पिकमध्ये करण्यात आला आहे, ही भारतासाठी अत्यंत गौरवास्पद बाब आहे.
प्राचीन इतिहासात रथांची स्पर्धा, घोडेस्वारी, पोलो, धनुर्विद्या, भालेफेक, त्रिशुळफेक, थाळीफेक, मल्लयुद्ध, मुष्टीयुद्ध, वजन उचलणे, खोखो, कबड्डी, पोहणे असे अनेक खेळ दिसून येतात. कुंग फू, ज्युडो, कराटे, बॉक्सिंग या परदेशी खेळांचे मूळ ही भारतीय नियुद्ध म्हणजे निःशस्त्र खेळात दिसून येते. आपले आदर्श असणारी अनेक व्यक्तिमत्त्वे ही उत्तम क्रीडापटू आहेत. अभिमन्यू, अर्जुन, बलराम, गणपती, श्रीकृष्ण, परशुराम, छ.शिवाजी महाराज, गुरू गोविंद सिंह, सिद्धार्थ(गौतम बुद्ध), झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणी अब्बक्का हे सर्वजण उत्तम क्रीडापटू म्हणून प्रसिद्ध आहेत. भारताच्या संस्कृतीसंवर्धनात क्रीडाप्रकारांनी आणि या क्रीडापटूंनी मोलाची भर घातली आहे.
असे आहेत ऑलिम्पिकमधील प्राचीन भारतीय खेळ
तिरंदाजी अर्थात Archery
भीमबेटका या प्राचीनतम लेण्यांमध्ये तीरंदाजीचे अनेक नमुने कोरलेले दिसून येतात. ऋग्वेद, यजुर्वेद आणि अथर्ववेदात धनुष्यबाणाच्या तत्कालीन वापराचे दाखले मिळतात. यजुर्वेदात धनुर्विद्येचा उल्लेख आहे. प्राचीन संस्कृत वाङमयामध्येही तीरंदाजीचे उल्लेख दिसून येतात. कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही धनुर्विद्येचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. तक्षशिला विद्यापीठातील धनुर्विद्या विभागात विविध देशोदेशींचे १०३ राजपुत्र शिकत होते. इस्लामी आक्रमणापर्यंत धनुष्यबाणाचा वापर मुख्यत्वे रक्षणासाठी केला जात होता.
कुस्ती अर्थात wrestling
कुस्तीसाठी प्राचीन भारतात वापरला जाणारा शब्द आहे मलयुध्द, अंगयुध्द किंवा बाहुयुध्द. भारतात वैदिक वाङ्मयात, तसेच रामायण, महाभारतात मल्लविद्येचा अर्थात कुस्तीचा उल्लेख अनेक प्रसंगी येतो. प्रभू श्रीरामांच्या प्रोत्साहनाने वाली आणि सुग्रीवामध्ये मल्लयुद्ध झाले व वालीचा पाडाव झाला. कृष्ण, बलराम व भीम हे मल्लविद्येत प्रवीण होते, असे मल्लयुद्धांतील पराक्रमांच्या वर्णनावरून दिसून येते. हिंदू राजे, सरदार आपल्या पदरी नामांकित मल्ल बाळगत. विजयनगरचा राजा कृष्णदेवराय याच्या दरबारी दररोज कुस्त्या होत असत.
महाराष्ट्रात शिवकाळात व त्यानंतर पेशवाईत नामांकित कुस्तीगिरांना राजाश्रय होता. स्वतः थोरले बाजीराव व सदाशिवरावभाऊ मल्लविद्येचे उत्तम जाणकार होते. कोल्हापुरातील तांबड्या मातीचे कुस्तीचे आखाडे तर जगप्रसिद्ध आहेत. इ. स. १९२० साली सर दोराबजी टाटांच्या सहकार्याने काही कुस्तीगीर व खेळाडू अँटवर्प ऑलिंपिक सामन्यासाठी गेले होते. त्यावेळी शिंदे नावाच्या मल्लाने कुस्तीत थोडी चुणूक दाखविली. त्यानंतर १९४८ च्या लंडन ऑलिंपिक क्रीडासामन्यात भारताच्या खाशाबा जाधव यांनी फ्री-स्टाईल कुस्तीच्या फ्लायवेट गटात दोन कुस्त्या जिंकून सहावा क्रमांक मिळविला.
मल्लखांब
मल्लखांब या वैशिष्ट्येपूर्ण व्यायामप्रकाराचा उल्लेख १२व्या शतकातील मानसोल्लास ग्रंथात आढळतो. कुस्तीमध्ये प्राविण्य मिळविण्याच्या उद्देशाने मल्ल विशिष्ट लाकडी खांबावर अनेक कसरतींचे प्रकार करीत असल्याने त्यास हे नाव पडले. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे व्यायामशिक्षक बाळंभटदादा देवधर ह्यांनी मल्लखांबविद्येचे पुनरूज्जीवन केले, कुस्तीगिराच्या अंगी ताकद, चपळता, लवचिकपणा, डावपेचात्मक सफाई इ. गुणांच्या वाढीबरोबरच त्याचा दमही वाढावा या उद्देशाने मल्लखांबावरील कसरतींचे व उड्यांचे प्रकार तयार केले. १९३६ सालच्या बर्लिन ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यात डॉ. विश्वनाथ कर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली ३० मल्लखांबपटूंनी प्रात्यक्षिके सादर करून जगभरातील क्रीडापटूंची मने जिंकली होती.
भालाफेक
भूसेनेतील पायदळ व घोडदळ सैनिकांचे एक शस्त्र म्हणजे भाला. भाल्याच्या फाळाने शत्रूला भोसकून जायबंदी करता येते व ही जखम खोल असल्यामुळे ती लवकर बरी होत नाही. त्यामुळे प्राचीन कालापासून जगात सर्वत्र भाला वापरला जाई, मात्र त्या त्या समाजाच्या युद्धपद्धतीप्रमाणे त्याला महत्त्व मिळाले. ग्रीक व मराठे यांना भाला प्रिय होता. कुशाणाच्या व गुप्ताच्या नाण्यांवर आणि लेण्यांतील चित्रे व मूर्तिशिल्पे यांतही भाले आढळतात. कालिदासाच्या रघुवंशात भाल्याची वर्णने आहेत. भारतीय वंशाच्या भाला या शस्त्राने खेळला जाणारा भालाफेक हा क्रीडाप्रकार इ.स.पू. ७०८मध्ये ग्रीकांनी जुन्या ऑलिम्पिकमध्ये प्रथम आणला. ऍथेन्समध्ये १८९९मध्ये झालेल्या आधुनिक ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम भालाफेक खेळ समाविष्ट केला गेला.
**