अभाविप देशभरातील एक लाखांहून अधिक स्थानांवर तिरंगा फडकविणार
मुंबई, दि. १० ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करण्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या देशभरातील शाखा १ लाख २८ हजार ३३५ स्थानांवर तिरंगा फडकविणार आहेत. तसेच अभाविप भारताच्या अमृत महोत्सवी वर्षात इंटर्नशिप, शोभा यात्रा, सोशल मीडिया मोहीम, आजपर्यंत कधीही न ऐकलेल्या शूरवीरांच्या महतीवर आधारित लघुपट (Unsung Heroes) इत्यादी योजनांवर काम करणार आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची एक दिवसीय राष्ट्रीय कार्यकारी बैठक नुकतीच भोपाळमध्ये आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान, आगामी वर्षासाठी योजना, अभियान आणि कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली.
अभाविप राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या जलद अंमलबजावणीसाठी प्रत्येक प्रांतात समिती स्थापन करणार आहे. ही समिती त्यांच्या राज्यांतील सरकार, प्रशासन आणि विद्यापीठांना सूचना पाठवेल आणि त्यांच्या तात्काळ अंमलबजावणीसाठी प्रयत्नशील राहणार आहे.
वर्ष २०२२-२३ मध्ये अभाविपचा ही ७५ वा वर्धापन दिन असल्यामुळे त्या निमित्ताने अभाविपने पुढील दोन वर्ष मोठ्या अभियानांचे लक्ष्य ठेवले आहे, ज्यासाठी एक व्यापक मोहीम चालवण्यात येईल. या व्यतिरिक्त, “परिषद की पाठशाळा” या उपक्रमाचा विस्तार करण्याचा, देशभरातील महिलांच्या आरोग्यासाठी आणि सक्षमीकरणासाठी ‘ऋतुमती’ या अभियानाला आयाम म्हणून स्थापना करण्याचा कार्यकारी परिषदेत निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रीय कार्यकारी परिषदेच्या बैठकीत दोन ठराव आणि एक आवाहन पारित करण्यात आले. प्रस्ताव क्र.१ मध्ये कोरोना कालावधीत शिक्षण क्षेत्रातील समस्यांचा उल्लेख करून, केंद्र आणि राज्य सरकारांकडून उपायांची मागणी करण्यात आली आणि प्रस्ताव क्र.२ मध्ये देशातील सध्याच्या परिस्थितीचा उल्लेख करून निराकरणाची मागणी करण्यात आली. देशभरातील तरुणांनी या वर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे, तसेच आजपर्यंत कधीही न ऐकलेल्या शूरवीरांचे देखील स्मरण करावे, असे आवाहनही अभाविपच्या वतीने यावेळी करण्यात आले.
अभाविपच्या राष्ट्रीय महामंत्री, निधी त्रिपाठी म्हणाल्या, “एक दिवसीय बैठकीत कोरोनाच्या काळात शिक्षण क्षेत्राला ज्या आव्हानांना सामोरे जावे लागले, त्या आव्हानांवरील उपायांवर विस्तृत चर्चा झाली. या वर्षी भारत स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात प्रवेश करत आहे आणि यासाठी एक विशेष अभियानाची योजना करण्यात आली आहे .स्वातंत्र्याच्या या उत्सवामध्ये देशातील प्रत्येक नागरिक सहभागी व्हावा हाच आमचा प्रयत्न असेल.”