स्वातंत्र्याच्या वाटचालीत देशभक्त वैज्ञानिकांचेही सर्वश्रेष्ठ योगदान : प्रा. बी. एन. जगताप
मुंबई, दि. १९ ऑगस्ट : स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रीय विचारांनी कार्यरत देशभक्त वैज्ञानिक डॉ. महेंद्र लाल सरकार, आचार्य प्रफुल्ल चंद्र राय, आचार्य जगदीश चंद्र बसू, मेघनाद साहा, सत्येंद्रनाथ बोस, डॉ. आशुतोष मुखर्जी, चंद्रशेखर वेंकटरमण,प्रमाथा नाथ बोस आदींनी दिलेले योगदान सर्वश्रेष्ठ आहे. स्वराज्यासाठी झटणाऱ्या या देशभक्तांचे कार्य प्रेरणादायी आहे. त्यांच्याप्रमाणेच बोध घेऊन स्वतंत्र भारतातील प्रत्येक नागरिकाने आपापली कर्तव्ये पार पाडून देशहितोपयोगी कार्यास हातभार लावायला हवा, असे प्रतिपादन स्वदेशी विज्ञानाचे अभ्यासक आणि आयआयटी, मुंबईचे प्रा. बी. एन. जगताप यांनी केले. विज्ञान भारती कोकण प्रांत आणि विवेकानंद एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यपूर्व काळातील वैज्ञानिकांचे योगदान या विषयावर ऑनलाईन व्याख्यान मालिका सुरु करण्यात आली आहे. या मालिकेचे पहिले पुष्प प्रा. बी. एन. जगताप यांनी यावेळी गुंफले.
यावेळी बोलताना प्रा. बी. एन. जगताप म्हणाले कि, “स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांनी अपारंपरिक पद्धतीने भारताचे शोषण, तसेच आधुनिक विज्ञानाच्या नावावर भारतीयांच्या प्रतिष्ठेला धक्का देण्याचे कार्य केले. भारतीय वैज्ञानिकांकडून भौतिक शस्त्रासारखा तर्कपूर्ण अभ्यास आणि विज्ञानाच्या संशोधनातून ज्ञानाची निर्मिती होऊ नये, यासाठी इंग्रजांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण या सगळ्यांवर भारतीय वैज्ञानिकांनी यशस्वीपणे मात केली. विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये स्वदेशी भावनेचे प्रकटीकरण करण्याची प्रबळ उच्च भारतीय शास्त्रज्ञांनी बाळगली. अर्थहीन वाटणाऱ्या कित्येक भारतीय जीवनशैलीतील गोष्टी तर्काच्या आधारे सिद्ध करून दाखविल्या. पूर्वापार चालत आलेल्या आपल्या जीवनशैली अंधश्रद्धा नसून, त्याचे विज्ञानाशी साधर्म्य असल्याचे या वैज्ञानिकांनी आपल्या कार्यातून पटवून दिले आहे. त्याची प्रचिती आज संपूर्ण जग घेत आहे. विज्ञानाच्या प्रचार आणि प्रसारासाठी निधी जमा करण्याचे काम ही मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचा उपयोग राष्ट्रप्रथम या तत्वावर करण्यात आला आहे.
विज्ञान भारतीचे कार्यवाह माधव राजवाडे यांनी विज्ञान भारतीच्या कार्याचा आढावा यावेळी उपस्थितांसमोर मांडला . विज्ञान भारतीचे अध्यक्ष श्रीनिवास सामंत यांनी विज्ञान भारतीच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. विवेकानंद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अमर असराणी यांनी मार्गदर्शन पर भाषण केले. यावेळी विद्यार्थी विज्ञान मंथनाचे माहितीपत्रकाचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.