भारतीय हवाई दलासाठी डीआरडीओने विकसित केले अत्याधुनिक शाफ तंत्रज्ञान

रडारपासून असलेल्या धोक्यापासून मिळणार संरक्षण
पुणे, दि. २१ ऑगस्ट : डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांचे शत्रूच्या रडारमध्ये पकडले जाण्यापासून संरक्षण करण्यासाठी आधुनिक शाफ तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे लढाऊ विमानांना रडारपासून असलेल्या धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे. जोधपुर येथील संरक्षण प्रयोगशाळा आणि पुण्यातील एचईएमआरएल अर्थात उच्च उर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा या डीआरडीओच्या संस्थांनी एकमेकांच्या सहकार्याने भारतीय हवाई दलाच्या दर्जात्मक पात्रता पूर्ण करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
तंत्रज्ञान वापराच्या यशस्वी चाचण्यांनंतर भारतीय हवाई दलाने वापर करण्याची प्रक्रिया सुरु केली. या महत्वाच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे संशोधन केल्याबद्दल केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओ, भारतीय हवाई दल तसेच उद्योग क्षेत्राचे कौतुक करून याला ‘आत्मनिर्भर भारताच्या’ दिशेने डीआरडीओने टाकलेले आणखी एक पाऊल म्हटले आहे.
शाफ हे शत्रूच्या रडारच्या धोक्यापासून वाचविणारे अत्यंत महत्त्वाचे संरक्षण तंत्रज्ञान आहे. यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात वापरलेले शाफचे साहित्य हवेत असताना शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशाभूल करण्यासाठी उपयुक्त ठरते आणि आणि त्यायोगे आपल्या लढाऊ विमानांचे संरक्षण करणे शक्य होते. भारतीय हवाई दलाला दरवर्षी आवश्यक असलेल्या शाफचा पुरवठा व्हावा करण्याच्या उद्देशाने हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणातील उत्पादनासाठी उद्योगांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.