Opinion

Swaraj@75 : अमृत महोत्सव – स्वातंत्र्य चळवळीतील ऐतिहासिक पान – कूका आंदोलन

1857 चा स्वातंत्र्य लढा यशस्वी होऊ शकला नाही, पण देशातील लोकांनी तो पराभव कधीच स्वीकारला नव्हता. अनेक संघटना जागोजागी तयार झाल्या. भक्ती चळवळ सुरू झाली. वनवासींनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र संघर्ष सुरू केला. यापैकी बहुतेकांचा प्रत्यक्ष प्रभाव क्षेत्र सीमित होता, परंतु त्यांच्याद्वारे करण्यात आलेली सार्वजनिक प्रबोधनाची कामे देशभरातील लोकांना स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी प्रेरणादायक, स्फूर्तिदायक होती. अशीच एक चळवळ बाबा राम सिंह यांनी पंजाबमध्ये सुरू केली होती.

बाबा राम सिंह यांचा जन्म 1816 साली वसंत पंचमीच्या दिवशी पंजाबच्या भैयानी अराइया या गावात झाला. त्यांचे बालपण गावात गेले. आईने त्यांना ‘श्री गुरु ग्रंथ साहिब’ चे वाचन करण्यास शिकवले. त्यांचे वडील सुतारकाम करत. परिणामी बाबा राम सिंह देखील या व्यवसायात गुंतले. बालपणीच त्यांचा विवाह झाला होता. बऱ्याच वर्षानंतर कामाच्या शोधात ते लुधियानाला आले. तेथे त्यांनी ख्रिश्चन पाद्रींना धर्मांतराचे काम करताना पाहिले. तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न आला कि, ‘मी माझ्या धर्माचा प्रचार करू शकत नाही का’? यावर उत्तर ‘होय’ असे मिळाले. मी सुद्धा माझ्या धर्माचा प्रचार करू शकतो, असे त्यांनी मनाशी पक्के केले आणि त्यांच्या मनात धर्माचा प्रसार करण्याचा संकल्प जागृत झाला.

काही काळानंतर त्यांना महाराणा रणजीत सिंह यांच्या सैन्यात नोकरी मिळाली. त्यांची रावळपिंडी येथे नियुक्ती करण्यात आली. रावळपिंडी जवळील एका गावात ‘बाबा बालक सिंह जी’ यांचा डेरा होता. बाबाजी आपल्या अनुयायांना साधे जीवन जगण्यासाठी, परमेश्वराचे स्मरण करण्यासाठी आणि अथक परिश्रम करून अर्थार्जन करण्याचा उपदेश देत असत. रामसिंहही त्या डेऱ्यात जाऊ लागले. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी सैनिकही मोठ्या संख्येने डेऱ्यात जाऊ लागले. यामुळे त्यांचे रेजिमेंट ‘भक्तांचे रेजिमेंट’ म्हणून प्रसिद्ध झाले. रामसिंहांची गणना बाबाजींच्या मुख्य शिष्यांमध्ये होऊ लागली.

1845 मध्ये तरुण भक्त रामसिंह सैन्याची नोकरी सोडून आपल्या भैयानी अराइया या गावात परतले. बाबा बालक सिंह आध्यात्मिक प्रगती, वैयक्तिक जीवनात सात्विकता आणि समाजात नैतिक मूल्ये प्रस्थापित करण्याच्या बाजूने होते. ते प्रभुनाम सिमरनच्या नावावर भर देत असत. त्यांचा हुंडा प्रथेला विरोध होता. कन्यावध आणि बालविवाहालाही ते कठोर विरोध करीत असत. ते स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान मानत. बाबा बालक सिंह आपल्या शिष्यांना नाव किंवा गुरु मंत्र देत असत. त्यामुळे त्यांच्या शिष्यांना नामधारी म्हटले गेले. ते सत्संगात मोठ्या स्वरात गात असत. उच्च स्वरात गाण्याला कुकना म्हटले जाते. म्हणूनच त्यांना ‘कुका’ असेही संबोधले जाते. आपल्या गावात आल्यानंतर भक्त राम सिंह यांनी आपल्या गुरूंच्या शिकवणीचा प्रसार करण्यास सुरुवात केली. आणि ते बाबा राम सिंह म्हणून ओळखले जाऊ लागले.

1862 मध्ये बाबा बालक सिंह यांचे निधन झाले. त्यांच्या शिष्यांनी बाबा बालक सिंह यांचे उत्तराधिकारी म्हणून बाबा राम सिंह यांची निवड केली. ते गुरु स्थानावर विराजमान झाले. त्यांनी शिष्यांना नावे देण्यास सुरुवात केली आणि ते स्वतः सद्गुरू राम सिंह म्हणून ओळखले जाऊ लागले. ते स्वत: ला दशम गुरू गोविंद सिंह यांचे अनुयायी मानत असे. 12 एप्रिल 1857 रोजी त्यांनी संत खालसाची स्थापना केली आणि शिष्यांना पाच ककार धारण करण्याचा उपदेश दिला. त्या वेळी कृपाण धारण करण्यास मनाई होती, म्हणून त्यांनी मजबूत जाड काठी ठेवण्याच्या सूचना दिल्या. संत खालसामध्ये महिलांनाही प्रवेश देण्यात आला.

सद्गुरू राम सिंह यांनी आपल्या शिष्यांना गटका, घोडेस्वारी आणि शस्त्रास्त्र हाताळण्याचे आव्हान केले. भक्तीबरोबरच लोकांमध्ये शक्ती जागृत करण्याचे कामही त्यांनी केले. दैवी प्रेरणेने संत खालसाची स्थापना झाली, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. प्रेम सुमार्ग या ग्रंथात या पंथाच्या स्थापनेची भविष्यवाणी करण्यात आली होती.

संत खालसाच्या स्थापनेनंतर, त्यांनी गुरू मताच्या प्रचारासाठी प्रवास केला, रागीच्या तुकड्या तयार केल्या. ग्रंथांच्या प्रती छापल्या गेल्या.

त्यांनी धर्माच्या प्रसाराबरोबरच समाजसुधारणेचे कार्यही चालू ठेवले. लग्नाची सोपी पद्धत ‘आनंद कारज’ ची सुरुवात केली. हुंडामुक्त विवाह होऊ लागले. कन्या वधाला विरोध झाला. खरे तर ती ‘मुलगी वाचवा’ ही मोहीमच होती. त्यांनी सरकारी न्यायालयांवर बहिष्कार टाकला. पांढरे शुभ्र आपल्या देशात तयार केलेले कपडे स्वीकारून त्यांनी स्वदेशी चळवळीला सुरुवात केली.

बाबा राम सिंह यांनी काश्मीर आणि नेपाळच्या सैन्यात कुकांची रेजिमेंट बनवली. अनेक सैनिक आणि सरकारी कर्मचारी ब्रिटिशांची नोकरी सोडून सद्गुरुंच्या सेवेत रुजू झाले. सद्गुरु महाराजांनी दुष्काळाच्या काळात अखंड लंगर चालवले. यामुळे प्रभावित होऊन ब्रिटीश कलेक्टरने त्यांना 2500 मरब्बे शेती भेट स्वरूपात देऊ केली, परंतु सद्गुरु महाराजांनी “ब्रिटिशांकडून 2500 मरब्बे जमीन भेट स्वरूपात घेऊन, आपण देशाच्या जमिनीचे स्वामी आहोत असे मानायचे का.” असे उत्तर देत, हा प्रस्ताव नाकारला. त्यांच्या उत्कट देशभक्तीचे हे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.

कुका अर्थात नामधारी गायीला माता मानत. त्यामुळे गायीची कत्तल करणे त्यांना मान्य नव्हते. त्यांनी अनेक ठिकाणी कत्तलखान्यांवर छापा मारून अनेक गायींची सुटका केली. सद्गुरू महाराज हे सत्याचे रक्षक होते. काही नामधारींनी अमृतसरच्या कत्तलखान्यावर हल्ला करून चार कसाईंना ठार मारले आणि पळून गेले. पोलिसांनी निष्पाप लोकांना पकडले. सद्गुरु महाराजांनी निष्पाप लोकांना शिक्षा होऊ नये म्हणून मारेकऱ्यांना आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले. त्यांनी शरणागती पत्करली. इतक्या उच्च पातळीवरील नैतिकतेचा नामधारींचा वाढता प्रभाव पाहून, इंग्रज सरकार चिंतित झाले, त्यांचा गुप्तचर विभाग या संघटनेच्या कार्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सक्रिय झाला. दररोज तो त्याचा अहवाल सरकारला पाठवत असे.

फेब्रुवारी 1859 मध्ये कुकांची थराजवाला गावाजवळ पोलिसांशी चकमक झाली. यात पोलिस जखमी झाले. आयते निमित्त मिळालेल्या ब्रिटिशांनी कुकांना (नामधारी) क्रूरपणे दडपले.

जानेवारी 1872 मध्ये कुकांनी मलेरकोटलावर हल्ला केला. मलेरकोटला हे मुस्लिम रियासत होते. तेथे गायींची खुली कत्तल होत असत. कुकांना हे सहन होत नव्हते. पण या लढाईत कुकांचा पराभव झाला, 65 लोकांनी शरणागती पत्करली. यामध्ये दोन महिला आणि एक लहान मूल होते. मुलाची कत्तल करण्यात आली तर दोन्ही महिलांना सोडून देण्यात आले. इतरांना 17 जानेवारी 1872 रोजी मलेरकोटला येथे तोफ डागून ठार करण्यात आले.

18 जानेवारी 1872 रोजी इंग्रजांनी छापा टाकून सद्गुरू महाराजांना कैद केले. त्यांना बर्मा (म्यानमार) मध्ये कैद करण्यात आले. पण तुरुंगातूनही ते नियमितपणे पत्र लिहायचे. पत्र कोण आणते, हे सरकारलाही कळू शकले नाही. मेर गुई येथील म्यानमारच्या तुरुंगात 29 मे 1905 रोजी त्यांचे निधन झाले.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात कुका चळवळीला याचे पहिले पान म्हणून पाहिले जाऊ शकते. ही चळवळ स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणाऱ्या देशभक्तांसाठी प्रेरणा होती. गांधीजींनी देखील स्वदेशी आणि बहिष्काराची प्रेरणा नामधारी किंवा कुक चळवळीतून मिळाली आहे.

Back to top button