‘रावण लीला’ च्या निर्मात्यांना मानहानीबद्दल नोटीस
मुंबई, दि. १३ सप्टेंबर (वि.सं.कें.) – १ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘रावण लीला’ या चित्रपटाचे पोस्टर्स, ट्रेलर मधील काही संवाद, चित्रपटाचे शीर्षक तसेच टॅगलाईन यामध्ये श्रीराम आणि रावण यांच्यातील चुकीच्या पद्धतीने तुलना करण्यात आली असल्याने श्रीरामाबद्दल गैरसमज पसरवणाऱ्या आणि रावणाची बाजू मांडणाऱ्या तसेच खोडसाळपणे, मानहानीकारक, आक्षेपार्ह चित्रण केल्याबद्दल चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व निर्माते यांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
अंबरनाथ येथे वास्तव्यास असणारे कमलेश देवीदयाल गुप्ता यांनी १३ सप्टेंबर रोजी ही नोटीस पाठवली असून चित्रपटातील संबंधित प्रसंग, संवाद त्या चित्रपटातून काढून टाकावेत व बिनशर्त माफीही मागितली जावी, अशी मागणी त्यांनी या नोटिशीत केली आहे. त्यांच्या वतीने ऍड. प्रकाश साळसिंगीकर यांनी ही नोटीस बजावली आहे.
१ ऑक्टोबर २०२१ रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून या चित्रपटाचे पोस्टर्स २४ ऑगस्ट पासून सोशल माध्यमांवर फिरत आहेत. या चित्रपटाची टॅगलाइन ‘ राम मे क्यो तुने रावण को देखा…” ही आहे. रामायणात रावणाने दुष्टकर्मे केली असून; भगवान विष्णूचे अवतार असलेल्या श्रीरामाने धर्म आणि धार्मिकतेची शिकवण आपल्या आचरणातून संपूर्ण जगाला दिली. असे असतानाही ही टॅगलाइन चुकीचा संदेश समाजमनात पोहोचवत आहे. हिंदू धर्मात रामलीलाचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यालाच साजेसे आणि रावणाचा उदोउदो करण्यासाठी रावणलीला हे नाव देऊन हा चित्रपट पवित्र अशा रामलीला या संकल्पनेवर आघात घालत आहे, असे पाठविण्यात आलेल्या नोटिशीत म्हटले आहे.
नोटिशीत पुढे असेही म्हटले आहे कि, या चित्रपटातील ट्रेलर मध्ये रावणाची आणि श्रीरामाची भूमिका बजावणाऱ्या कलाकारातील संभाषणात रावणाची चांगली बाजू मांडण्याचा तसेच त्याने केलेले कार्य कसे योग्य होते, हे दाखवण्याचा [प्रयत्न केला आहे. तर रामाच्या अवतारातील कलाकार केवळ आपण परमेश्वर आहोत म्हणून आपला जयजयकार करण्यात येतो. असे म्हटले आहे. या ट्रेलर मध्ये अन्यही चुकीचे आणि मानहानीकारक दृश्येही दाखविण्यात आली आहेत. यातून चुकीचा संदेश समाजात पोहोचत असून हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. आवश्यक नसतानाही चित्रपटात रावणाला मोठेपण देण्याचे काम करण्यात आले असून, मर्यादापुरुषोत्तम रामाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दरम्यान चित्रपटाचे पोस्टर्स, शीर्षक आणि टॅगलाईन मध्ये श्रीराम आणि रावणाची पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने तुलना करण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. यातील कन्टेन्ट अपमानकारक असून सदर चित्रपटातील आक्षेपार्ह विधाने आणि संवाद हटविण्यात यावेत, तसेच चित्रपटाचे नाव आणि टॅगलाईन देखील काढून टाकावीत, असे पाठविण्यात आलेल्या नोटिशीत म्हटले आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक हार्दिक गज्जर, निर्माते धवल गाडा, अक्षय गाडा, पार्थ गज्जर, रिचा सचन, तसेच प्रॉडक्शन कंपनी, संवाद लेखक, तसेच कलाकार अशा सगळ्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे.