EntertainmentNews

सिनेमा हे प्रबोधनाचे प्रभावी माध्यम : सचिन खेडेकर

चित्र भारती राष्ट्रीय लघुपट महोत्सव – २०२२ चे पोस्टर अनावरण संपन्न

मुंबई, दि. २९ सप्टेंबर : सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, हा चित्र भारती राष्ट्रीय लघुपट महोत्सवाचा हेतू आहे. सिनेमा सादरीकरणाची कला प्रेक्षकांशिवाय अपूर्ण असून प्रेक्षकांचे प्रबोधन करण्याचे, त्यांना प्रगल्भ करण्याचे ते एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपण काहीही दाखवून चालणार नाही तर समाजापर्यंत गुणवत्तापूर्ण आणि चांगली माहिती, ज्ञान पोहोचले पाहिजे, जेणेकरून प्रेक्षकांना चांगले पाहण्याची सवय होईल, असा विचार त्या कलाकृतीतून मांडता आला पाहिजे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांनी केले. आपण कलाकृतीकडे मनोरन्जन म्हणून न पाहता इंफोटेन्मेन्टचे माध्यम म्हणून पाहतो असेही ते यावेळी म्हणाले. चित्र भारती राष्ट्रीय लघुपट महोत्सव – २०२२’ चे पोस्टर अनावरणाच्या औचित्याने बुधवार, दि. २९ सप्टेंबर रोजी अंधेरी येथील मेयर्स हॉल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. भारतीय चित्र साधनेचा प्रतिष्ठित ‘चित्रभारती राष्ट्रीय लघुपट महोत्सव -२०२२’ भोपाळमध्ये १८ ते २० फेब्रुवारी २०२२ दरम्यान आयोजित केला जाणार आहे.

सचिन खेडेकर पुढे म्हणाले, मराठीत नाटकाला प्रयोग असे म्हटले जाते, खऱ्या अर्थाने तो एक प्रयोगच असतो. सध्याच्या काळात आपण कधीही चित्रपट पाहू शकतो. मला या चित्रपट महोत्सवाचा एक भाग असल्याचा खूप अभिमान आहे, यावर्षीच्या संकल्पना जाणून मला खूप आनंद झाला असून ही एक जबाबदारी आहे.

संघाचे क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट म्हणाले की, भारत हा देश कथांचा देश आहे, प्रत्येक भारतीयाची स्वतःची एक कथा आहे, त्यामुळे हा लघुपट महोत्सव भारताची कथा सांगण्याचा उपक्रम ठरतो. जर आपण भारतीय चित्र साधनेचे बोध वाक्य असणारी ऋग्वेदातील ही ऋचा सर्व काही मंगलमय व्हावे, असा संदेश देते आहे. तसाच हा महोत्सवही यशस्वी होईल, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

प्रसिद्ध निर्माता योगेश कुलकर्णी यांनी चित्र भारती साधनेची निर्मिती, त्याचा उद्देश, तसेच मागील ३ चित्रपट महोत्सवांच्या यशाबद्दलही माहिती दिली.
चित्र भारती साधनाचे ट्रस्टी आकाशादित्य लामा यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता झाली.

भारतीय चित्र साधना ही चित्रपट क्षेत्रातील भारतीय विचारांसाठी काम करणारी एक समर्पित संस्था आहे. ही संस्था राष्ट्रीय स्तरावर दर दोन वर्षांनी ‘चित्र भारती राष्ट्रीय लघुपट महोत्सव’ आयोजित करते. याशिवाय वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम आणि स्थानिक स्तरावरील चित्रपट समीक्षा, चित्रपट प्रदर्शन, चर्चा, प्रशिक्षण आणि लघुपट महोत्सव संस्थेद्वारे आयोजित केले जातात. दर दोन वर्षांनी होणारा राष्ट्रीय चित्रपट महोत्सव यंदा १८ ते २० फेब्रुवारी २०२२ दरम्यान मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे आयोजित करण्यात येणार आहे. भारतीय चित्र साधनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या चित्रभारती चित्रपट महोत्सवाचे हे चौथे वर्ष आहे.

भारतीय चित्र साधना भारताच्या परंपरा आणि विविधतेचा आदर करून आणि दृकश्राव्य क्षेत्रात याचे जतन आणि प्रोत्साहन देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. सीबीएफएफचे प्रत्येक संस्करण सामाजिक आणि राष्ट्रीय प्रासंगिकतेच्या विषयांवर प्रवेशअर्ज मागविण्यात येतात. यंदाचे वर्ष भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांचे स्मरण करणारे आहे. त्यामुळे ‘भारतीय स्वातंत्र्य संग्राम’ आणि ‘स्वतंत्र भारताची ७५ वर्षे’ या विषयांवरही प्रवेशअर्ज मागवण्यात आले आहेत. चित्रपट निर्मात्यांनी १ सप्टेंबरपासून महोत्सवासाठी आपले चित्रपट पाठवण्यास सुरुवात केली आहे. या १० विषयांवर चित्रपट प्रवेश अर्ज मागविण्यात आले आहेत. भारतीय स्वातंत्र्य संघर्ष, स्वतंत्र भारताची ७५ वर्षे, अनलॉकडाउन, वोकल फॉर लोकल, गाव सुखी-देश सुखी, भारतीय संस्कृती आणि मूल्य, नावीन्य-रचनात्मक कार्य, पर्यावरण आणि ऊर्जा, कुटुंब, शिक्षण आणि कौशल्य विकास हे विषय ठरविण्यात आले आहेत. भारतीय चित्रपट निर्माते 1 सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत आपले प्रवेश अर्ज पाठवू शकतात. अधिक माहिती चित्र भारती (http://chitrabharati.org) च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

Back to top button