लेहमध्ये फडकला जगातील सर्वात मोठा खादीचा तिरंगा

लेह : जगातील सर्वात मोठ्या खादीच्या तिरंग्याचे गांधी जयंतीच्या निमित्ताने अनावरण करण्यात आले. लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर आर. के. माथूर यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले. भारताचे लष्करप्रमुख मनोज नरवणे देखील यावेळी उपस्थित होते. प्रमुख मान्यवर आणि हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सनी ध्वजाला सलामी दिली. लेहमधील झास्कर टेकडीवर खादीचा तिरंगा फडकाविण्यात आला. हा तिरंगा खादी विकास मंडळ आणि मुंबईतील एका छपाई कंपनीने संयुक्तपणे बनविला आहे. झास्कर टेकडीवर अभियंता रेजिमेंटच्या जवानांनी तिरंगा खांद्यावर उचलून नेला. शिखर गाठण्यासाठी दोन तास लागले.
लेहमध्ये २० फूट उंचावर ठेवण्यात आलेल्या या ध्वजाची लांबी तब्बल २२५ फूट आहे. तर ध्वजाची रुंदी १५० फूट एवढी आहे. हा ध्वज पूर्णपणे खादीचा असून त्याचे वजन १ हजार किलोपेक्षा जास्त आहे. हा तिरंगा तयार करण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी लागला.
दरम्यान, आर. के. माथूर यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले, गांधीजी म्हणाले होते, की आपला राष्ट्रध्वज म्हणजे एकता आणि मानवतेचे प्रतीक आहे. या देशातील प्रत्येकाने या प्रतीकाचा स्वीकार केला आहे. आपल्या देशाच्या महानतेचे हे प्रतीक आहे. यापुढील वर्षांमध्ये लेहमधील हा ध्वज आपल्या जवानांसाठी उत्साहाचे देखील एक प्रतीक असेल.