दिव्यांग मुलीला भरविण्यासाठी त्याने बनविला ‘माँ-रोबोट’
समर्थ रामदासांनी म्हटले होते “निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू” आणि जरी हे वाक्य छत्रपतींना उद्देशून म्हटले असले तरी वेळो वेळी असंख्य लोकांनी त्या शब्दातील सार ओळखून, समजून ते आत्मसात करून वेळोवेळी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर वादळाचे वारे फिरवून दाखवले आहे. गोव्यातील फोंडा तालुक्यात बेतोडा गावातील श्री. बिपीन कदम हे या सामाजिक शृंखलेला जोडलेली एक नवीन कडी आहे.
मूळ गाव कुडाळ पण गेल्या २५ वर्षांपासून बिपीन कदम गोव्यात भाड्याच्या खोलीत राहतात. ते फक्त दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण करू शकले आणि गेल्या २३ वर्षांपासून बेतोडा येथे औद्योगिक वसाहतीत काम करतात. त्यांची आता १५ वर्षांची मुलगी प्राजक्ता, लहानपणापासून १००% दिव्यांग आहे व डॉक्टरनी ती कधीच चालू शकणार नाही असे सांगितले. पण त्यांनी जिद्द सोडली नाही आणि कठीण परिस्थितीवर मात करत त्यांनी मुलीचं संगोपनास काहीच कमी येऊ दिली नाही.
फोंड्यातील ढवळी येथे दिव्यांग मुलांसाठी असलेल्या लोकविश्वास प्रतिष्ठान शाळेत मुलीची भरती केल्यार त्यांच्या दृष्टीस आले कि समाजात अश्या दिव्यांग आणि वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींची संख्या भरपूर आहे. दिव्यांग मुलांना शाळेत पोचवायला, घेऊन जायला, अभ्यास शिकवायला व नंतर तो करून घ्यायला लागणारे कष्ट पालक म्हणून फक्त त्यांचेच नसून प्रत्येक पालकांचे आहेत ह्याची त्यांना कल्पना आली. दुचाकीवरून दिव्यांग मुलीला मध्ये बसवून पत्नीला मागे आधाराला बसवत शाळेत सोडणे व घरी घेऊन येणे अशी रोजची तारेवरची कसरत त्यांना करावी लागते. शिवाय त्यानां जेवण देताना, भरवताना सुद्धा अडथळे येतात. समजा आपण एखाद्या दिवशी कामावरून वेळेत येऊ शकतो नाही, मुलीला योग्य वेळी जेवण मिळाले नाही तर तिची अव्यवस्था होईल हि गोष्ट त्यांना सतत सतावत असे. शिवाय पालक आपलं मूळ जर दिव्यांग असेल तर “लोक काय म्हणतील” हा विचार करून ती बाब लपवून ठेवतात, त्यामुळे आवश्यक असलेली योग्य मदत मुलांना तसेच पालकांना मिळू शकत नाही हे सुद्धा त्यांनी अनुभवले.
याच अनुषंगाने त्यांनी फेसबुक वर पेज बनवली व समाजातील अनेक व्यक्ती व दिव्यांग मुलांचे पालक तसेच कुटुंबीय यांच्याशी विविध माध्यमातून चर्चा सुरु केली. दिव्यांग मुलांच्या संगोपनासाठी येणारे विविध अडथळे आपण कसे दूर करू शकतो यावर ते वारंवार चर्चा करायचे. प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे असायचे कि “आपण काही तरी केले पाहिजे” पण प्रत्यक्षात तशी कृती होत नसल्याचे त्यांना आढळून आले. शेवटी त्यांनी ह्या विषयात स्वतः काही तरी करायचे असा निर्धार केला व त्यांनी त्या संबंधात खटाटोप सुरु केली.
रोज १२ तासांची शिफ्ट संपवून रात्री उशिरा त्यांनी ह्या संबंधात अभ्यास करायला सुरुवात केली. औद्योगिक वसाहतीत काम करत असल्याने रोबोट चे बदलते स्वरूप आणि त्याचे महत्व त्यांनी हेरले होते व मुलीला जेवण भरवण्यासाठी रोबोट खूप किफायती ठरू शकतो असे त्यांना वाटले. त्यासंदर्भात शोधाशोध केल्यावर त्यांना अश्या प्रकारची व्यवस्था बाजारात सापडली नाही, आणि जी उपकरणे बाजारात उपलब्ध होती ती खूप महाग होती, परवडणारी नव्हती. त्यामुळे स्वतःच्या मुलीला भरवण्यासाठी रोबोट मी स्वतः करेल अशी भीष्म प्रतिज्ञा त्यांनी केली. रोज १२-१२ तासांची शिफ्ट संपवून घरची कामे आटोपून ते या विषयावर अभ्यास करायचे. इंटरनेट वर विविध संकेतस्थळांना भेट देऊन आवश्यक असलेले ज्ञान अर्जित करून त्यांनी ४ वर्षांपूर्वी मुलीला जेवण भरविण्यासाठी पहिला रोबोट स्वतः स्वखर्चाने बनविला. या साठी त्यांना रु.१५०००/- खर्च आला.
या कामात त्यांना अनेक अडथळे आले, नकारात्मक प्रतिक्रिया सोसाव्या लागल्या पण त्यांनी आपले काम चालू ठेवले. आज, त्यांनी बनवलेला रोबोट १५ विविध प्रकारचे पदार्थ ओळखून आवाजाच्या आदेशावर म्हणजेच व्हॉईस कमांड वर दिव्यांग व्यक्तीला जेवण भरवू शकतो. हा रोबोट वेगवेगळ्या भांड्यातून कुठलाही पदार्थ आदेश देताच चमच्याद्वारे गरजू व्यक्तीला भरवू शकतो. मागितलं चार वर्षात त्यांनी त्या रोबोट मध्ये अनेक सुधारणा करून तो कार्यक्षम, लहान आणि प्रभावी बनविला आहे, आणि या रोबोट चे नाव त्यांनी “मा-रोबोट” असे ठेवले आहे.
त्यांच्या या कामाची दखल लोक हळू हळू घेऊ लागले आणि विविध संस्थांनी त्यांच्या कामाची दखल घेत मदत तसेच त्यांचा गौरव म्हणून त्यांना बक्षिसे आणि सन्मान दिले. आता गोवा राज्य संचालित गोवा स्टेट इनोवेशन काउंसिल ने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना मार्गदर्शन, आणि गरज असलेली मदत करण्याचे ठरविले आहे. कोरोना महामारीमुळे ह्या कामात जरा उशीर झाला पण आता जशी परिस्थिती सुधारत आहे तशी योग्य आराखडा तयार करणे, प्रोटोटाईप तयार करणे, आवश्यक कॉपीराईट्स घेणे, ह्या सारख्या कामाला गती मिळत आहे. लवकरच ते पुढील टप्प्यात विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनखाली काम करून हा रोबोट अजून चांगला बनवून तो गरजू व्यक्तींपर्यंत पोचणार यावर लक्ष केंद्रित करणार आहे. त्यांच्या कामासंबंधित आजपर्यंत मिळालेली हि सर्वात मोठी मदत आहे असे त्यांनी सांगितले.
फक्त दहावी पर्यंत शिक्षण असून दिव्यांग मुलांसाठी जेवण भरविणारा रोबोट त्यांनी बनवला. पण त्यांना आता थांबायचे नाही आहे. हा रोबोट फक्त दिव्यांग व्यक्तींसाठी नसून वृद्ध व्यक्ती, लकवा आलेली लोकं, अपघातात एखादा अंग किंवा काम करण्याची क्षमता गमावून बसलेल्या हजारीं नव्हे तर लाखों लोकांसाठी वरदान ठरू शकतो आणि त्याची निर्मिती त्याच पद्धतीने करण्याचा त्यांचा हेतू आहे. स्वतः पालक म्हणून दिव्यांग मुलांची काळजी घेताना त्यांच्या लक्षात आले कि त्यासंबंधित अनेक कामे विविध उपकरणे म्हणजेच गॅजेट्स च्या माध्यमातून होऊ शकते ज्याने मुलांच्या संगोपनास मदत मिळते. ते गॅजेट्स रिमोट, हावभाव (जेसचर्स), हालचाली किव्वा व्हॉइस कमांड द्वारे चालवू शकतो, म्हणून अश्या प्रकारची उपकरणे बनविण्याचा त्यांचा विचार आहे, त्या संबंधात त्यांनी स्वतःची वेबसाईट सुद्धा बनवली आहे.
समाजात अनेक लोकं निश्चयाचे महामेरू असतात आणि वैयक्तिक जीवनात यशाची अनेक शिखरे गाठतात. पण अगदी मूठभर व्यक्ती असतात ज्या बहुजनास आधार ठरतात आणि समाजासमोरील आव्हानांना यशस्वीपणे पेलून एक नवीन सकाळ अनेकांसाठी उजळवतात, श्री. बिपीन कदम हे त्या मूठभर लोकांमधील एक व्यक्ती आहे. त्यांच्या समाजाप्रती या अतुलनीय योगदानामुळे भविष्यात लाखों दिव्यांग, वृद्ध, आणि गरजू व्यक्तींच्या जीवनात अंधकार बाजूला सारून, आधारस्तंभ असणारी प्रकाशकिरणे दिसत आहे.
सौजन्य : वि.सं. केंद्र, गोवा