कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते हे सुद्धा “सामाजिक सैनिकच” : नायक दीपचन्द
नाशिक, दि. २३ ऑक्टोबर : आम्ही सीमेवर लढतो, राष्ट्राच्या शत्रूंना धैर्याने सामोरे जातो, त्याच प्रमाणे “जनजाति कल्याण आश्रमाचे” कार्यकर्ते सुद्धा, निस्वार्थीपणे जनजाती समाजाच्या कल्याणाकरिता एक प्रकारे लढत असतात, त्यामुळे तेही “सामाजिक सैनिकच” आहेत असे गौरवोद्गार, कारगिल युद्धात आपले दोन्ही पाय व एक हात गमावलेले शूर योद्धे नायक दिपचंद यांनी काढले. जनजाति कल्याण आश्रम प.महाराष्ट्र यांनी आयोजित केलेल्या “दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात” ते बोलत होते.
प्रति वर्षी प्रमाणे यंदाही, कल्याण आश्रमाने 2022 सालाची दिनदर्शिका प्रकाशित केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने अनाम व अज्ञात जनजातीय स्वातंत्र्यवीरांना ही दिनदर्शिका समर्पित केलेली आहे. अत्यंत आकर्षक मांडणी असलेल्या या दिनदर्शिकेत जनजातीय स्वातंत्र्य योद्ध्यांची तसेच कल्याण आश्रमाच्या विविध सेवाकार्य व प्रकल्पांची माहिती दिलेली आहे. कोरोना काळात दुर्गम वनक्षेत्रात केलेल्या कामाचा ही थोडक्यात आढावा घेतलेला आहे. या कार्यक्रमा प्रसंगी व्यासपीठावर कल्याण आश्रमाचे नाशिक शहर अध्यक्ष सुजित जाजू, नायक दिपचंद, तसेच गोवा प्रांत संघटन मंत्री दिनकर देशपांडे उपस्थित होते. शहर सचिव प्रमोद वाणी यांनी प्रास्ताविक केले व कांचन कुलकर्णी यांनी आभार प्रदर्शन केले.
प्रत्येकाने ही दिनदर्शिका घेऊन जनजाती कल्याण आश्रमाच्या कार्यात आपले योगदान द्यावे व दिनदर्शिका घेण्यासाठी 8530349933 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कल्याण आश्रमा कडून करण्यात आले आहे.