मुंबई, दि. ३० ऑक्टोबर : शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कचरा वेचकांचे विश्वच वेगळे असते. दोन वेळच्या भाकरीची सोय करण्यासाठी ही मंडळी जीव धोक्यात घालून कचराकुंडीत उतरतात. अशा कचरावेचकांना एकत्रित आणून दिवाळी साजरी करण्यासाठी माय ग्रीन सोसायटी या संस्थेने पुढाकार घेतला आहे.
२८ ते ३० ऑक्टोबर या तीन दिवसात या संस्थेने मुंबई शहर परिसरातील कचरावेचकांना भेटवस्तू आणि मिठाईचे वाटप करुन एक अनोखा दीपोत्सव साजरा केला. याचबरोबर केंद्र सरकारच्या योजनांचा त्यांना लाभ घेता यावा तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे बँक खातेही सुरु करण्यात येणार आहे.
शहरात दिवाळी सणानिमित्त जय्यत तयारी सुरु आहे. मात्र हातावर पोट असलेल्या कचरा वेचकांना दिवाळी पोटाला चिमटे काढून साजरी करावी लागते. कधी कधी दोन वेळचे जेवण नशिबी नसलेल्या या कचरा वेचकांना दिवाळीचे अप्रूप असूनही त्यांना परिस्थितीमुळे ती साजरी करता येत नाही. अशा कचरा वेचकांसाठी माय ग्रीन सोसायटीच्यावतीने तीन दिवस दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बँकेत खाते तयार करण्यासाठी त्यांच्याकडून त्यांचे आधार कार्ड व पॅन कार्डचे तपशील घेण्यात आले असून लवकरच त्यांच्या नावाचे खाते बेँकेत सुरु होईल. त्यांच्या नावाची रितसर नोंदणी झाल्यामुळे केंद्र सरकारच्या निरानिराळ्या योजनांचा लाभ घेणे त्यांना शक्य होणार आहे.